Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site

जखऱ्या
लेखक
जखऱ्या 1:1 जखऱ्या पुस्तकाच्या लेखकाला इद्दोचा मुलगा बरेख्याचा मुलगा जखऱ्या म्हणून ओळखते. इद्दो निर्वासित झालेल्या निर्वासित कुटुंबातील एक प्रमुख होता (नहेम्या 12:4, 16). जेव्हा त्याचे कुटुंब यरूशलेमला परतले, तेव्हा जखऱ्याला कदाचित एक मुलगा झाला असेल. त्याच्या कुटुंबाच्या घराण्यामुळे, जखऱ्या संदेष्टा याशिवाय एक याजक होता. त्यामुळे, त्याने संपूर्ण मंदिरामध्ये कधीही काम केले नसले तरी तो यहूदी लोकांच्या आराधनेशी पूर्णपणे परिचित होता.
तारीख आणि लिखित स्थान
साधारण इ. पू. 520 - 480.
हे बाबेलमध्ये बंदिवासातून (निर्वासित) परतल्यानंतर लिहिण्यात आले. मंदिर पूर्ण होण्याआधी संदेष्टा जखऱ्याने अध्याय 1-8 लिहीले आणि नंतर मंदिर पूर्ण झाल्यानंतर अध्याय 9-14 लिहिले.
प्राप्तकर्ता
यरूशलेममध्ये राहणारे लोक आणि जे लोक इस्त्राएल राष्ट्रातून आले होते त्यांच्यापैकी काही जण होते.
हेतू
उरलेल्या लोकांना जखऱ्या लिहिण्याचा उद्देश त्यांना आशा आणि समज देणे आणि त्यांच्या येणाऱ्या ख्रिस्ताकडे पाहावे जो ख्रिस्त येशू आहे. जखऱ्याने यावर भर दिला की देवाने आपल्या संदेष्ट्यांना शिकवण्याकरिता, लोकांना सावध करण्यासाठी आणि त्यांच्या शिकवणींमध्ये सुधारणा करण्यासाठी वापरले आहे. दुर्दैवाने त्यांनी ऐकण्यास नकार दिला. त्यांच्या पापाने देवाच्या शिक्षेस आणले. पुस्तक देखील पुरावे देते की भविष्यवाणीसुद्धा भ्रष्ट होऊ शकते.
विषय
परमेश्वराचा उध्दार
रूपरेषा
1. पश्चात्तापासाठी बोलावणे — 1:1-6
2. जखऱ्याचा दृष्टांत — 1:7-6:15
3. उत्सवासंबंधित प्रश्न — 7:1-8:23
4. भविष्यातील भार — 9:1-14:21

1
परमेश्वराकडे वळण्याचे आवाहन
1 पारसाचा राजा दारयावेश[a] याच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षाच्या आठव्या महिन्यात, जखऱ्या, जो बरेख्याचा मुलगा, जो इद्दोचा मुलगा, त्यास परमेश्वराकडून वचन प्राप्त झाले ते असे, 2 परमेश्वर तुमच्या पूर्वजांवर फार रागावला होता. 3 तर त्यांना असे सांग, सैन्यांचा परमेश्वर असे म्हणतो:
“तुम्ही माझ्याकडे फिरा!” हे सैन्यांच्या परमेश्वराचे वचन आहे;
“म्हणजे मी तुमच्याकडे फिरेन.” असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.

4 संदेष्टे तुमच्या पूर्वजांना पूर्वी संदेश देत म्हणाले, “सैन्याचा देव असे म्हणतो: आपल्या दुष्ट मार्गांपासून आणि वाईट चालीरितींपासून वळा!” परंतु त्यांनी ऐकले नाही आणि माझ्याकडे लक्ष दिले नाही. त्या पूर्वजांसारखे होऊ नका. ही परमेश्वराची वाणी होय.

5 “तुमचे पूर्वज, कोठे आहेत? आणि संदेष्टे देखील सर्वकाळाकरता येथे राहतील काय?
6 परंतु मी माझ्या ज्या वचनांनी आणि माझ्या ज्या नियमांनी माझे दास, जे माझे संदेष्टे त्यांना आज्ञापिले,
ती तुमच्या पूर्वजांवर आली नाहीत काय?”
तेव्हा त्यांनी पश्चाताप केला व म्हणाले, “सेनाधीश परमेश्वराच्या योजना या त्याचे वचन आणि त्याची कामे यांच्यानुसार आहेत, त्या त्याने पूर्णतेस नेल्या आहेत.”
संदेष्ट्याला घोड्यांचा दृष्टांत
7 दारयावेश ह्याच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षाच्या अकराव्या म्हणजे शबाट महिन्याच्या चोविसाव्या दिवशी जखऱ्या, जो बरेख्याचा मुलगा, जो इद्दोचा मुलगा याला, परमेश्वराचा संदेश प्राप्त झाला तो असा: 8 “रात्र असतांना मला दृष्टांतात दिसले ते असे: तांबड्या घोड्यावर आरुढ झालेला एक मनुष्य मी पाहिला आणि तो दरीतल्या मेंदीच्या झुडुपांमध्ये उभा होता. त्याच्यामागे तांबड्या, तपकिरी आणि पांढऱ्या रंगाचे घोडे होते.” 9 मी विचारले, “प्रभू, हे कोण आहेत?” तेव्हा माझ्याशी बोलत असलेला देवदूत मला म्हणाला, “हे कोण आहेत ते मी तुला दाखवतो.”

10 मग मेंदीच्या झुडुपांमध्ये उभा असलेल्या मनुष्याने उत्तर दिले व म्हणाला, “पृथ्वीवर इकडे तिकडे संचार करायला परमेश्वराने हे पाठवले आहेत.” 11 नंतर त्यांनी मेंदीच्या झुडुपांत उभ्या असलेल्या परमेश्वराच्या दिव्यदूताला उत्तर दिले व ते म्हणाले, “आम्ही पृथ्वीवर इकडे तिकडे फिरलो आणि पाहा संपूर्ण पृथ्वी शांत व विसावली आहे.” 12 मग परमेश्वराच्या दिव्यदूताने उत्तर देऊन म्हटले, “हे सेनाधीश परमेश्वरा, या सत्तर वर्षांपासून यरूशलेमेचे आणि यहूदातील नगरांनी जो क्रोध सहन केला आहे त्याविषयी आणखी किती काळ तू करूणा करणार नाहीस?” 13 माझ्याशी बोलत असलेल्या परमेश्वराच्या देवदूताला परमेश्वर चांगल्या शब्दांत व सांत्वन देणाऱ्या शब्दांत बोलला.

14 मग माझ्याशी बोलणाऱ्या परमेश्वराचा दूत मला म्हणाला, “घोषणा करून सांग की, ‘सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो:

“मी यरूशलेम व सियोन यांच्यासाठी अती ईर्षावान असा झालो आहे!
15 आणि स्वस्थ बसलेल्या राष्ट्रांवर माझा राग पेटला आहे;
कारण मी तर थोडासाच रागावलो होतो, पण या राष्ट्रांनी त्यांच्या दुःखात आणखी भर घालण्याची मदत केली.”
16 म्हणून परमेश्वर असे म्हणतो, “मी यरूशलेमेकडे करुणामय होऊन परत फिरलो आहे. माझे निवासस्थान तिच्यात पुन्हा बांधले जाईल.”
सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “मापनसूत्र यरूशलेमेवर लावण्यात येईल.”
17 पुन्हा पुकार आणि असे सांग, “सेनाधीश परमेश्वर म्हणतो: ‘माझी नगरे पुन्हा एकदा चांगूलपणाने भरभरून वाहतील,
परमेश्वर पुन्हा सियोनचे सांत्वन करील, आणि तो पुन्हा एकदा यरूशलेमची निवड करील.”
शृंगे व लोहार ह्यांचा दृष्टांत
18 मग मी माझे डोळे वर करून पाहिले आणि मला चार शिंगे दिसली! 19 माझ्याशी बोलत असलेल्या देवदूताला मी म्हणालो, “ही काय आहेत?” त्याने मला उत्तर दिले, “इस्राएल, यहूदा व यरूशलेम यांना ज्या शिंगांनी विखरले ती ही आहेत.”

20 मग परमेश्वराने मला चार लोहार दाखवले. 21 मी विचारले, “हे लोक येथे काय करण्यासाठी आहेत?” त्याने उत्तर दिले आणि म्हणाला, “ज्या शिंगांनी यहूदाच्या लोकांस विखरले आणि कोणाही मनुष्यांस डोके वर करू दिले नाही. परंतू त्या शिगांना घालवून देण्यासाठी ते आले आहेत, ती शिंगे म्हणजे यहूदाच्या लोकांवर हल्ला करून त्यांना परागंदा करणाऱ्या राष्ट्रांची शिंगे होत.”

जखऱ्या 2 ->