Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
6
शिक्के फोडण्यात आले
1 मग कोकऱ्याने सात शिक्क्यांपैकी एक शिक्का फोडला ते मी पाहिले आणि त्या चार प्राण्यातील एकाने मेघगर्जनेसारख्या वाणीने ये असे म्हणताना ऐकले. 2 मी एक पांढरा घोडा पाहिला, त्यावर जो बसला होता त्याच्याजवळ धनुष्य होते आणि त्यास मुकुट देण्यात आला. तो जिंकीत विजयावर विजय मिळविण्यास निघाला.

3 जेव्हा कोकऱ्याने दुसरा शिक्का उघडला, तेव्हा दुसऱ्या जिवंत प्राण्याला ये असे म्हणताना ऐकले. 4 नंतर दुसरा घोडा निघाला, तो अग्निज्वालेप्रमाणे लाल होता. त्यावर जो बसलेला होता त्यास पृथ्वीवरील शांती नाहीशी करण्याचा अधिकार दिला होता. यासाठी की, लोकांनी एकमेकास वधावे. त्यास मोठी तलवार देण्यात आली होती.

5 जेव्हा कोकऱ्याने तिसरा शिक्का उघडला, तिसऱ्या जिवंत प्राण्याला “ये” असे म्हणतांना ऐकले तेव्हा मी काळा घोडा पाहिला आणि त्यावर जो बसलेला होता त्याच्या हातात तराजू होते. 6 मी चार प्राण्यांच्यामधून निघालेली वाणी ऐकली, ती म्हणत होती, एका चांदीच्या नाण्याला शेरभर गहू आणि एका चांदीच्या नाण्याला तीन शेर जव. परंतु तेल व द्राक्षरस यांची हानी करू नकोस.

7 कोकऱ्याने जेव्हा चौथा शिक्का उघडला, तेव्हा मी चौथ्या जिवंत प्राण्याची वाणी “ये” म्हणताना ऐकली. 8 नंतर मी फिकट रंगाचा घोडा पाहिला. त्यावर जो बसलेला होता त्याचे नाव मरण होते; आणि मृतलोक त्याच्या पाठीमागून त्याच्याबरोबर चालला होता. त्यांना तलवारीने, दुष्काळाने, रोगाने व पृथ्वीवरील श्वापदांकडून मनुष्यांना जिवे मारण्याचा अधिकार पृथ्वीच्या चौथ्या भागावर देण्यात आला होता.

9 जेव्हा कोकऱ्याने पाचवा शिक्का उघडला तेव्हा मी, वेदीखाली आत्मे पाहिले, ते आत्मे देवाच्या वचनामुळे व त्यांनी जी साक्ष दिली होती तिच्यामुळे जिवे मारलेल्या लोकांचे आत्मे होते. 10 ते मोठ्याने ओरडून म्हणाले, हे “स्वामी तू पवित्र व सत्य आहेस तू कोठपर्यंत न्यायनिवाडा करणार नाहीस आणि पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांपासून आमच्या रक्ताचा सूड घेणार नाहीस?” 11 तेव्हा त्या प्रत्येकास एकएक शुभ्र झगा देण्यात आला आणि त्यास असे सांगण्यात आले की, तुमच्या सोबतीचे दास व तुमचे बंधू तुम्हासारखे जिवे मारले जाणार, त्यांची संख्यापूर्ण होईपर्यंत तुम्ही आणखी थोडा वेळ विसावा घ्या.

12 त्याने सहावा शिक्का फोडला, ते मी पाहिले; तेव्हा मोठा भूमिकंप झाला, सूर्य केसांच्या बनवलेल्या तरटासारखा काळा झाला; व सगळा चंद्र रक्तासारखा झाला; 13 अंजिराचे झाड मोठ्या वाऱ्याने हालले म्हणजे त्याची कच्ची फळे जशी खाली पडतात तसे आकाशातील तारे पृथ्वीवर पडले 14 एखाद्या गुंडाळीसारखे आकाश गुंडाळले जाऊन निघून गेले आणि सर्व डोंगर व बेटे आपआपल्या ठिकाणांवरून ढळून गेली. 15 पृथ्वीवरील राजे व मोठे अधिकारी, सरदार, श्रीमंत व बलवान लोक, सर्व दास व स्वतंत्र माणसे, गुहात व डोगरांतील खडकातून लपली; 16 आणि ते डोंगरास व खडकास म्हणाले, आम्हावर पडून राजासनावर जो बसलेला आहे, त्याच्या नजरेपासून व कोकऱ्याच्या क्रोधापासून आम्हास लपवा, 17 कारण त्यांच्या क्रोधाचा मोठा दिवस आला आहे, आणि त्याच्यापुढे कोण टिकेल?

<- प्रकटीकरण 5प्रकटीकरण 7 ->