Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
14
विश्वासात दुर्बळ असलेल्यांशी सहिष्णुता
1 जो विश्वासात दुर्बळ आहे त्याचा स्वीकार करा, पण त्याच्या मतभेदाविषयी वाद करण्यास नाही. 2 कोणी असा विश्वास ठेवतो की, आपण सर्वकाही खावे, दुसरा कोणी जो दुर्बळ आहे तो भाजीपाला खातो. 3 जो खातो त्याने न खाणार्‍यास तुच्छ लेखू नये; आणि जो खात नाही त्याने खाणार्‍यास दोष लावू नये; कारण देवाने त्याचा स्वीकार केला आहे. 4 दुसर्‍याच्या नोकराला दोष लावणारा तू कोण आहेस? तो आपल्या धन्यापुढे उभा राहील किंवा पडेल. हो, तो स्थिर केला जाईल; कारण धनी त्यास स्थिर करण्यास समर्थ आहे. 5 आणि कोणी एखादा दिवस दुसर्‍या दिवसाहून अधिक मानतो; दुसरा कोणी सगळे दिवस सारखे मानतो. प्रत्येक मनुष्याने स्वतःच्या मनात पूर्ण खातरी होऊ द्यावी. 6 जो दिवस मानतो त्याने प्रभूसाठी मानावे आणि जो खातो तोसुध्दा प्रभूसाठी खातो, कारण तो देवाचे उपकार मानतो; त्याचप्रमाणे जो खात नाही तो प्रभूसाठी खात नाही आणि देवाचे उपकार मानतो. 7 कारण आपल्यातला कोणीही स्वतःकरता जगत नाही व कोणीही स्वतःकरता मरत नाही. 8 कारण आपण जगलो तरी प्रभूकरता जगतो आणि आपण मरण पावलो तरी प्रभूकरता मरतो म्हणून आपण जगलो किंवा मरण पावलो तरी प्रभूचे आहोत. 9 कारण ख्रिस्त मरण पावला आणि पुन्हा जिवंत झाला तो ह्यासाठी की, त्याने मृतांचा व जिवंतांचाही प्रभू असावे. 10 मग तू आपल्या बंधूला दोष का लावतोस? किंवा तू आपल्या बंधूला तुच्छ का लेखतोस? कारण, आपण सगळे जण देवाच्या न्यायासनासमोर उभे राहणार आहोत. 11 कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की,
‘प्रभू म्हणतो, मी जिवंत आहे म्हणून, प्रत्येक गुडघा मला नमन करील,
आणि प्रत्येक जीभ देवाचे स्तवन करील.’

12 तर मग आपल्यातला प्रत्येकजण देवाला आपआपला हिशोब देईल. 13 तर आपण ह्यापुढे एकमेकांना दोष लावू नये. पण असे ठरवू की, कोणीही आपल्या बंधूच्या मार्गात अडखळण किंवा पडण्यास कारण होईल असे काही ठेवू नये. 14 मी जाणतो व प्रभू येशूमुळे मी मानतो की, कोणतीही गोष्ट मूळची अशुद्ध नाही, पण जो कोणी कोणतीही गोष्ट अशुद्ध मानतो त्यास ती अशुद्ध आहे. 15 पण जर तुझा बंधू तुझ्या अन्नामुळे दुःखी होतो तर तू आता प्रीतीस अनुसरून चालत नाहीस असे झाले. ज्याच्यासाठी ख्रिस्त मरण पावला त्याचा तुझ्या अन्नामुळे तू नाश करू नकोस. 16 म्हणून तुम्ही जे चांगले स्वीकारले आहे त्याची निंदा होऊ देऊ नका. 17 कारण खाणे किंवा पिणे ह्यात देवाचे राज्य नाही; पण नीतिमत्त्व, शांती व पवित्र आत्म्यातील आनंद ह्यात आहे. 18 कारण जो ह्याप्रमाणे ख्रिस्ताची सेवा करतो तो देवाला स्वीकार्य व मनुष्यांनी स्वीकृत केलेला होतो. 19 तर आपण ज्या गोष्टी शांतीसाठी व एकमेकांच्या उभारणीसाठी उपयोगी आहेत त्यांच्यामागे लागू या. 20 अन्नाकरता देवाचे काम तू नष्ट करू नकोस; सर्व गोष्टी खरोखर खाण्यायोग्य आहेत; पण जो मनुष्य दुसर्‍याला अडखळण करून खातो त्यास ते वाईट आहे. 21 मांस न खाणे किंवा द्राक्षरस न पिणे किंवा तुझ्या बंधूला ज्यामुळे अडखळण होते असे काहीही न करणे चांगले आहे. 22 तुझ्यात विश्वास आहे, तो तू देवासमोर आपल्याजवळ बाळग. जो स्वतः पसंत केलेल्या गोष्टींत स्वतःला दोषी ठरवीत नाही तो धन्य होय. 23 पण जो मनुष्य संशय धरतो त्याने खाल्ले तर तो दोषी ठरतो; कारण ते विश्वासाने खाल्लेले नाही कारण जे विश्वासाने केलेले नाही ते पाप आहे.

<- रोमकरांस पत्र 13रोमकरांस पत्र 15 ->