Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
97
देवाचे राज्य व सामर्थ्य
1 परमेश्वर राज्य करतो; पृथ्वी आनंदित होवो.
अनेक द्वीपसमूह आनंदित होवो.
2 ढग आणि काळोख त्याच्याभोवती आहेत.
निती व न्याय त्याच्या सिंहासनाचा पाया आहेत[a].
3 अग्नी त्याच्यापुढे चालतो,
आणि प्रत्येक बाजूने त्याच्या शत्रूंना नष्ट करून टाकतो.
4 त्याच्या विजांनी जग प्रकाशित केले;
पृथ्वी हे पाहून थरथर कापली.
5 परमेश्वरासमोर, सर्व पृथ्वीच्या प्रभूसमोर
पर्वत मेणासारखे वितळले.
6 आकाशाने, त्याचा न्याय जाहीर केला,
आणि सर्व राष्ट्रांनी त्याचे वैभव पाहिले.
7 जे कोरीव मूर्तीची पूजा करतात,
जे मूर्तीचा अभिमान बाळगतात ते सर्व लज्जित झाले.
अहो सर्व देवहो! त्याच्यासमोर नमन करा.
8 सियोनेने हे ऐकले आणि आनंदित झाली,
कारण हे परमेश्वरा, तुझ्या न्यायामुळे
यहूदाच्या नगरांनी आनंद केला.
9 कारण हे परमेश्वरा, सर्व पृथ्वीवर तू परात्पर आहेस.
तू सर्व देवापेक्षा खूपच उंचावलेला आहेस.
10 जे तुम्ही परमेश्वरावर प्रीती करता, ते तुम्ही वाईटाचा द्वेष करा,
तो आपल्या भक्तांच्या जीवाचे रक्षण करतो,
आणि तो त्यास दुष्टांच्या हातातून सोडवतो.
11 नितीमानासाठी प्रकाश
आणि जे सरळ अंतःकरणाचे आहेत त्यांच्यासाठी हर्ष पेरला आहे.
12 अहो नितीमानांनो, परमेश्वराठायी आनंदी व्हा.
त्याच्या पवित्र नावाला धन्यवाद द्या.

<- स्तोत्रसंहिता 96स्तोत्रसंहिता 98 ->