Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site

गीतरत्न
लेखक
गीतरत्न या पुस्तकाचे शिर्षक पहिल्या वचनातून ठरते, ज्यामध्ये असे म्हटले आहे की गीत कोणाकडून येते: “गीतरत्न, जे शलमोनाचे” (1:1). पुस्तकाचे शीर्षक अखेरीस राजा शलमोनाच्या नावावर घेतले कारण त्याच्या नावाचा उल्लेख संपूर्ण पुस्तकात आहे (1:15; 3:7, 9, 11; 8:11-12).
तारीख आणि लिखित स्थान
साधारण इ. पू. 971 - 965.
शलमोनाने इस्त्राएलचा राजा म्हणून हे पुस्तक लिहिले, शलमोनाच्या लेखकत्वाकडे असलेल्या विद्वानांनी हे कबूल केले की हे गीत कारकिर्दीच्या सुरुवातीलाच लिहिण्यात आले होते, केवळ कवितेच्या तरूणांच्या उत्स्फूर्ततेमुळे नव्हे तर लेखकांनी लबानोन आणि मिसरासह देशाच्या उत्तरेकडील आणि दक्षिणेस दोन्ही ठिकाणाची नावे सांगितली आहेत.
प्राप्तकर्ता
विवाहित जोडपे आणि वैवाहिक चिंतन करणारे अविवाहित.
हेतू
शलमोनाचे हे गीत म्हणजे प्रेमाचे गुण वाढविण्याकरीता लिहिलेली गोड कविता आहे आणि हे स्पष्टपणे विवाहाला परमेश्वराची आखणी म्हणून प्रस्तुत करते. एक स्त्री आणि पुरुष विवाहाच्या संदर्भात एकमेकांसोबत एकत्र राहणे, एकमेकांना आध्यात्मिक, भावनिक आणि शारीरिकरीत्या प्रेम करणे.
विषय
प्रेम आणि विवाह
रूपरेषा
1. वधू शलमोनाबद्दल विचार करते — 1:1-3:5
2. लग्नासाठी वधूची स्वीकृती आणि लग्नाची अपेक्षा — 3:6-5:1
3. वधू वराला गमावण्याचे स्वप्न पाहते — 5:2-6:3
4. वधू आणि वर एकमेकांची प्रशंसा करतात — 6:4-8:14

1
वधू व यरूशलेमकन्या
1 हे शलमोनाचे गीतरत्न आहे:
2 (तरुणी आपल्या प्रियकराशी बोलत आहे) तू माझे मुखचुंबन घे[a],
कारण तुझे प्रेम द्राक्षरसापेक्षा उत्तम आहे.
3 तुझ्या अभिषेकाच्या तेलाचा सुगंध मोहक आहे,
तुझे नाव दरवळणाऱ्या सुवासासारखे आहे. त्यामुळेच तरुणी तुझ्यावर प्रेम करतात.
4 मला तुझ्याबरोबर ने आणि आपण पळून जाऊ.
(तरुणी स्वतःशीच बोलते) राजाने मला त्याच्या अंतःपुरात आणले आहे.
(तरुणी तिच्या प्रियकराबरोबर बोलत आहे) मी आनंदीत आहे. मी तुझ्याविषयी आनंदीत आहे. मला तुझे प्रेम साजरे करू दे. ते द्राक्षरसापेक्षा चांगले आहे.
5 (ती स्त्री दुसऱ्या स्त्रीबरोबर बोलते) अहो, यरूशलेमेच्या कन्यांनो, मी काळीसावळी पण सुंदर आहे.
मी केदारच्या [b]तंबूसारखी काळी आणि
शलमोनाच्या पडद्यासारखी सुंदर आहे.
6 मी काळी आहे म्हणून माझ्याकडे टक लावून पाहू नका.
कारण सूर्याने मी होरपळले आहे.
माझे स्वतःचे भाऊ[c] माझ्यावर रागावले होते.
त्यांनी मला द्राक्षांच्या मळ्याची राखण करण्यास ठेवले.
परंतु मी आपल्या स्वत:च्या द्राक्षमळ्याची काळजी घेतली नाही.
7 (ती स्त्री तिच्या प्रियकराबरोबर बोलत आहे) माझ्या जीवाच्या प्रियकरा, मला सांग:
तो तू तुझा कळप कोठे चारतोस?
तू तुझ्या कळपाला दुपारी कोठे विसावा देतोस?
तुझ्या सोबत्यांच्या कळपाजवळ भटकणाऱ्यांसारखी मी का व्हावे?
8 (तिचा प्रियकर तिला उत्तर देतो) हे परम सुंदरी,
जर तुला काय करायचे ते माहीत नाही तर
माझ्या कळपाच्या मागे जा.
तुझ्या लहान बकऱ्यांना मेंढपाळाच्या तंबूजवळच्या कुरणात चार.
वधूवर
9 माझ्या प्रिये, फारोच्या रथाच्या घोड्यांतल्या एका घोडीशी मी तुझी तुलना करतो.
10 तुझे सुंदर गाल सोन्याने अलंकृत केले आहेत.
तुझी मान मोत्यांच्या हारांनी सुंदर दिसत आहे.
11 मी तुझ्यासाठी चांदीचे टिके लाविलेले
सोन्याचे दागिने करेन.
12 (ती स्त्री स्वतःशीच बोलते) राजा आपल्या पलंगावर [d]असता
माझ्या जटामांसीचा सुगंध पसरला.
13 माझ्या वक्षस्थळांमध्ये रात्रभर विसावलेला,
माझा प्रियकर माझ्या गळ्यात असलेल्या गंधरसाच्या पुडीसारखा मला आहे.
14 माझा प्रियकर एन-गेदी[e]मधील
द्राक्षाच्या मळ्याजवळील मेंदीच्या फुलांच्या गुच्छासारखा आहे.

15 (तिचा प्रियकर तिच्याशी बोलतो) पाहा माझ्या प्रिये, तू किती सुंदर आहेस!

तू फारच सुंदर आहेस.
तुझे डोळे कबुतरासारखे आहेत.
16 (तरुणी आपल्या प्रियकराशी बोलते) पाहा, माझ्या प्रियकरा, तू देखणा आहेस, तू किती देखणा आहेस.
आपला बिछाना किती आल्हाददायक आणि सुखावह आहे.
17 आपल्या घराच्या तुळ्या गंधसरूच्या लाकडाच्या आहेत.
आणि छताचे वासे देवदारुच्या लाकडाचे आहे.

गीतरत्न 2 ->