23 सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: “मी जेव्हा बंदिवासातून त्यांना परत आणेन, तेव्हा यहूदीयामधील व त्यांच्या नगरांमधील लोक असे म्हणतील: हे समृद्ध नगरी, ‘हे पवित्र डोंगरा, याहवेह तुला आशीर्वादित करो’ 24 मग यहूदीया नगरवासी—शेतकरी व कळप घेऊन फिरणारे मेंढपाळ सर्वच एकत्र नांदतील. 25 मी थकलेल्यांना व मूर्छित झालेल्यांना ताजेतवाने व संतुष्ट करेन.”
26 एवढ्यात मी जागा झालो व सभोवती पाहिले. माझी झोप अत्यंत सुखद होती.
27 याहवेह जाहीर करतात, “असे दिवस येत आहेत जेव्हा लोकांच्या व गुरांच्या वंशजाचे मी इस्राएल व यहूदीयामध्ये रोपण करेन. 28 जसे त्यांना उपटून टाकताना व विदीर्ण होतांना, जमीनदोस्त होतांना, नष्ट होतांना व विपत्ती येत असताना लक्षपूर्वक नजर ठेवून होतो, तर पुन्हा त्यांचे रोपण व उभारणेही लक्ष लावून बघेन,” असे याहवेह जाहीर करतात. 29 “लोक त्या दिवसात पुन्हा म्हणणार नाहीत,
‘पालकांनी आंबट द्राक्षे खाल्ली,
आणि मुलांचे दात आंबले.’
30 कारण प्रत्येकजण स्वतःच्या पापांमुळे मरेल; जो कोणी आंबट द्राक्षे खाईल—त्याचेच दात आंबतील.
33 “परंतु मी इस्राएलाच्या लोकांबरोबर करार करेन तो असा”
याहवेह जाहीर करतात, “त्या वेळेनंतर
मी माझा नियम त्यांच्या मनात ठेवेन,
आणि ते त्यांच्या हृदयावर लिहेन,
मी त्यांचा परमेश्वर होईन,
आणि ते माझे लोक होतील.
34 कोणीही आपल्या शेजाऱ्याला बोध करणार नाही,
किंवा ‘याहवेहला ओळखा’ असे कोणी कोणाला बोलणार नाही,
कारण लहानापासून ते थोरापर्यंत सर्वजण
मला ओळखतील,”
असे याहवेह जाहीर करतात.
“मी त्यांच्या दुष्कृत्यांची क्षमा करेन
व यापुढे त्यांची पापे स्मरणार नाही.”
35 याहवेह असे म्हणतात,
दिवसा सूर्यप्रकाश द्यावा म्हणून
ज्यांनी सूर्याला नियुक्त केले,
व रात्री प्रकाश देण्यासाठी
चंद्र व ताऱ्यांना आज्ञा दिली,
गर्जना करणार्या लाटा उसळाव्यात म्हणून
जे समुद्र ढवळतात;
त्यांचे नाव सर्वसमर्थ याहवेह असे आहे:
36 “जर हे नियम माझ्या नजरेपुढून नाहीसे झाले तरच
माझ्यापुढे एक राष्ट्र म्हणून
इस्राएलचे अस्तित्व समाप्त होईल.”
याहवेह असे जाहीर करतात.
37 याहवेह असे म्हणतात:
“जर आकाशाचे मोजमाप करता आले असते
व पृथ्वीच्या पायांचा थांग लावता आला असता,
तर मी माझ्या इस्राएली लोकांच्या सर्व वंशजांना
त्यांनी जे सर्व केले त्याबद्दल त्यांना नाकारले असते,”
याहवेह जाहीर करतात.
38 याहवेह जाहीर करतात, “असे दिवस येत आहेत, कोपर्यातील हनानेलच्या बुरुजापासून कोपर्याच्या वेशीपर्यंत या नगरीची पुनर्बांधणी होईल. 39 आणि गारेबच्या टेकडीपासून गोआहपर्यंत मापनसूत्र विस्तारित केले जाईल. 40 संपूर्ण खोरे जिथे प्रेते व राख फेकण्यात येत असे, व त्याचप्रमाणे किद्रोनच्या खोऱ्यापर्यंतची आणि तिथून पूर्वेकडील घोडवेशी पर्यंतची सर्व शेते याहवेहला पवित्र अशी होतील. या नगराचा पुन्हा कधीही पाडाव किंवा विध्वंस होणार नाही.”