4 मग मोशे म्हणाला, “याहवेह असे म्हणतात: ‘मध्यरात्रीच्या सुमारास मी इजिप्तमधून फिरेन. 5 इजिप्त देशातील प्रत्येक प्रथम जन्मलेला पुत्र मरण पावेल, फारोह जो राजासनावर बसतो त्याच्या प्रथम पुत्रापासून त्याच्या जात्यावर दळत बसणार्या गुलाम स्त्रीच्या प्रथम पुत्रापर्यंत आणि जनावरातील प्रथम जन्मलेले प्रत्येक वत्स मरेल. 6 संपूर्ण इजिप्त देशभर पूर्वी कधी झाला नाही व पुढे कधी होणार नाही असा आकांत होईल. 7 परंतु इस्राएली व्यक्तीवर किंवा पशूंवर कुत्रेदेखील भुंकणार नाही.’ यावरून मी याहवेह इजिप्त व इस्राएल यांच्यामध्ये कसा भेद करतो, हे तुम्हाला समजेल. 8 तुझे हे सर्व सेवक माझ्याकडे येतील व माझ्या पाया पडून मला म्हणतील, ‘तू व तुझे अनुसरण करणारे सर्व लोक निघून जा!’ त्यानंतर मी निघून जाईन.” मग मोशे रागाने संतापून फारोहसमोरून निघून गेला.
9 याहवेहने मोशेला आधीच सांगितले होते, “इजिप्त देशात मी पुष्कळ चमत्कार करावे म्हणून फारोह तुमचे ऐकण्यास नाकारेल.” 10 मोशे व अहरोन यांनी फारोहसमक्ष हे सर्व चमत्कार केले, पण याहवेहने फारोहचे हृदय कठीण केले व त्याने इस्राएली लोकांना देशाबाहेर जाण्यास परवानगी दिली नाही.
<- निर्गम 10निर्गम 12 ->
Languages