Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
स्तोत्र 57
संगीत दिग्दर्शकासाठी. “अल्तश्केथ” चालीवर आधारित. दावीदाचे मिक्ताम गाण्याची रचना. दावीद शौलाच्या उपस्थितीपासून निसटून गुहेत लपून बसला त्या संदर्भाचे आहे.
1 माझ्या परमेश्वरा, माझ्यावर दया करा, माझ्यावर दया करा.
कारण मी तुमचा आश्रय घेतला आहे;
संकटे जाईपर्यंत मी तुमच्या पंखांच्या
छायेखाली आश्रय घेईन.
 
2 जे मला निर्दोष ठरवितात,
त्या सर्वोच्च परमेश्वराचा मी धावा करेन.
3 ते स्वर्गातून साहाय्य पाठवून माझे तारण करतील;
जे माझा पाठलाग करतात त्यांचा ते तिरस्कार करतात;
सेला
[a]
परमेश्वर त्यांची प्रीती आणि विश्वासूपणा पाठवून देतील.
 
4 सिंहांनी मला घेरले आहे;
ज्यांचे दात भाले आणि बाण आहेत,
ज्यांची जीभ तीक्ष्ण तलवार आहे
अशा हिंसक स्वभावाच्या मनुष्यांमध्ये मी पडलो आहे.
 
5 हे परमेश्वरा, तुम्ही गगनमंडळाहून उदात्त केले जावोत;
तुमचे गौरव सर्व पृथ्वी व्यापून टाको.
 
6 माझ्या पावलांसाठी त्यांनी सापळा लावला आहे—
संकटात मी वाकून गेलो होतो.
माझ्या वाटेवर त्यांनी माझ्यासाठी खड्डा खणला होता—
परंतु ते स्वतःच त्यात पडले आहेत.
सेला
 
7 हे परमेश्वरा, माझे अंतःकरण खंबीर आहे,
माझे अंतःकरण खंबीर आहे;
मी तुमची स्तुती करीत गायन आणि वादन करणार.
8 हे माझ्या जिवा, जागृत हो!
अगे सारंगी, आणि वीणे, जागृत व्हा!
मी प्रातःकाळाला जागृत करेन.
 
9 हे प्रभू, मी प्रत्येक राष्ट्रात तुमची स्तुती करेन,
मी सर्व लोकात तुमची स्तुतिस्तोत्रे गाईन.
10 कारण तुमचे वात्सल्य महान असून ते गगनमंडळाला भिडले आहे;
तुमचे विश्वासूपण आकाशाला जाऊन पोहोचते.
 
11 हे परमेश्वरा, तुम्ही गगनमंडळाहून उदात्त केले जावोत;
तुमचे गौरव सर्व पृथ्वी व्यापून टाको.

<- स्तोत्रसंहिता 56स्तोत्रसंहिता 58 ->