त्यांनी त्यांच्या ढाली व शिरटोप तुझ्या भिंतीवर टांगून
तुला वैभवी बनविले.
11 आरवद व हेलेकच्या माणसांनी
चहूकडून तुझ्या तटांचे रक्षण केले;
गम्मादचे पुरुष
तुझ्या बुरुजावर होते.
त्यांनी त्यांच्या ढाली तुझ्या भिंतींवर चोहीकडे टांगल्या;
त्यांनी तुझे सौंदर्य पूर्णतेस आणले.
12 “ ‘तुझ्या महान संपत्तीमुळे तार्शीशने तुझ्याबरोबर व्यापार केला; तुझ्या मालाच्या मोबदल्यात त्यांनी चांदी, लोखंड, कथील व शिसे दिली.
13 “ ‘ग्रीस, तूबाल व मेशेख यांनीही तुझ्याबरोबर व्यापार केला; त्यांनी तुझ्या मालाच्या मोबदल्यात मानवप्राणी व कास्याच्या वस्तू दिल्या.
14 “ ‘बेथ-तोगर्माहचे लोक तुझ्या मालाच्या मोबदल्यात स्वाराचे घोडे, युद्धाचे घोडे आणि खेचरे देत असत.
15 “ ‘ददानच्या[c] लोकांनी तुझ्याबरोबर व्यापार केला आणि पुष्कळ समुद्रतट तुझे ग्राहक होते; त्यांनी तुला मोबदला म्हणून हस्तिदंत आणि टेंबुरणीचे लाकूड दिले.
16 “ ‘तुझ्याकडील पुष्कळ उत्पादनांमुळे अरामने[d] तुझ्याबरोबर व्यापार केला; आणि तुझ्या मालाचा मोबदला म्हणून त्यांनी तुला नीलमणी, जांभळ्या तागाचे कापड, नक्षीकाम केलेले कापड, बारीक सूत, प्रवाळ व माणके दिली.
17 “ ‘यहूदाह व इस्राएलने तुझ्याबरोबर व्यापार केला; आणि तुझ्या मालाचे वेतन म्हणून त्यांनी तुला मिन्नीथचा गहू व मेवा, मध, जैतुनाचे तेल आणि मलम दिले.
18 “ ‘तुझ्या पुष्कळ उत्पादनांमुळे व महान संपत्तीमुळे दिमिष्कने तुझ्याबरोबर व्यापार केला. त्यांनी तुला हेल्बोनचा द्राक्षारस व झहारची लोकर 19 आणि यावान[e] येथील खास घडविलेले लोखंड, दालचिनी व वेत या तुझ्या मालाबद्दल इझालच्या द्राक्षारसाची पिंपे त्यांनी तुला देऊ केली.
20 “ ‘ददान तुझ्याबरोबर व्यापार करून तुला घोड्यावर पसरविण्यासाठी खोगीर देत असे.
21 “ ‘अरबी लोक व केदारचे सर्व राजपुत्र तुझे ग्राहक होते; त्यांनी तुला कोकरे, एडके व बोकडे देऊन तुझ्याबरोबर व्यापार केला.
22 “ ‘शबा आणि रामाहच्या व्यापारांनी तुझ्याबरोबर व्यापार केला; तुझ्या मालाचा मोबदला म्हणून त्यांनी तुला सर्वप्रकारचे उत्तम मसाले, मोलवान रत्ने व सोने दिले.
23 “ ‘हारान, कन्नेह आणि एदेन व शबा, अश्शूर व किलमाद येथील व्यापार्यांनी तुझ्याबरोबर व्यापार केला. 24 तुझ्या बाजारपेठेत त्यांनी सुंदर वस्त्रे, निळे कापड, नक्षीदार काम व दोर्यांनी वळवून घट्ट गाठ बांधलेले वेगवेगळ्या रंगाचे गालिचे देऊन तुझ्याबरोबर व्यापार केला.