1 (स्त्रीचा प्रियकर तिच्याशी बोलत आहे) माझे बहिणी, माझे वधू, मी माझ्या बागेत गेलो.
मी माझा गंधरस व माझी सुगंधी द्रव्ये जमा केली आहेत.
मी माझा मध मधाच्या पोळ्यासहीत खाल्ला आहे.
मी माझा द्राक्षरस व दूध प्यालो आहे.
मित्रांनो, खा.
माझ्या प्रियांनो; प्या, मनसोक्त प्या.
विरहाग्री
2 (ती तरुणी स्वतःशी बोलते) मी झोपलेली आहे. पण माझे हृदय स्वप्नात जागे आहे.
माझा प्रियकर दार वाजवतो आणि म्हणतो,
माझे बहिणी, माझ्या प्रिये, माझ्या कबुतरा, माझ्या विमले! माझे डोके दहिवराने ओले झाले आहे.
माझे केस रात्रीच्या दवबिंदूने ओलसर झाले आहेत.
3 (तरुण स्त्री स्वतःशी बोलते) मी माझा पोषाख काढून टाकला आहे. तो पुन्हा मी कसा अंगात घालू?
मी माझे पाय धुतले आहेत. ते मी कसे मळवू?
4 पण माझ्या प्रियकराने फटीतून हात घातला,
आणि माझे हृदय त्याच्यासाठी कळवळले.
5 माझ्या प्रियकराला दार उघडायला मी उठले.
तेव्हा माझ्या हातास
दाराच्या कडीवरील गंधरस लागला.
माझ्या बोटांवरून त्याचा द्रव गळत होता.
6 मी माझ्या प्रियकरासाठी दार उघडले.
पण माझा प्रियकर तोंड फिरवून निघून गेला होता.
तो गेला तेव्हा माझा जीव गळून गेला.
मी त्यास शोधले पण तो मला सापडला नाही.
मी त्यास हाक मारली पण त्याने मला उत्तर दिले नाही.
7 शहरावर पहारा करणाऱ्या पहारेकऱ्यांना मी दिसले.
त्यांनी मला मारले, जखमी केले.
कोटावरच्या पहारेकऱ्यांनी माझा अंगरखा घेतला.
8 (ती स्त्री त्या शहरातील स्त्रियांशी बोलत आहे) यरूशलेमेच्या कन्यांनो! मी तुम्हास शपथ घालून सांगते,
जर तुम्हास माझा प्रियकर सापडला,
तर कृपाकरून त्यास सांगा की, मी प्रेमामुळे आजारी झाले आहे.
वधूकडून वराची प्रशंसा
9 (त्या शहरातील स्त्रिया त्या तरुणीशी बोलत आहेत) अगे स्त्रियांतील सर्वात सुंदरी!
तुझा प्रियकर इतर प्रियकरांहून अधिक चांगला आहे तो कसा काय?
तू आम्हास अशी शपथ घालतेस तर तुझ्या प्रियकरांत इतरांपेक्षा अधिक ते काय आहे?
10 (तरुणी त्या शहरातील स्त्रियांशी बोलत आहेत) माझा प्रियकर गोरापान व लालबुंद *शूरवीरआहे.
तो दहा हजारात श्रेष्ठ आहे†त्याच्या समान कोणी नाही.
11 त्याचे मस्तक शुध्द सोन्याप्रमाणे आहे.
त्याचे केस कुरळे आहेत आणि डोंमकावळ्यासारखे काळे आहेत.
12 त्याचे डोळे झऱ्याजवळच्या कबुतरासारखे आहेत,
दुधात धुतलेल्या कबुतरासारखे आहेत, कोदंणात जडलेल्या मोलवान खड्यासारखे आहेत.
13 त्याचे गाल सुगंधी झाडाचे वाफे,
सुगंधी फुलझाडांचे ताटवे असे आहेत,
अत्तरासाठी वापरण्यात येणाऱ्या फुलांसारखे आहेत.
त्याचे ओठ कमलपुष्पाप्रमाणे असून त्यातून गंधरस स्रवतो.
14 त्याचे हात रत्नांनी जडवलेल्या सोन्याच्या कांबीप्रमाणे आहेत.
त्याचे पोट नीलमणी जडवलेल्या मऊ हस्तिदंतफलकासारखे आहे.
15 त्याचे पाय सोन्याचा पाया असलेल्या संगमरवरी खांबासारखे आहेत.
त्याचे रुप लबानोनासारखे आहे. ते गंधसरू झाडासारखे उत्कृष्ट आहे.
16 होय, यरूशलेमेच्या कन्यांनो,
माझा प्रियकर हाच माझा सखा आहे.
त्याची वाणी सर्वांत गोड आहे.