7 जेव्हा तेथील लोकांनी त्याला त्याच्या पत्नीबद्दल विचारले, तेव्हा तो म्हणाला, “ती माझी बहीण आहे.” कारण “ती माझी पत्नी आहे” असे सांगण्याची त्याला भीती वाटली; त्याने विचार केला, “या ठिकाणचे लोक रिबेकाहमुळे कदाचित मला मारून टाकतील, कारण ती फार सुंदर आहे.”
8 तो तिथे बराच काळ राहिल्यानंतर एके दिवशी पलिष्ट्यांचा राजा अबीमेलेख याने खिडकीतून बाहेर पाहिले की तो इसहाक आपली पत्नी रिबेकाह हिच्याशी प्रेम करीत आहे. 9 अबीमेलेखाने इसहाकाला बोलाविणे पाठविले आणि त्याला म्हणाला, “निश्चितच ही तुझी पत्नी आहे, ‘तर ती माझी बहीण आहे’ असे तू का सांगितलेस?”
10 अबीमेलेखाने उद्गार काढले, “तू आमच्यासोबत असे का केले? माझ्या लोकांपैकी कोणीही तिच्यासोबत निजला असता आणि तू आमच्यावर दोष आणला असतास.”
11 यानंतर अबीमेलेखाने जाहीर फर्मान काढले: “या मनुष्याला किंवा याच्या पत्नीला कोणी त्रास दिल्यास त्याला मृत्यूची शिक्षा दिली जाईल.”
12 इसहाकाने त्या देशात धान्य पेरले व त्याच वर्षी त्याला शंभरपट पीक मिळाले, कारण याहवेहने इसहाकाला आशीर्वादित केले. 13 तो श्रीमंत होत गेला आणि त्याचे धन असे वाढत गेले की पुढे तो खूप धनाढ्य झाला. 14 त्याच्याकडे इतके मेंढ्या, गुरे आणि नोकर होते की पलिष्ट्यांनी त्याचा हेवा केला. 15 म्हणून ज्या विहिरी त्याचा पिता अब्राहाम याच्या नोकरांनी खणल्या होत्या त्या सर्व पलिष्ट्यांनी मातीने बुजवून टाकल्या.
16 तेव्हा अबीमेलेखाने इसहाकाला म्हटले, “तू आमच्यापासून दूर निघून जा; तू आमच्यापेक्षा अधिक शक्तिशाली झाला आहेस.”
17 तेव्हा इसहाकाने ते ठिकाण सोडले आणि गरारच्या खोर्यात तळ देऊन राहू लागला. 18 इसहाकाने आपला पिता अब्राहाम याने खणलेल्या आणि अब्राहामाच्या मृत्यूनंतर पलिष्टी लोकांनी बुजवून टाकलेल्या सर्व विहिरी पुन्हा खणल्या. अब्राहामाने विहिरीना जी नावे दिली होती तीच नावे त्याने पुनः दिली.
19 इसहाकाच्या नोकरांनी खोर्यात एक नवी विहीर खणली आणि तिथे त्यांना गोड पाण्याचा एक झरा सापडला. 20 मग गरारचे गुराखी इसहाकाच्या गुराख्यांशी भांडले आणि म्हणाले, “हे पाणी आमचे आहे!” म्हणून त्याने विहिरीला एसेक[a] असे नाव दिले; कारण त्यांचे त्याच्याशी भांडण झाले. 21 मग त्यांनी दुसरी एक विहीर खणली; पण तिच्यावरूनही पुन्हा भांडणे झाली, म्हणून तिचे नाव सितनाह[b] असे ठेवले. 22 यानंतर इसहाकाने आणखी एक विहीर खणली, पण त्यावेळी कोणाशीही भांडण झाले नाही. म्हणून त्याने त्या विहिरीचे नाव रेहोबोथ[c] असे ठेवले. तो म्हणाला, “आता तरी याहवेहने आम्हाला जागा दिली आहे. आता आमची या देशात भरभराट होईल.”
23 पुढे इसहाक तिथून बेअर-शेबाला गेला; 24 त्याच रात्री याहवेहने त्याला दर्शन देऊन म्हटले, “मी तुझा पिता अब्राहामाचा परमेश्वर आहे; भिऊ नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे; मी आपला सेवक अब्राहाम याच्यासाठी तुला आशीर्वादित करेन आणि तुझा वंश वाढवेन.”
25 मग इसहाकाने तिथे एक वेदी बांधली आणि याहवेहची उपासना केली. त्याने तिथे वस्ती केली आणि तिथे त्यांच्या नोकरांनी एक विहीर खणली.
26 एके दिवशी त्याला भेटण्यासाठी गरारहून अबीमेलेख, त्याचा सल्लागार अहुज्जाथ आणि त्याचा सेनापती पीकोल हे आले. 27 “तुम्ही येथे का आला?” इसहाकाने त्यांना विचारले, “कारण तुम्ही मला द्वेषाने वागवून हाकलून दिले होते.”
28 यावर ते म्हणाले, “आम्हाला हे स्पष्टपणे दिसत आहे की, याहवेह तुला आशीर्वादित करीत आहेत; तुझ्याशी—तुझ्या आणि आमच्यामध्ये एक करार करावा असे आम्हाला वाटले. म्हणून आम्हाला तुमच्याबरोबर करार करू द्यावा. 29 आम्ही जसा तुला कसलाही उपद्रव दिला नाही, तसा तू आम्हाला कसलाही उपद्रव देणार नाहीस, असे वचन दे. उलट आम्ही तुझे भलेच केले आणि तुला शांतीने जाऊ दिले; आणि आता तू याहवेहद्वारे आशीर्वादित झाला आहे.”
30 इसहाकाने त्यांच्यासाठी एक मोठी मेजवानी दिली आणि त्यांनी खाणेपिणे केले. 31 पहाटेस उठल्याबरोबर त्यांनी एकमेकांशी करार केला. नंतर इसहाकाने त्यांना निरोप दिला व ते शांतीने परतले.
32 त्या दिवशी इसहाकाचे नोकर त्याच्याकडे येऊन त्याला सांगू लागले. “आम्ही खणीत असलेल्या विहिरीला पाणी लागले आहे!” 33 त्याने तिला शिबाह[d] म्हटले, आणि आजपर्यंत या नगराचे नाव बेअर-शेबा असे आहे.
Languages