Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
5
उडता पट
1 नंतर मी वळलो व डोळे वर करून पाहीले, आणि मला उडतांना एक पट दिसला. 2 त्या देवदूताने मला विचारले, “तुला काय दिसते?” मी उत्तर दिले, “मला उडता पट दिसत आहे, त्याची लांबी वीस हात व रूंदी दहा हात आहे.”

3 तेव्हा देवदूताने मला सांगितले, “त्या पटावर एक शाप लिहिला आहे आणि त्यावरील लेखानुसार प्रत्येक चोर यावरील एका बाजूस लिहीलेल्या शापानुसार देशातून घालवला जाईल आणि दुसऱ्या बाजूवरील लेखानूसार खोटी शपथ वाहणाऱ्या प्रत्येकाला देशातून घालवले जाईल.

4 सेनाधीश परमेश्वर म्हणतो: मी हा पट चोरांच्या आणि माझ्या नावाने खोटी वचने देणाऱ्या लोकांच्या घरी पाठवीन.
तो तेथेच राहील आणि त्या घरांचा नाश करील. दगड व लाकडी खांबांचासुध्दा नाश होईल.”
एफातली स्त्री
5 मग माझ्याशी बोलणारा देवदूत बाहेर गेला आणि मला म्हणाला, “तुझे डोळे वर करून बघ! काय येत आहे?” 6 मी विचारले, “ते काय आहे?” तो म्हणाला, “ती एक मापन-टोपली आहे. हे त्यांच्या संपूर्ण देशाच्या पापाचे *डोळ्यांचेरूपक आहे.” 7 मापन-टोपलीवरचे झाकण वर उचलेले होते आणि त्या मापन-टोपलीत एक स्त्री बसली होती.

8 देवदूत म्हणाला, “ही स्त्री दुष्टता आहे!” मग त्याने त्या तिला मापन-टोपलीच्या मध्यभागी टाकले आणि त्याने शिशाचे वजन मापन-टोपलीच्या मुखावर टाकले. 9 नंतर मी माझे डोळे वर केले व पाहिले, तर मला करकोच्यासारखे पंख असलेल्या दोन स्त्रिया दिसल्या. त्या उडाल्या, त्यांच्या पंखात वारा भरला होता. त्यांनी ती टोपली उचलून आकाश व पृथ्वी यांच्या मधून नेली.

10 मग माझ्याशी बोलणाऱ्या देवदूताला मी विचारले, “त्या ती टोपली कोठे घेऊन जात आहेत?” 11 देवदूत मला म्हणाला, “शिनार देशामध्ये त्या मापन-टोपलीसाठी एक मंदिर बांधण्यासाठी त्या जात आहेत. जेव्हा ते घर पूर्ण होईल तेव्हा ती टोपली तेथे ठेवतील.”

<- जखऱ्या 4जखऱ्या 6 ->