Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
13
समुद्रातून वर आलेले श्वापद
1 आणि मी बघितले की, एक पशू समुद्रातून वर आला. त्यास दहा शिंगे आणि सात डोकी होती. त्याच्या शिंगांवर दहा मुकुट होते व त्याच्या डोक्यांवर देवाचा अपमान करणारी नावे होती. 2 आणि मी पाहिलेला पशू तो चित्त्यासारखा होता, त्याचे पाय अस्वलाच्या पायासारखे व त्याचे तोंड सिंहाच्या तोंडासारखे होते; त्यास अजगराने आपली शक्ती आणि राजासन दिले आणि मोठा अधिकार दिला.

3 त्या पशूच्या डोक्यापैकी, त्याच्या एका डोक्याला जीवघेणी जखम झाली होती, त्यामुळे तो मरून जाईल असे वाटले. पण त्याची ती जखम बरी झाली; आणि सर्व पृथ्वी आश्चर्य करीत त्या पशूच्यामागे गेली. 4 आणि त्यांनी अजगराला नमन केले, कारण त्याने आपला अधिकार त्या पशूला दिला होता; आणि त्यांनी त्या पशूलाही नमन करून म्हटले, “या पशूसारखा कोण आहे? ह्याच्याशी कोण लढू शकेल?” 5 आणि, त्या पशूला मोठ्या गर्विष्ठ गोष्टी व अपमानास्पद शब्द बोलणारे तोंड दिले होते; आणि त्यास हे करायला बेचाळीस महिने अधिकार दिला होता. 6 त्या पशूने देवाविरुद्ध त्याच्या नावाविषयी, त्याच्या मंडपाविषयी आणि स्वर्गात राहणाऱ्यांविषयी निंदा करायला आपले तोंड उघडले. 7 आणि पवित्र जनांशी लढाई करण्यास व त्यांच्यावर विजय मिळवण्यास त्या पशूला परवानगी देण्यात आली; आणि त्यास प्रत्येक वंश, लोक, भाषा बोलणाऱ्यांवर आणि राष्ट्रांवर अधिकार दिलेला होता. 8 आणि ज्यांची नावे जगाच्या स्थापनेपासून वधलेल्या कोकऱ्याच्या जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली नाहीत असे पृथ्वीवर राहणारे सर्वजण त्या पशूला नमन करतील.

9 जर कोणाला कान असेल तर तो ऐको.

10 जो कैदेत जायचा
तो कैदेत जातो;
जो तलवारीने जीवे मारील
त्यास तलवारीने मरणे भाग आहे.
ह्यात पवित्र जनांची सहनशिलता आणि विश्वास दिसून येतो.
भूमीतून वर आलेले श्वापद
11 आणि मी बघितले की, आणखी एक पशू भूमीतून वर येत आहे. त्यास कोकऱ्यासारखी दोन शिंगे होती; आणि तो अजगरासारखा बोलत होता. 12 तो पहिल्या पशूची सर्व सत्ता त्याच्यासमक्ष स्वतः चालवतो; ज्या पहिल्या पशूची जीवघेणी जखम बरी झाली होती त्यास पृथ्वीने व तीवर राहणाऱ्यांनी नमन करावे असे तो करतो. 13 तो मोठी चिन्हे करतो; लोकांच्या दृष्टीपुढे आकाशातून पृथ्वीवर अग्नी उतरेल असे तो करतो, 14 आणि त्यास त्या पशूच्या देखत जी चिन्हे करायची मुभा आहे ती करून दाखवून तो पृथ्वीवर राहणाऱ्यांना फसवतो आणि ज्या पशूला तलवारीचा घाव लागला असताही जो जिवंत आहे त्याची त्यांनी मूर्ती करावी असे तो पृथ्वीवर राहणाऱ्यांस सांगतो. 15 दुसऱ्या पशूला, पहिल्या पशूच्या मूर्तीला जीवन देण्याची परवानगी होती. म्हणजे त्या पशूच्या मूर्तीने बोलावे आणि असे करावे की, जितके लोक त्या पशूच्या मूर्तीला नमन करणार नाहीत तितक्यांना जिवे मारले जावे. 16 आणि तो असे करतो की, लहान व मोठे, धनवान व दरिद्री, स्वतंत्र व दास, अशा सर्वांनी आपल्या उजव्या हातावर किंवा कपाळांवर एक खूण घ्यावी, 17 आणि ती खूण म्हणजे त्या पशूचे नाव किंवा त्याच्या नावाची संख्या आहे, त्याच्यावाचून इतर कोणाला काही विकत घेता येऊ नये किंवा विकता येऊ नये.

18 येथे ज्ञानीपणच आहे; ज्याला बुद्धी असेल त्याने पशूच्या संख्येचा हिशोब करावा कारण, ती एका मनुष्याची संख्या आहे आणि त्याची संख्या सहाशे सहासष्ठ आहे.

<- प्रकटीकरण 12प्रकटीकरण 14 ->