Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
74
देवाच्या प्रजेच्या शत्रूंविषयी गाऱ्हाणे
आसाफाचे स्तोत्र
1 हे देवा, तू आम्हास सर्वकाळ का सोडून दिले आहेस?
आपल्या कुरणातील कळपांवर तुझा कोपाग्नि का भडकत आहे?
2 तू प्राचीनकाळी जी मंडळी विकत घेतली,
जिला तू आपले वारस होण्याकरता खंडणी भरून सोडविले तिचे,
व ज्या सीयोन पर्वतावर तू वस्ती केली त्याची आठवण कर.
3 पूर्णपणे विध्वंस झालेल्याकडे या,
शत्रूने सर्व पवित्रस्थानाचे कसे नुकसान केले आहे ते पहा.
4 तुझ्या सभास्थानात तुझे शत्रू गर्जना करीत आहेत;
त्यांनी युद्धाची झेंडे उभारले आहेत.
5 जसे दाट झाडीवर कुऱ्हाडीने छिन्नविछीन्न करणाऱ्या
मनुष्याप्रमाणे ते त्यांना दिसले.
6 त्यांनी कुऱ्हाडीने आणि हातोडीने
सर्व कोरीव काम तोडून आणि फोडून टाकले.
7 त्यांनी तुझ्या पवित्रस्थानाला आग लावली;
जेथे तू राहतो त्याचे पावित्र्य भ्रष्ट केले, धुळीस मिळविले.
8 ते आपल्या अंतःकरणात म्हणाले, आपण ह्यांचा नायनाट करून टाकू.
त्यांनी देशात असलेली देवाची सर्व सभास्थाने जाळून टाकली आहेत.
9 आम्हास देवाकडून कोणतेही चिन्ह मिळाले नाही, कोणी संदेष्टा उरला नाही;
असे कोठवर चालेल हे जाणणारा आमच्यामध्ये कोणी नाही.
10 हे देवा, शत्रू किती वेळ माझा अपमान करील?
शत्रू तुझ्या नावाची निंदा सर्वकाळ करणार काय?
11 तू आपला हात, आपला उजवा हात का मागे आवरून धरतोस?
तू आपला उजवा हात आपल्या अंगरख्यातून काढ आणि त्यांना नष्ट कर?
12 तरी देव, प्राचीन काळापासून माझा राजा आहे,
पृथ्वीवर तारणारा तो आहे.
13 तू आपल्या सामर्थ्याने समुद्र दुभागला;
तू समुद्रातील प्रचंड प्राण्यांची मस्तके पाण्यात फोडली.
14 तू लिव्याथानाचे *एक समुद्री प्राणीमस्तक ठेचले;
रानात राहणाऱ्यास तो खाऊ घातला.
15 तू झरे आणि प्रवाह फोडून उघडले;
तू वाहणाऱ्या नद्या कोरड्या केल्या.
16 दिवस तुझा आहे आणि रात्रही तुझीच आहे;
तू सूर्य आणि चंद्र त्यांच्या जागी ठेवले.
17 तू पृथ्वीच्या सर्व सीमा ठरविल्या आहेत;
तू उन्हाळा आणि हिवाळा केलास.
18 हे परमेश्वरा, वैऱ्याने तुझ्याकडे अपमान भिरकावला आहे;
आणि मूर्ख लोकांनी तुझ्या नावाची निंदा केली आहे त्याची आठवण कर
19 तू आपल्या कबुतराचा जीव वन्यपशूच्या स्वाधीन करू नकोस.
आपल्या दडपशाहीचे जिवन सर्वकाळ विसरू नकोस.
20 तू आपल्या कराराची आठवण कर,
कारण पृथ्वीवरील काळोखी प्रदेश पूर्ण हिंसाचाराची ठिकाणे आहेत.
21 दडपलेल्यास लज्जित होऊन मागे फिरू देऊ नको;
गरीब आणि दडपलेले तुझ्या नावाची स्तुती करोत.
22 हे देवा, ऊठ, आपल्या सन्मानाचे समर्थन स्वतःच कर;
मूर्ख दिवसभर तुझा अपमान करत आहे याची आठवण कर.
23 तुझ्या शत्रूंचा आवाज विसरू नको,
किंवा तुझा विरोध करणाऱ्यांचा गोंगाट एकसारखा वर चढत आहे.

<- स्तोत्रसंहिता 73स्तोत्रसंहिता 75 ->