Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
83
इस्त्राएलाच्या शत्रूंच्या नाशासाठी प्रार्थना
आसाफाचे स्तोत्र
1 हे देवा, गप्प राहू नकोस.
हे देवा, आमच्याकडे दुर्लक्ष करू नको आणि स्वस्थ राहू नकोस.
2 पाहा, तुझे शत्रू गलबला करीत आहेत,
आणि जे तुझा द्वेष करतात त्यांनी आपले डोके उंच केले आहे.
3 ते तुझ्या लोकांविरूद्ध गुप्त योजना आखतात.
आणि ते एकत्र मिळून तुझ्या आश्रितांविरूद्ध योजना करतात.
4 ते म्हणतात, “या आणि आपण त्यांचा एक राष्ट्र म्हणून नाश करू.
यानंतर इस्राएलाचे नावही आणखी आठवणित राहणार नाही.
5 त्यांनी एकमताने, एकत्र मिळून मसलत केली आहे,
ते तुझ्याविरूद्ध करार करतात.
6 ते तंबूत राहणारे अदोमी आणि इश्माएली, मवाब आणि हगारी,
7 गबाल, अम्मोन व अमालेकचे, पलिष्टी आणि सोरकर हे ते आहेत.
8 अश्शूरानेही त्यांच्याशी करार केला आहे;
ते लोटाच्या वंशजांना मदत करीत आहेत.
9 तू जसे मिद्यानाला,
सीसरा व याबीन यांना किशोन नदीजवळ केलेस तसेच तू त्यांना कर.
10 ते एन-दोर येथे नष्ट झाले,
आणि ते भूमीला खत झाले.
11 तू ओरेब व जेब यांच्यासारखे त्यांच्या उमरावांना कर,
जेबह व सलमुन्ना यांच्यासारखे त्यांच्या सर्व सरदारांचे कर.
12 ते म्हणाले, देवाची निवासस्थाने
आपण आपल्या ताब्यात घेऊ.
13 हे माझ्या देवा, तू त्यांना वावटळीच्या धुरळ्यासारखे,
वाऱ्यापुढील भुसासारखे तू त्यांना कर.
14 अग्नी जसा वनाला जाळतो,
व ज्वाला जशी डोंगराला पेटवते.
15 तसा तू आपल्या वादळाने त्यांचा पाठलाग कर,
आणि आपल्या तुफानाने त्यांना घाबरून सोड.
16 हे परमेश्वरा, त्यांची चेहरे लज्जेने भर
यासाठी की, त्यांनी तुझ्या नावाचा शोध करावा.
17 ते सदासर्वकाळ लज्जित व घाबरे होवोत;
ते लज्जित होऊन नष्ट होवोत.
18 नंतर तू, मात्र तूच परमेश्वर,
या नावाने सर्व पृथ्वीवर परात्पर आहेस असे त्यांना कळेल.

<- स्तोत्रसंहिता 82स्तोत्रसंहिता 84 ->