15 पाहा मी आज तुमच्यापुढे जीवन व समृद्धी, मृत्यू व नाश ठेवले आहे. 16 आज मी तुम्हाला आज्ञा देत आहे की तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वरावर प्रीती करावी, आज्ञापूर्वक त्यांच्या मार्गात चालावे, आणि त्यांच्या आज्ञा, विधी व नियम पाळावे; म्हणजे तुम्ही जिवंत राहाल व तुमची वृद्धी होईल आणि जी भूमी तुम्ही ताब्यात घेण्यासाठी जात आहात, तिथे याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करतील.
17 परंतु तुमचे अंतःकरण फिरले आणि तुम्ही आज्ञा न पाळणारे झालात आणि जर तुम्ही इतर दैवतांकडे बहकून जाऊन त्यांना नमन कराल आणि त्यांची उपासना कराल, 18 तर मी आज तुम्हाला जाहीरपणे सांगतो की, तुम्ही निश्चितच नष्ट व्हाल. यार्देन ओलांडून ज्या भूमीत प्रवेश करण्यास आणि ताब्यात घेण्यासाठी तुम्ही जात आहात, त्यात तुम्हाला दीर्घायुष्य लाभणार नाही.
19 आकाश आणि पृथ्वी यांना तुमच्याविरुद्ध साक्षीला ठेवून आज मी तुमच्यापुढे जीवन आणि मृत्यू, आशीर्वाद आणि शाप, ही ठेवली आहेत. म्हणून तुम्ही जीवन निवडून घ्यावे म्हणजे तुम्ही आणि तुमची मुले जिवंत राहतील, 20 आणि तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वरावर प्रीती करावी, त्यांची वाणी ऐकावी आणि त्यांना बिलगून राहावे. कारण याहवेहच तुमचे जीवन आहेत आणि अब्राहाम, इसहाक आणि याकोब या तुमच्या पूर्वजांना वचन दिलेल्या देशात तेच तुम्हाला दीर्घायुष्य देतील.
<- अनुवाद 29अनुवाद 31 ->
Languages