Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
2
मापनसूत्राचा दृष्टांत
1 मग मी माझे डोळे वर करून पाहिले असता मापनसूत्र घेतलेला एक मनुष्य माझ्या दृष्टीस पडला. 2 तेव्हा मी त्यास विचारले, “तू कोठे चाललास?” तो मला म्हणाला, “मी यरूशलेमची मोजणी करायाला, तिची लांबी-रुंदी पाहण्यास जात आहे.” 3 मग माझ्याशी बोलत असलेला देवदूत निघून जात असता दुसरा देवदूत त्याच्याशी बोलायला गेला. 4 दुसरा देवदूत त्या पहिल्या देवदूताला म्हणाला, “धावत जा आणि त्या तरुणाशी बोल; त्यास सांग,
‘यरूशलेमेत मनुष्यांचे व गुराढोरांचे वास्तव्य
जास्त झाल्याने तटबंदी नसलेल्या गावाप्रमाणे तिच्यांत वस्ती होईल.’
5 परमेश्वर म्हणतो, ‘मी तिच्या सभोवती अग्नीची भिंत बनेन, आणि मी तिच्यामध्ये गौरवी तेज होईन.”
हद्दपार झालेल्यांना बोलावणे
6 परमेश्वर असे म्हणतो, “त्वरा करा, उत्तरेकडील प्रदेशातून पळून जा.
होय! मी तुम्हास आकाशाच्या चार वाऱ्याप्रमाणे चहूकडे पांगवले आहे.”
7 “अहो! बाबेलकन्येसोबत राहणाऱ्यांनो, सियोनेकडे पळून स्वतःचा बचाव करा!”
8 कारण, सेनाधीश परमेश्वराने माझे गौरव केले आणि तुम्हास लुटणाऱ्या राष्ट्रांविरूद्ध मला पाठवले आहे;
जो कोणी तुला स्पर्श करतो तो देवाच्या [a]डोळ्याच्या बुबुळाला स्पर्श करतो! परमेश्वराने हे केल्यानंतर, तो म्हणाला,
9 “मी आपला हात त्यांच्यावर उगारीन, आणि ते त्यांच्या गुलामांसाठी लूट होतील
तेव्हा तुम्हास कळेल की सेनाधीश परमेश्वराने मला पाठवले आहे.”
10 परमेश्वर असे म्हणतो, “हे सियोनकन्ये, हर्षित होऊन गा!
कारण मी स्वतः येईन व मी तुझ्यात वास्तव्य करीन.”
11 त्यानंतर त्या दिवसात पुष्कळ राष्ट्रे परमेश्वराकडे येऊन त्यास मिळतील. तो म्हणतो, “तेव्हा तुम्ही माझी प्रजा व्हाल;
कारण मी तुम्हामध्ये वस्ती करीन.” आणि मग तुला समजेल की मला तुझ्याकडे सेनाधीश परमेश्वराने पाठवले आहे.
12 स्वत:ची पवित्र नगरी म्हणून परमेश्वर यरूशलेमची फेरनिवड करील यहूदा म्हणजे परमेश्वराच्या पवित्र भूमीचा वाटा असेल.
13 लोकहो शांत राहा! कारण, परमेश्वर आपल्या पवित्र निवासातून येत आहे.

<- जखऱ्या 1जखऱ्या 3 ->