14 आता मी तिसर्यांदा तुमच्या भेटीला येण्याची तयारी करत आहे; आणि मी तुम्हावर ओझे होणार नाही, कारण मला तुमची संपत्ती नको परंतु तुम्ही हवे आहात. तसे पाहिले तर, मुलांनी आपल्या आईवडिलांसाठी संचय करण्याची गरज नाही तर उलट आईवडिलांनीच आपल्या मुलांसाठी करावे. 15 मी तुम्हासाठी जे काही आहे ते आनंदाने सर्व खर्च करण्यासाठी तयार आहे आणि मला स्वतःसही खर्च करण्यास तयार आहे. जर मी तुमच्यावर अधिक प्रीती करतो, तर तुम्ही माझ्यावर कमी प्रीती करता का? 16 काही असो, मी तुमच्यावर ओझे झालो नाही. तरीही, मी धूर्त आहे आणि मी आपल्याला फसविले असे तुम्हाला वाटते का? 17 ज्या लोकांना मी तुमच्याकडे पाठविले त्यांच्याद्वारे मी तुमचा गैरफायदा घेतला का? 18 तीताला मी विनंती करून तुमच्या भेटीला पाठविले आणि त्याच्याबरोबर आमच्या भावाला पाठविले, तीताने तुमचा गैरफायदा घेतला का? कारण आम्ही एकाच आत्म्याच्या सारख्याच पावलांवर पाऊल टाकून चाललो नाही का?
19 आम्ही स्वतःच्या बचावासाठी हे करतो असे तुम्हाला वाटते का? आम्ही परमेश्वराच्या दृष्टीने जे ख्रिस्तामध्ये आहेत त्यांच्याशी बोलत आहोत. प्रिय मित्रांनो, जे काही आम्ही करतो ते तुमच्या वृद्धीसाठी आहे. 20 कारण मला अशी भीती वाटते की जेव्हा मी येईन, तेव्हा तुम्ही मला जसे पाहिजे तसे आढळणार नाही, आणि जसा तुम्हाला पाहिजे तसा मी तुम्हाला आढळणार नाही. मला भीती वाटते की तुम्हामध्ये भांडणे, द्वेष, राग, स्वार्थी आकांक्षा, निंदा, चहाड्या, आढ्यता आणि अव्यवस्था यांनी भरलेले असे आढळाल. 21 होय, मला वाटते की मी पुन्हा आलो की माझा परमेश्वर मला तुमच्यापुढे नम्र करेल आणि ज्या अनेकांनी पूर्वी पाप केलेले आहे आणि आपल्या हातून घडलेल्या अशुद्धता, लैंगिक पाप व कामातुरपणा, या गोष्टींबद्दल पश्चात्ताप केला नाही त्याबद्दल मला दुःख करावे लागेल.
<- 2 करिंथकरांस 112 करिंथकरांस 13 ->
Languages