Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
7
1 (त्या स्त्रीचा प्रियकर तिच्याशी बोलतो) हे राजकन्ये, त्या चपलांमधे तुझे पाय सुंदर दिसतात.
कुशल कारागिराच्या हातच्या दागिन्यासारखा
तुझ्या माड्यांचा बांक आहे.
2 तुझी बेंबी गोल कपासारखी आहे,
त्यामध्ये मिश्र द्राक्षरसातील उणीव कधीही नसावी.
तुझे पोट सभोवती कमलपुष्ये ठेवलेल्या गव्हाच्या राशीसारखे आहे.
3 तुझी वक्षस्थळे तरुण हरिणीच्या जुळ्या पाडसांसारखी आहेत.
4 तुझी मान हस्तिदंती मनोऱ्यासारखी आहे.
तुझे डोळे बाथ-रब्बीमच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या हेशबोनच्या तळ्यांसारखे आहेत.
तुझे नाक दिमिष्काकडे बघणाऱ्या लबानोनाच्या मनोऱ्यासारखे आहे.
5 तुझे मस्तक कर्मेलासारखे आहे;
आणि तुझ्या मस्तकावरचे केस जांभळ्या रेशमासारखे आहेत.
तुझे लांब मोकळे केस राजालासुध्दा बांधून ठेवतात.
वधूवराचा आनंद
6 अगे प्रिये, आनंदाकरता तू किती सुंदर आहेस
व किती गोड आहेस.
7 तुझी उंची खजुरीच्या झाडासारखी
आणि तुझे वक्ष त्याच्या फळांच्या घोसासारखे आहेत.
8 मी विचार केला, मी खजुरीच्या झाडावर चढेन,
त्याच्या फांद्यांना धरीन.
तुझी वक्षस्थळे द्राक्षाच्या घोसासारखी
आणि तुझ्या श्वासाचा सुगंध सफरचंदासारखा असू दे.
9 तुझे चुंबन सर्वात उंची द्राक्षरसाप्रमाणे आहे.
तो घशात नीट उतरतो व झोपलेल्यांच्या ओठांवरून सहज गळतो.
10 (ती तरुण स्त्री आपल्या प्रियकराबरोबर बोलते) मी आपल्या प्रियकराची आहे, त्याचे मन माझ्यावर बसले आहे.
11 माझ्या प्रियकरा, ये आपण बाहेर पटांगणांत जाऊ.
आपण खेड्यात रात्र घालवू.
12 आपण सकाळी लवकर उठून द्राक्षाच्या मळ्यात जाऊ.
द्राक्षाच्या वेली फुलल्या आहेत की नाहीत ते पाहू.
आणि जर डाळिंब बहरत असतील तर प्रियकरा,
तेथे मी तुला माझे प्रेम अर्पण करीन.
13 पुत्रदात्रीचा*एका झाडाचे खूप मधुर सुवास देणारे फुल, ज्यापासून लैंगिक इच्छा जागृत करणारे आणि प्रजनन क्षमता वाढवणारे फळ तयार होते असे मानले जाते. सुवास सुटला आहे,
आणि आपल्या दाराजवळ नाना प्रकारची नव्या जुन्या बारांची उत्तम फळे आली आहेत.
माझ्या प्राणप्रिया ती मी तुझ्यासाठी जतन करून ठेवली आहेत.

<- गीतरत्न 6गीतरत्न 8 ->