Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site

1 त्या दिवसात दावीदाच्या वंशासाठी आणि यरूशलेममध्ये राहणाऱ्या इतर लोकांसाठी पापे धुण्यासाठी आणि त्यांना शुध्द करण्यासाठी पाण्याचा नवा झरा फुटेल. 2 सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “त्यावेळी देशांतील सर्व मूर्तींचे मी उच्चाटन करीन. लोकांस त्यांची नावेसुध्दा आठवणार नाहीत. मी ढोंगी संदेष्ट्यांचा आणि अशुद्ध आत्म्यांचा नायनाट करीन.

3 एखाद्याने भविष्य वर्तविणे चालूच ठेवले, तर त्यास शिक्षा केली जाईल. त्याचे आईवडील ज्यांनी त्यास जन्म दिला ते त्यास म्हणतील, ‘परमेश्वराच्या नावाने तू खोटे बोललास तेव्हा तुला मरणाशिवाय गत्यंतर नाही.’ भविष्य वर्तविल्याबद्दल त्याचे आईवडील त्यास भोसकतील.

4 त्यावेळी प्रत्येक संदेष्ट्यांला स्वत:च्या दृष्टांताची आणि संदेशाची लाज वाटेल; आणि लोकांस फसवण्यासाठी ते केसांचा झगा घालणार नाहीत. 5 तेव्हा तो म्हणेल, ‘मी संदेष्टा नाही! मी शेतकरी आहे; मी लहानपणापासून शेतीच करीत आलो आहे.’ 6 पण इतर लोक त्यास विचारतील, ‘मग तुझ्या हातावर जखमा कसल्या?’ तेव्हा तो उत्तर देईल, ‘मित्राच्या घरात मला लागलेल्या माराचे हे वण होत!”

परमेश्वराच्या मेंढपाळावर प्रहार
7 सेनाधीश परमेश्वर म्हणतो,
“हे तलवारी, माझ्या मेंढपाळांवर प्रहार कर व माझ्या मित्रावर वार कर;
मेंढपाळावर वार कर म्हणजे मेंढरे पळून जातील
आणि मी त्या लहान जीवांना शिक्षा करीन.
8 परमेश्वर म्हणतो,
ते देशाचे दोन भाग नष्ट करतील आणि त्याचा तिसरा भाग मागे शेष राहील.
9 त्या तिसऱ्या भागाला मी अग्नीत टाकीन,
आणि चांदीला शुद्ध करताता तसे त्यांना शुद्ध करीन;
सोन्याची पारख करतात तसा मी त्यांना पारखीन.
ते माझा धावा करतील आणि मी त्यांना प्रतिसाद देईन.
मी म्हणेण, ‘हे माझे लोक आहेत.’
आणि ते म्हणतील, ‘परमेश्वर माझा देव आहे.’ ”

<- जखऱ्या 12जखऱ्या 14 ->