Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
80
इस्त्राएल लोकांस परत आणण्यासाठी काकळूता
आसाफाचे स्तोत्र
1 हे इस्राएलाच्या मेंढपाळा,
जो तू योसेफाला कळपाप्रमाणे चालवितोस तो तू लक्ष दे.
जो तू करुबांच्यावर बसतोस, आम्हावर प्रकाश पाड.
2 एफ्राइम आणि बन्यामीन व मनश्शे यांच्यासमोर तू आपल्या सामर्थ्याने खळबळ उडव;
ये व आम्हास वाचव.
3 हे देवा, तू आमचा पुन्हा स्वीकार कर;
आपला मुखप्रकाश आम्हावर पाड आणि आम्ही वाचू.
4 हे परमेश्वरा, सेनाधीश देवा,
तुझे लोक प्रार्थना करीत असता तू किती वेळ कोपलेला राहशील?
5 तू त्यांना अश्रूंची भाकर खावयास दिली आहे.
आणि मोठ्या प्रमाणात आसवे पिण्यास दिली आहेत.
6 तू आम्हास आमच्या शेजाऱ्यांच्या भांडणाचे निमित्त करतोस,
आणि आमचे शत्रू आपसात आम्हास हसतात.
7 हे सेनाधीश देवा, पुन्हा आमचा स्वीकार कर.
आपला मुखप्रकाश आम्हावर पाड आणि आम्हास वाचव.
8 मिसर देशातून तू द्राक्षवेल काढून आणिला;
राष्ट्रांना घालवून देऊन तो त्यांच्या भूमीत लाविला.
9 तू त्याकरता जागा तयार केली;
त्याने मूळ धरले आणि देश भरून टाकला.
10 त्याच्या सावलीने पर्वत,
त्याच्या फांद्यांनी देवाचे उच्च गंधसरू आच्छादून टाकले.
11 त्याने आपल्या फांद्या समुद्रापर्यंत
आणि आपले कोंब फरात नदीपर्यंत पाठविले.
12 तू त्यांची कुंपणे कां मोडली?
त्यामुळे वाटेने येणारे जाणारे सगळे त्याचे फळ तोडतात.
13 रानडुकरे येऊन त्याची नासधूस करतात.
आणि रानटी पशू त्यास खाऊन टाकतात.
14 हे सेनाधीश देवा, तू मागे फिर;
स्वर्गातून खाली बघ आणि लक्ष पुरव आणि या द्राक्षवेलीची काळजी घे.
15 हे मूळ तू आपल्या उजव्या हाताने लाविले आहे,
जो कोंब तू आपणासाठी सबळ केला आहे त्याचे रक्षण कर.
16 ती अग्नीने जळाली आहे आणि ती तोडून टाकली आहे;
तुझ्या मुखाच्या धमकीने तुझे शत्रू नष्ट होतात.
17 तुझ्या उजव्या हाताला असलेल्या मनुष्यावर,
तू आपल्यासाठी बलवान केलेल्या मानवपुत्रावर तुझा हात राहो;
18 मग आम्ही तुझ्यापासून मागे फिरणार नाही;
तू आम्हास जिवंत कर आणि आम्ही तुझ्या नावाचा धावा करू.
19 हे परमेश्वरा, सेनाधीश देवा, तू आम्हास परत आण.
आमच्यावर आपला मुखप्रकाश पाड आणि आमचा बचाव होईल.

<- स्तोत्रसंहिता 79स्तोत्रसंहिता 81 ->