Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
3
मुख्य याजक यहोशवा ह्याचा दृष्टांत
1 देवदूताने मला दाखवले, मुख्य याजक यहोशवा परमेश्वराच्या दूतापुढे उभा होता आणि सैतान त्यास दोष करण्यासाठी त्याच्या उजवीकडे उभा होता. 2 मग परमेश्वराचा दूत सैतानाला म्हणाला, “सैताना, परमेश्वर तुला धमकावो. परमेश्वराने, त्याची खास नगरी म्हणून यरूशलेमची निवड केली आहे, तो तुला धमकावो. आगीतून कोलीत ओढून काढावे, तसा हा नाही काय?” 3 यहोशवा देवदूतापुढे मळकट वस्त्रे घालून उभा होता.

4 म्हणून जवळ उभ्या असलेल्या इतरांना हा देवदूत म्हणाला, “याच्यावरची मळकट वस्रे काढून घ्या.” नंतर तो देवदूत यहोशवाला बोलला, “आता, मी तुझी सर्व पापे काढून घेतली आहेत. आणि मी तुला भरजरी वस्त्रे नेसवत आहे.” 5 तो म्हणाला[a], “त्यांनी त्याच्या डोक्यावर स्वच्छ फेटा बांधावा” त्याप्रमाणे त्यांनी यहोशवाला स्वच्छ फेटा बांधला आणि परमेश्वराचा दूत तेथे उभा असतानाच त्यांनी त्यास स्वच्छ वस्त्रेसुध्दा घातली.

6 पुढे परमेश्वराच्या दूताने यहोशवाला गंभीरतेने आज्ञा केली आणि म्हणाला, 7 सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो,

“माझ्या मार्गात चालशील, आणि तू माझ्या आज्ञा पाळशील,
तर तूच माझ्या मंदिराचा मुख्य अधिकारी होशील आणि मंदिराच्या अंगणाची तू निगा राखशील.
माझ्यासमोर उभ्या असलेल्यामध्ये तुला जाता-येता येईल असे मी करीन.
8 तेव्हा हे यहोशवा मुख्य याजका, तू स्वत: व तुझ्यासमोर राहणाऱ्या सहकारी याजकांनो ऐका!
ही माणसे तर चिन्ह अशी आहेत, मी माझ्या सेवकाला आणतो, त्यास फांदी असे म्हणतील.
9 आता मी यहोशवापुढे ठेवलेला दगड पाहा. या एका दगडाला सात बाजू आहेत,
आणि मी त्यावर एक शिलालेख कोरीन. ‘हा सेनाधीश परमेश्वर आहे’
आणि मी एका दिवसात या देशातील अधर्म नाहीसा करीन.” असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.

10 सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “त्या दिवसात, प्रत्येक पुरुष आपल्या शेजाऱ्याला आपल्या अंजिराच्या झाडाखाली व द्राक्षवेलीखाली बसण्यासाठी बोलवील.”

<- जखऱ्या 2जखऱ्या 4 ->