6 येशूंनी उत्तर दिले, “मार्ग आणि सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्याशिवाय पित्याकडे कोणीही येऊ शकत नाही. 7 जर तुम्ही मला खरोखर ओळखले असते, तर माझ्या पित्यालाही ओळखले असते. आता यापुढे तुम्ही त्यांना ओळखता व त्यांना पाहिलेही आहे.”
8 फिलिप्प म्हणाला, “प्रभूजी, आम्हाला पिता दाखवा म्हणजे पुरे आहे.”
9 येशूंनी उत्तर दिले: “फिलिप्पा, मी इतका काळ तुम्हाजवळ असूनही तू मला ओळखत नाही काय? ज्याने मला पाहिले आहे, त्याने पित्यालाही पाहिले आहे. तर मग, ‘पिता दाखवा असे तू कसे म्हणतोस’? 10 मी पित्यामध्ये आहे व पिता मजमध्ये आहे, यावर तुझा विश्वास नाही काय? जी वचने मी तुला सांगतो, ते मी माझ्या स्वतःच्या अधिकाराने सांगत नाही. खरेतर, माझ्यामध्ये वसणारा पिताच हे कार्य करीत आहे. 11 फक्त विश्वास ठेवा की मी पित्यामध्ये आहे आणि पिता मजमध्ये आहे; अथवा प्रत्यक्ष कार्याच्या पुराव्यावर तरी विश्वास ठेवा. 12 मी तुम्हाला निश्चित सांगतो, मी जी कृत्ये करतो ती मजवर विश्वास ठेवणाराही करेल, किंबहुना त्यापेक्षाही मोठी करेल, कारण मी पित्याकडे जात आहे. 13 आणि तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करेन, यासाठी की पुत्रामध्ये पित्याचे गौरव व्हावे. 14 तुम्ही माझ्या नावाने मजजवळ जे काहीही मागाल, ते मी तुम्हासाठी करेन.
22 नंतर यहूदाह (यहूदाह इस्कर्योत नव्हे) म्हणाला, “पण प्रभूजी, आपण फक्त आम्हाला प्रकट होणार पण जगाला का प्रकट होणार नाही?”
23 येशूंनी उत्तर दिले, “कारण जो कोणी मजवर प्रीती करतो तो माझे शिक्षण आचरणात आणेल. माझे पितादेखील त्यांच्यावर प्रीती करतील आणि आम्ही त्यांच्याकडे येऊ व त्यांच्याबरोबर वस्ती करू. 24 जो कोणी माझ्यावर प्रीती करीत नाही, तो माझे शिक्षण पाळीत नाही. माझी जी वचने तुम्ही ऐकत आहात ती माझी स्वतःची नाहीत; तर ज्याने मला पाठविले त्या पित्याची आहेत.
25 “मी तुमच्याबरोबर असताना, हे सर्व तुम्हाला सांगितले आहे. 26 परंतु तो कैवारी, पवित्र आत्मा, ज्याला पिता माझ्या नावाने पाठवतील, तो तुम्हाला सर्वकाही शिकवेल आणि मी सांगितलेल्या सर्व गोष्टींची आठवण करून देईल. 27 शांती मी तुम्हासाठी ठेऊन जातो; माझी शांती मी तुम्हाला देतो. ज्याप्रमाणे जग देते त्याप्रमाणे मी तुम्हाला देत नाही. तुमची मने अस्वस्थ होऊ देऊ नका व भिऊ नका.
28 “मी तुम्हाला सांगितले ते तुम्ही ऐकले आहे की, ‘मी जात आहे, परंतु मी तुम्हाकडे परत येईन.’ जर तुमची मजवर प्रीती असती, तर मी पित्याकडे जातो म्हणून तुम्हाला आनंद वाटला असता, कारण माझे पिता मजपेक्षा थोर आहेत. 29 आता हे घडून येण्यापूर्वीच मी तुम्हाला सांगितले आहे, यासाठी की ते घडून आले म्हणजे, तुम्ही विश्वास ठेवावा. 30 आता मी तुम्हाला यापेक्षा अधिक सांगणार नाही, कारण या जगाचा अधिपती येत आहे. त्याचा मजवर काहीही अधिकार नाही, 31 परंतु तो यासाठी आला की जगाने ओळखावे की मी पित्यावर प्रीती करतो आणि पित्याने जशी मला आज्ञा दिली तसेच मी तंतोतंत करतो.
Languages