12 “कारण त्याच रात्री मी संपूर्ण इजिप्त देशामधून संचार करेन व सर्व मनुष्यांचे व जनावरांचे प्रथमवत्स मारून टाकेन आणि त्यांच्या सर्व दैवतांवर न्याय आणेन; मी याहवेह आहे. 13 तुम्ही राहत असलेल्या घरांच्या दारांवर असलेले रक्त हे तुमच्याकरिता चिन्ह असेल, जेव्हा मी ते रक्त पाहीन, तेव्हा मी तुम्हाला ओलांडून पुढे जाईन. जेव्हा मी इजिप्तला तडाखा देईन, तेव्हा कोणतीही विनाशी पीडा तुम्हाला स्पर्श करणार नाही.
14 “हा दिवस तुम्ही याहवेहचा सण म्हणून पिढ्यान् पिढ्यांपर्यंत सर्वकाळच्या नियमाने पाळावा. 15 सात दिवस तुम्ही खमीर नसलेली भाकर खावी. पहिल्या दिवशी आपल्या घरातून खमीर काढून टाकावे, कारण जे कोणी या सात दिवसात खमीर घातलेल्या वस्तू खाईल, त्याला इस्राएलातून बेदखल करण्यात यावे. 16 पहिल्या दिवशी एक पवित्र सभा भरवावी आणि सातव्या दिवशी दुसरी सभा. या दिवसात प्रत्येकाने खाण्यासाठी अन्न तयार करण्याशिवाय इतर कोणतेही काम करू नये.
17 “बेखमीर भाकरीचा सण पाळावा, कारण याच दिवशी मी तुमच्या सैन्यांना इजिप्तमधून बाहेर आणले. पिढ्यान् पिढ्यांपर्यंत सर्वकाळच्या नियमाने तो पाळावा. 18 पहिल्या महिन्यात चौदाव्या दिवसाच्या संध्याकाळपासून एकविसाव्या दिवसाच्या संध्याकाळपर्यंत तुम्ही खमीर नसलेली भाकर खावी. 19 या सात दिवसात तुमच्या घरात खमीर सापडू नये. आणि कोणीही, तो परदेशी असो वा देशात जन्मलेला असो, जो खमीर घातलेले पदार्थ खाईल तर त्याला इस्राएलाच्या समाजातून वाळीत टाकले जावे. 20 खमीर घातलेले काहीही खाऊ नये. तुम्ही कुठेही राहत असला तरी तुम्ही बेखमीर भाकरीच खावी.”
21 मग मोशेने इस्राएलातील वडीलजनांना बोलाविले व म्हटले, “तुम्ही लगेच जा व आपआपल्या कुटुंबाप्रमाणे कोकरू निवडून घ्या व वल्हांडणाच्या कोकराचा वध करा. 22 एजोबाची जुडी घेऊन ती पात्रात घेतलेल्या रक्तात बुडवा व त्याने ते रक्त घराच्या दरवाजाच्या बाजूंवर व कपाळपट्टीवर लावा. तुम्हापैकी कोणीही सकाळ होईपर्यंत आपल्या घराबाहेर पडू नये. 23 कारण याहवेह या देशात संचार करतील व इजिप्तवासियांचा संहार करतील. पण ज्या दरवाजाच्या बाजूंवर व कपाळपट्टीवर रक्त दिसेल, याहवेह त्या घराला ओलांडून पुढे जातील व विनाशकाला तुम्हाला मारण्यास तुमच्या घरात येऊ देणार नाहीत.
24 “तुमच्यासाठी व तुमच्या वंशजांसाठी हा सर्वकाळचा नियम असावा. 25 वचन दिल्याप्रमाणे जो देश याहवेह तुम्हाला देणार आहेत, त्या देशात तुम्ही जाल, तिथेही हा विधी पाळावा. 26 जेव्हा तुमची लेकरे तुम्हाला विचारतील, ‘या विधीचा अर्थ काय आहे?’ 27 तेव्हा त्यांना सांगा, ‘हा याहवेहसाठी वल्हांडणाचा यज्ञ आहे, ज्यांनी इजिप्तच्या लोकांचा संहार करून त्यांचा नाश केला, आणि इस्राएली लोकांची घरे ओलांडून गेले आणि आम्हाला वाचविले.’ ” तेव्हा लोकांनी आपली मस्तके नमवून त्यांना नमन केले व त्यांची आराधना केली. 28 मग याहवेहने मोशे व अहरोन यांना आज्ञा दिल्याप्रमाणे इस्राएली लोकांनी केले.
29 मध्यरात्रीत याहवेहने इजिप्त देशातील प्रथम जन्मलेले सर्व मारून टाकले. सिंहासनावर बसणार्या फारोहच्या प्रथम पुत्रापासून तुरुंगात असलेल्या कैद्याच्या प्रथम जन्मलेल्या पुत्रापर्यंत, जनावरांचे प्रथम जन्मलेले वत्स देखील मारून टाकले. 30 तेव्हा फारोह, त्याचे अधिकारी व सर्व इजिप्तचे लोक रात्री जागे झाले आणि इजिप्तमध्ये मोठा आकांत झाला, कारण ज्या घरात मृत्यू झाला नाही, असे एकही घर नव्हते.
33 इस्राएली लोक देशाबाहेर त्वरेने जावे म्हणून इजिप्तच्या लोकांनी त्यांना विनंती केली. कारण ते म्हणाले, “नाहीतर आम्ही सर्व मरून जाऊ!” 34 मग इस्राएली लोकांनी खमीर घालण्यापूर्वी कणीक परातीसह कापडात बांधून खांद्यावर टाकली. 35 मोशेने सांगितल्याप्रमाणे इस्राएल लोकांनी इजिप्तच्या लोकांकडून चांदीचे व सोन्याचे दागिने व कपडे मागून घेतले. 36 इजिप्तचे लोक इस्राएली लोकांवर कृपादृष्टी करतील असे याहवेहने केले आणि जे काही त्यांनी मागितले ते सर्व त्यांनी त्यांना दिले; अशाप्रकारे त्यांनी इजिप्तच्या लोकांना लुटले.
37 इस्राएल लोकांनी रामसेस पासून ते सुक्कोथ पर्यंत प्रवास केला. स्त्रिया व लेकरे या खेरीज सुमारे सहा लाख पुरुष पायी चालणारे होते. 38 इतर पुष्कळ लोकसुद्धा त्यांच्याबरोबर निघाले होते, त्याचप्रमाणे शेरडेमेंढरांचे कळप व जनावरेही होती. 39 जी कणीक इस्राएल लोकांनी इजिप्तमधून बरोबर आणली होती, त्याच्या त्यांनी भाकरी भाजल्या. ते कणीक बेखमीर होते, कारण जेव्हा त्यांना इजिप्तमधून घालवून दिले, स्वतःसाठी अन्न तयार करावयाला वेळ नव्हता.
40 इस्राएली लोक इजिप्तमध्ये राहिले तो कालावधी चारशेतीस वर्षांचा होता. 41 चारशेतिसाव्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी याहवेहच्या सैन्यांनी इजिप्त देश सोडला. 42 ही रात्र याहवेहने इस्राएली लोकांना इजिप्त देशातून बाहेर आणण्यासाठी वेगळी करून ठेवली, ही रात्र इस्राएल लोकांनी पिढ्यान् पिढ्या याहवेहला सन्मान म्हणून पाळावी.
46 “ते घरातच खावयाचे आहे; त्यातील मांस घराबाहेर घेऊन जाऊ नये. त्यातील एकही हाड मोडू नये. 47 इस्राएलाच्या सर्व समुदायाने हा सण पाळावा.
48 “तुमच्याबरोबर राहणार्या विदेशी व्यक्तीला याहवेहचा हा वल्हांडणाचा सण पाळावयाचा असेल, तर त्यांच्यातील सर्व पुरुषांनी सुंता करवून घ्यावी; मगच ते या देशात जन्मलेल्याप्रमाणे हा सण पाळू शकतील. कोणत्याही बेसुंती पुरुषाने ते खाऊ नये. 49 तुमच्यामध्ये असलेले स्वदेशी असो वा तुमच्यामध्ये असलेले विदेशी असो, दोघांनाही एकच नियम असावा.”
50 तेव्हा याहवेहने मोशे व अहरोन यांना सूचना दिल्याप्रमाणे इस्राएली लोकांनी केले. 51 याच दिवशी याहवेहने वंशानुसार इस्राएली लोकांना इजिप्त देशातून बाहेर आणले.
<- निर्गम 11निर्गम 13 ->- a मूळ भाषेत पेसाह-ओलांडणे
Languages