10 “ ‘यास्तव सार्वभौम याहवेह म्हणतात: मोठे देवदारू दाट झाडींच्या वर उंच झाले आणि त्याला त्याच्या उंचीचा गर्व झाला, 11 त्याच्या दुष्टतेनुसार त्याला वागवावे म्हणून मी त्याला राष्ट्रांच्या अधिपतींच्या हातात दिले. मी त्याला सोडून दिले आहे, 12 आणि अधिक क्रूर विदेशी राष्ट्रांनी त्याचा छेद करून त्याला टाकून दिले. त्याच्या डहाळ्या डोंगरांवर व दर्यांमध्ये पडल्या; त्याच्या फांद्या देशाच्या सर्व झर्यांमध्ये तुटून पडल्या. पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे त्याच्या सावलीतून बाहेर निघाले आणि त्यांनी त्याला टाकून दिले. 13 सर्व पक्षी पडलेल्या झाडावर वस्ती करू लागले आणि सर्व जंगली जनावरे त्याच्या फांद्यांमध्ये राहू लागले. 14 म्हणून पाण्याजवळ असलेले कोणतेही झाड यापुढे दाट झाडींच्या वर गर्वाने उंच वाढणार नाही. भरपूर पाणी मिळालेल्या झाडांपैकी कोणतेही झाड तेवढ्या उंचीपर्यंत वाढणार नाही; ते मरणास नेमलेले आहेत, पृथ्वीच्या खाली, मेलेल्यांमध्ये, जे मृतलोकात उतरले आहेत त्या लोकांत त्यांची जागा आहे.
15 “ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: त्या दिवशी तो मृतलोकात आणला गेला, त्याच्यासाठी शोक करावा म्हणून खोल समुद्र मी झाकून टाकला; मी त्याचे प्रवाह थांबविले, आणि त्याचे विपुल पाणी मी रोखून ठेवले. त्याच्यामुळे मी लबानोनला दुःखित केले आणि रानातील प्रत्येक झाड वाळून गेले. 16 गर्तेत जाणार्यांबरोबर त्याला मी अधोलोकात आणले, त्यात तो पडला तेव्हा त्याच्या आवाजाने राष्ट्रे थरथर कापले. तेव्हा एदेनातील सर्व झाडे, लबानोनातील सर्वोत्तम, पाण्याचा पुष्कळ पुरवठा असलेली झाडे, पृथ्वीच्या खाली सांत्वन पावले. 17 मोठ्या देवदारूप्रमाणे ते सुद्धा मृतलोकात, राष्ट्रांच्या लोकांमध्ये त्याच्या सावलीखाली राहत होते त्या हत्यारबंदी लोकांबरोबर तलवारीने मारले गेले.
18 “ ‘वैभव व ऐश्वर्यासंबंधात यापैकी एदेनातील कोणत्या झाडाची तुलना होऊ शकते? तरीही, तू सुद्धा एदेनातील झाडांबरोबर खाली पृथ्वीवर आणला जाशील; बेसुंती लोक, जे तलवारीने मारले गेले त्यांच्याबरोबर तू पडून राहशील.
Languages