Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
68
सीयोनेचा व पवित्रस्थानाचा परमेश्वर
दाविदाचे स्तोत्र
1 देवाने उठावे; त्याचे वैरी विखरले जावोत;
जे त्याचा तिरस्कार करतात तेही त्याच्यापुढून पळून जावोत.
2 जसा धूर पांगला जातो, तसे त्यांना दूर पांगून टाक;
जसे मेण अग्नीपुढे वितळते, तसे दुर्जन देवापुढे नष्ट होवोत.
3 परंतु नीतिमान आनंदित होवोत; ते देवापुढे हर्षभरित होवोत;
ते हर्षोत आणि आनंदी होवोत.
4 देवाला गाणे गा, त्याच्या नावाचे स्तवन करा;
ज्याची स्वारी यार्देन नदीच्या खोऱ्यातील मैदानातून*ढगातून चालली आहे त्याच्यासाठी राजमार्ग तयार करा;
त्याचे नाव परमेश्वर आहे; त्याच्यापुढे हर्षभरित व्हा.
5 तो पितृहीनाचा पिता, विधवांचा मदतगार न्यायाधीश
असा देव आपल्या पवित्र निवासस्थानी राहतो.
6 देव एकाकी असलेल्यास कुटुंबात ठेवतो;
तो बंदिवानास गीत गात बाहेर आणतो;
पण बंडखोर तृषित प्रदेशात राहतात.
7 हे देवा, जेव्हा तू आपल्या लोकांपुढे गेला,
जेव्हा तू रानातून चालत गेलास,
8 तेव्हा भूमी कापली;
देवाच्या उपस्थितीत आकाशातून पाऊसही पडला,
देवाच्या उपस्थितीत, इस्राएलाच्या देवाच्या उपस्थित सीनाय पर्वतदेखील कंपित झाला.
9 हे देवा, तू विपुल पाऊस पाठवलास;
जेव्हा तुझे वतन शिणलेले होते तेव्हा तू ते बळकट केलेस.
10 तुझे लोक त्यामध्ये राहिले;
हे देवा, तू आपल्या चांगुलपणातून गरीबांना दिले.
11 परमेश्वराने आज्ञा दिली,
आणि ज्यांनी त्यांना घोषणा केली ते मोठे सैन्य होते.
12 सैन्यांचे राजे पळून जातात, ते पळून जातात,
आणि घरी राहणारी स्री लूट वाटून घेते.
13 जेव्हा तुम्ही काही लोक मेंढवाड्यामध्ये पडून राहता,
तेव्हा ज्याचे पंख रुप्याने व पिसे पिवळ्या सोन्याने मढवलेले आहेत,
अशा कबुतरासारखे तुम्ही आहात.
14 तेथे सर्वसमर्थाने राजांना विखरले आहे,
तेव्हा सल्मोनावर बर्फ पडते त्याप्रमाणे झाले.
15 हे महान पर्वता, बाशानाच्या पर्वता,
उंच बाशान पर्वत शिखरांचा पर्वत आहे.
16 देवाला आपल्या निवासासाठी जो पर्वत आवडला आहे,
त्याच्याकडे हे अनेक शिखरांच्या पर्वता, तू हेव्याने का पाहतोस?
खरोखर, परमेश्वर त्याच्यावरच सर्वकाळ राहील.
17 देवाचे रथ वीस हजार आहेत, हजारो हजार आहेत.
जसा सीनाय पर्वतावर पवित्रस्थान, तसा प्रभू त्यांच्यामध्ये आहे.
18 तू उंचावर चढलास; तू बंदिवानास दूर नेले आहे;
मनुष्याकडून आणि जे तुझ्याविरूद्ध लढले
त्यांच्यापासूनही भेटी स्वीकारल्या आहेत,
यासाठी की, हे परमेश्वर देवा, तू तेथे रहावे.
19 प्रभू धन्यवादित असो, तो दररोज आमचा भार वाहतो,
देव आमचे तारण आहे.
20 आमचा देव आम्हास तारणारा देव आहे;
मृत्यूपासून सोडविणारा प्रभू परमेश्वर आहे.
21 पण देव आपल्या शत्रूचे डोके आपटेल,
जो आपल्या अपराधात चालत जातो त्याचे केसाळ माथे आपटेल.
22 परमेश्वर म्हणाला, मी माझ्या लोकांस बाशानापासून परत आणीन,
समुद्राच्या खोल स्थानातून त्यांना परत आणीन.
23 यासाठी की, तू आपल्या शत्रूला चिरडावे, आपला पाय त्यांच्या रक्तात बुडवा,
आणि तुझ्या शत्रुंकडून तुझ्या कुत्र्यांच्या जिभेस वाटा मिळावा.
24 हे देवा, त्यांनी तुझ्या मिरवणुका पाहिल्या आहेत,
पवित्रस्थानी माझ्या देवाच्या, माझ्या राजाच्या मिरवणुका त्यांनी पाहिल्या आहेत.
25 गायकपुढे गेले, वाजवणारे मागे चालले आहेत,
आणि मध्ये कुमारी कन्या लहान डफ वाजवत चालल्या आहेत.
26 मंडळीत देवाचा धन्यवाद करा;
जे तुम्ही इस्राएलाचे खरे वंशज आहात ते तुम्ही परमेश्वराची स्तुती करा.
27 तेथे त्यांचा अधिकारी प्रथम बन्यामीन, कनिष्ठ कुळ,
यहूदाचे अधिपती, व त्याच्याबरोबरचे समुदाय
जबुलूनाचे अधिपती, नफतालीचे अधिपती हे आहेत.
28 तुझ्या देवाने, तुझे सामर्थ्य निर्माण केले आहे;
हे देवा, तू पूर्वीच्या काळी आपले सामर्थ्य दाखविले तसे आम्हास दाखव.
29 यरूशलेमातील मंदिराकरता,
राजे तुला भेटी आणतील.
30 लव्हाळ्यात राहणारे वनपशू,
बैलांचा कळप आणि त्यांचे वासरे ह्यांना धमकाव.
जे खंडणीची मागणी करतात त्यांना आपल्या पायाखाली तुडव;
जे लढाईची आवड धरतात त्यांना विखरून टाक.
31 मिसरमधून सरदार येतील;
कूश आपले हात देवाकडे पसरण्याची घाई करील.
32 अहो पृथ्वीवरील राष्ट्रांनो, तुम्ही देवाला गीत गा,
परमेश्वराची स्तुतिगीते गा.
33 जो पुरातन काळापासून अस्तित्वात आहे तो आकाशांच्या आकांशावर आरूढ होतो;
पाहा, तो आपला आवाज सामर्थ्याने उंचावतो.
34 देवाच्या सामर्थ्याचे वर्णन करा;
इस्राएलावर त्याचे वैभव
आणि आकाशात त्याचे बल आहे.
35 हे देवा, तू आपल्या पवित्रस्थानात भयप्रद आहे;
इस्राएलाचा देव आपल्या लोकांस बल आणि सामर्थ्य देतो.
देव धन्यवादित असो.

<- स्तोत्रसंहिता 67स्तोत्रसंहिता 69 ->