Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
5
विश्वासाचा परिणाम
1 आता आपण विश्वासाने नीतिमान ठरवले गेलो आहोत म्हणून आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे देवाबरोबर शांती आहे. 2 आपण उभे आहोत त्या कृपेतही त्याच्याद्वारे विश्वासाने आपल्याला प्रवेश मिळाला आहे व आपण देवाच्या गौरवाच्या आशेत अभिमान मिरवतो. 3 आणि इतकेच नाही तर आपण संकटांतही अभिमान मिरवतो; कारण आपण जाणतो की संकट धीर उत्पन्न करते, 4 आणि धीर प्रचीती व प्रचीती आशा उत्पन्न करते. 5 आणि आशा लज्जित करीत नाही; कारण आपल्या अंतःकरणात आपल्याला दिलेल्या पवित्र आत्म्याच्याद्वारे देवाची प्रीती ओतली जात आहे.
ख्रिस्ताच्या मृत्युने प्रकट झालेली देवाची प्रीती
6 कारण आपण दुर्बळ असतानाच ख्रिस्त यथाकाळी अभक्तांसाठी मरण पावला. 7 कारण एखाद्या नीतिमान मनुष्यासाठी क्वचित कोणी मनुष्य मरेल कारण एखाद्या चांगल्या मनुष्यासाठी कदाचीत कोणी मरण्याचेही धाडस करील, 8 पण आपण पापी असताना ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला, ह्यात देव त्याची आपल्यावरील प्रीती प्रस्थापित करतो. 9 मग आता आपण त्याच्या रक्ताने नीतिमान ठरवले गेलो आहोत, तर त्याहून अधिक हे आहे की त्याच्याद्वारे आपण देवाच्या क्रोधापासून तारले जाऊ. 10 कारण आपण वैरी होतो, तेव्हा जर आपला देवाबरोबर, त्याच्या पुत्राच्या मरणाने समेट केला गेला, तर त्याहून अधिक हे आहे की, आपला समेट केला गेल्यामुळे त्याच्या जीवनाने आपण निश्चित तारले जाऊ. 11 इतकेच नाही, पण आता ज्याच्या द्वारे आपण समेट स्वीकारला आहे तो आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे आपण देवाच्या ठायी अभिमान मिरवतो.
आदामाकडून मृत्यु, ख्रिस्ताकडून जीवन
उत्प. 3:1-19

12 म्हणून एका मनुष्याद्वारे जगात पाप आले व पापाद्वारे मरण आले आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व मनुष्यांवर मरण आले. 13 करण नियमशास्त्रापुर्वी जगात पाप होते, पण नियमशास्त्र नसतेवेळी पाप हिशोबात येत नाही. 14 तरी मरणाने आदामापासून मोशेपर्यंत राज्य केले; आदामाच्या उल्लंघनाच्या रूपाप्रमाणे ज्यांनी पाप केले नव्हते त्यांच्यावरही राज्य केले आणि तो तर जो पुढे येणार होता त्याचा नमुना होता. 15 पण अपराधाची गोष्ट आहे तशी कृपादानाची नाही; कारण एकाच्या अपराधामुळे जर पुष्कळ मरण पावले, तर त्याहून अधिक हे आहे की, देवाची कृपा व येशू ख्रिस्त या एका मनुष्याच्या कृपेची देणगी पुष्कळांसाठी विपुल झाली. 16 आणि पाप करणार्‍या एकामुळे जसा परिणाम झाला, तशी देणगीची गोष्ट नाही; कारण एका अपराधामुळे दंडाज्ञेसाठी न्याय आला, पण अनेक अपराधांमुळे निर्दोषीकरणासाठी कृपादान आले. 17 कारण मरणाने, एका अपराधामुळे, एकाच्या द्वारे राज्य केले, तर त्याहून अधिक हे आहे की, जे कृपेची व नीतिमत्त्वाच्या देणगीची विपुलता स्वीकारतात, ते त्या एकाच्या, म्हणजे येशू ख्रिस्ताच्या द्वारे जीवनात राज्य करतील. 18 म्हणून जसे एकाच अपराधामुळे सर्व मनुष्यांना दंडाज्ञा ठरविण्यास कारण झाले, तसे एकाच निर्दोषीकरणामुळे सर्व मनुष्यांना जीवनासाठी नीतिमान ठरविण्यास कारण झाले. 19 कारण जसे एकाच्या आज्ञाभंगामुळे अनेक जण पापी ठरवले गेले, तसे एकाच्या आज्ञापालनामुळे अनेक जण नीतिमान ठरवले जातील. 20 शिवाय, अपराध वाढावा म्हणून नियमशास्त्र आत आले. पण जेथे पाप वाढले तेथे कृपा अधिक विपुल झाली. 21 म्हणजे, जसे पापाने मरणाच्या योगे राज्य चालविले तसे कृपेने नीतिमत्त्वाच्या योगे प्राप्त होणार्‍या सार्वकालिक जीवनासाठी आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे राज्य चालवावे.

<- रोमकरांस पत्र 4रोमकरांस पत्र 6 ->