Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
85
देवाने इस्त्राएलावर दया करावी म्हणून प्रार्थना
कोरहाच्या मुलांची स्तोत्रे
1 हे परमेश्वरा, तू आपल्या देशावर अनुग्रह दाखवला आहेस;
तू याकोबाला बंदिवासातून परत आणले आहेस.
2 तू आपल्या लोकांच्या पापांची क्षमा केली आहेस.
तू त्यांची सर्व पापे झाकून टाकली आहेत.
3 तू आपला सर्व क्रोध काढून घेतला आहे;
आणि आमच्यावरील भयंकर क्रोधापासून मागे फिरला आहेस.
4 हे आमच्या तारणाऱ्या देवा, आम्हास परत आण,
आणि आमच्यावरचा तुझा असंतोष दूर कर.
5 सर्वकाळपर्यंत तू आमच्यावर रागावलेला राहशील का?
पिढ्यानपिढ्या तू रागावलेला राहशील काय?
6 तुझ्या लोकांनी तुझ्याठायी आनंद करावा,
म्हणून तू आम्हास परत जिवंत करणार नाहीस का?
7 हे परमेश्वरा, तुझ्या दयेचा अनुभव आम्हास येऊ दे;
तू कबूल केलेले तारण आम्हास दे.
8 परमेश्वर देव काय म्हणेल ते मी ऐकून घेईन.
कारण तो आपल्या लोकांशी व विश्वासू अनुयायींशी शांती करेल,
तरी मात्र त्यांनी मूर्खाच्या मार्गाकडे पुन्हा वळू नये.
9 खचित जे त्यास भितात त्यांच्याजवळ त्याचे तारण आहे;
यासाठी आमच्या देशात वैभव रहावे.
10 दया व सत्य एकत्र मिळाली आहेत;
निती आणि शांती यांनी एकमेकांचे चुंबन घेतले आहे.
11 पृथ्वीतून सत्य बाहेर पडत आहे,
आणि स्वर्गातून नितिमत्व खाली पाहत आहे.
12 जे उत्तम ते परमेश्वर देईल,
आणि आमची भूमी आपले पिक देईल.
13 त्याच्यासमोर नितीमत्व चालेल,
आणि त्याच्या पावलांसाठी मार्ग तयार करील.

<- स्तोत्रसंहिता 84स्तोत्रसंहिता 86 ->