Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site

1 अशा रीतीने आकाश, पृथ्वी व त्यातील सर्वांची निर्मिती पूर्ण झाली.

 
2 परमेश्वराने सातव्या दिवसापर्यंत त्यांचे काम संपविले, म्हणून सातव्या दिवशी त्यांच्या सर्व कामापासून त्यांनी विश्रांती घेतली. 3 सातव्या दिवसाला आशीर्वाद देऊन परमेश्वराने तो पवित्र केला; कारण निर्मितीचे संपूर्ण कार्य संपवून त्यांनी सातव्या दिवशी विश्रांती घेतली.
आदाम आणि हव्वा
4 याहवेह परमेश्वराने आकाश व पृथ्वी निर्माण केली, त्याचा हा वृतांत आहे: जेव्हा याहवेह परमेश्वराने पृथ्वी व आकाशाची निर्मिती केली.
 
5 जमिनीवर अद्याप वनस्पती उगवली नव्हती, कारण याहवेह परमेश्वराने अजून पाऊस पाडला नव्हता आणि जमिनीची मशागत करण्यासाठी कोणी मनुष्य नव्हता. 6 मात्र जमिनीवरून धुके[a] वर जात असे आणि त्याने जमिनीच्या सर्व पृष्ठभागाचे सिंचन होत असे. 7 मग याहवेह परमेश्वराने जमिनीवरील धूळ घेऊन तिचा मनुष्य[b] घडविला व त्याच्या नाकपुड्यांत त्यांनी जीवन देणारा श्वास फुंकला; तेव्हा मनुष्य सजीव प्राणी झाला.

8 नंतर याहवेह परमेश्वराने पूर्वेकडे, एदेनमध्ये एक बाग लावली आणि त्या बागेत आपण घडविलेल्या मनुष्याला ठेवले. 9 याहवेह परमेश्वराने सर्व प्रकारची झाडे जमिनीतून उगवली—डोळ्यांना आनंद देणारे व खाण्यास उत्तम असलेले जीवनवृक्ष आणि बर्‍यावाईटाचे ज्ञान करून देणारा वृक्ष हे देखील बागेच्या मध्यभागी लावले.

10 बागेला पाणी देण्यासाठी एदेनात एक नदी उगम पावली व वाहू लागली आणि ती विभागून तिच्या चार नद्या झाल्या 11 पहिल्या नदीचे नाव पीशोन असून ती सोने असलेल्या हवीला प्रदेशाला वेढा घालून वाहते. 12 त्या प्रदेशातील सोने उत्तम प्रतीचे असून तिथे मोती[c] व गोमेद रत्नेही सापडतात. 13 दुसर्‍या नदीचे नाव गीहोन असून ती कूशच्या[d] सर्व प्रदेशाभोवती वाहत जाते. 14 तिसर्‍या नदीचे नाव हिद्दकेल[e] असून ती अश्शूरच्या पूर्वेस वाहत जाते; आणि चौथ्या नदीचे नाव फरात[f] असे आहे.

15 याहवेह परमेश्वराने मनुष्याला एदेन बागेत नेऊन तिची मशागत व राखण करण्यास ठेवले. 16 याहवेह परमेश्वराने मनुष्याला आज्ञा केली, “बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ तू खुशाल खा; 17 परंतु बऱ्यावाईटाचे ज्ञान करून देणार्‍या वृक्षाचे फळ मात्र तू खाऊ नकोस, कारण ज्या दिवशी तू ते फळ खाशील त्या दिवशी तू निश्चित मरशील.”

18 याहवेह परमेश्वर म्हणाले, “मनुष्याने एकटे असावे हे बरे नाही; मी त्याच्यासाठी एक योग्य मदतनीस निर्माण करेन.”

19 याहवेह परमेश्वराने भूमीपासून प्रत्येक जातीचे वन्यपशू, आकाशातील सर्व पक्षी निर्माण केले. त्यांना मानव कोणती नावे देतो हे पाहण्याकरिता त्याच्याकडे आणले; आणि त्याने जी नावे दिली तीच त्यांची नावे पडली. 20 याप्रकारे मानवाने सर्व पाळीव प्राण्यांना, आकाशातील पक्ष्यांना आणि जमिनीवरील सर्व पशूंना नावे दिली.

परंतु आदामाला योग्य असा मदतनीस त्यांच्यामध्ये नव्हता. 21 नंतर याहवेह परमेश्वराने मानवाला[g] गाढ निद्रा आणली आणि तो झोपेत असताना याहवेह परमेश्वराने त्याची एक फासळी काढली आणि ती जागा त्यांनी मांसाने भरून काढली. 22 याहवेह परमेश्वराने मानवाची जी फासळी काढली, त्याची त्यांनी एक स्त्री निर्माण केली आणि तिला त्यांनी मानवाकडे आणले.

23 तेव्हा मानव म्हणाला,

“ही माझ्या हाडाचे हाड
आणि मांसाचे मांस आहे;
हिला नारी असे म्हणतील,
कारण ती नरापासून बनविली आहे.”
24 या कारणासाठी पुरुष आपल्या आईवडिलांना सोडून आपल्या पत्नीशी जडून राहील आणि ती एकदेह होतील.

25 आदाम आणि त्याची पत्नी हे दोघेही नग्न होती, परंतु त्यांना लज्जा वाटत नव्हती.

<- उत्पत्ती 1उत्पत्ती 3 ->