Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
66
देवाच्या महत्कृत्यांबद्दल उपकारस्तुती
1 अहो पृथ्वीवरील सर्वजणहो देवाचा जयजयकार करा;
2 त्याच्या नावाचा महिमा गा;
त्याची स्तुती गौरवशाली होईल अशी करा.
3 देवाला म्हणा, तुझी कृत्ये किती भीतिदायक आहेत,
तुझ्या महान सामर्थ्यामुळे तुझे शत्रू तुझ्या स्वाधीन होतात.
4 सर्व पृथ्वी तुझी आराधना करतील;
आणि तुझी स्तोत्रे गातील;
ते तुझ्या नावाची स्तोत्रे गातील.
5 अहो या, आणि देवाची कार्ये पहा;
तो मनुष्यांच्या मुलांस आपल्या कृत्यांनी धाक बसवतो.
6 त्याने समुद्र पालटून कोरडी भूमी केली;
ते नदीतून पायांनी चालत गेले;
तेथे आम्ही त्याच्यात आनंद केला.
7 तो आपल्या सामर्थ्याने सर्वकाळ राज्य करतो;
तो आपल्या डोळ्यांनी सर्व राष्ट्रांचे निरीक्षण करतो;
बंडखोरांनी आपल्यास उंच करू नये.
8 अहो लोकांनो, आमच्या देवाला धन्यवाद द्या,
आणि त्याची स्तुती ऐकू येईल अशी करा.
9 तो आमचा जीव राखून ठेवतो,
आणि तो आमचे पाय सरकू देत नाही.
10 कारण हे देवा, तू आमची परीक्षा केली आहे;
रुप्याची परीक्षा करतात तशी तू आमची परीक्षा केली आहे.
11 तू आम्हास जाळ्यात आणले;
तू आमच्या कमरेवर अवजड ओझे ठेवले.
12 तू आमच्या डोक्यावरून लोकांस स्वारी करण्यास लावले.
आम्ही अग्नीतून आणि पाण्यातून गेलो,
परंतु तू आम्हास बाहेर काढून प्रशस्त जागी आणले.
13 मी होमार्पणे घेऊन तुझ्या घरात येईन;
मी तुला केलेले नवस फेडीन.
14 संकटात असता जे मी आपल्या ओठांनी उच्चारले
आणि जे मी आपल्या तोंडाने बोलल,
15 मी तुला मेंढ्याच्या धूपासहित
पुष्ट पशूंचे होमार्पणे मी तुला अर्पीण;
बोकड आणि गोऱ्हे अर्पीण.
16 जे सर्व तुम्ही देवाचे भय धरता, या आणि ऐका,
आणि त्याने माझ्यासाठी काय केले ते मी तुम्हास सांगतो.
17 मी माझ्या मुखाने त्याचा धावा केला,
आणि माझ्या जीभेवर त्याची स्तुती होती.
18 जर माझ्या मनात अन्यायाकडे मी पाहिले असते,
तर प्रभूने माझे ऐकले नसते.
19 पण देवाने खचित ऐकले आहे;
त्याने माझ्या प्रार्थनेच्या वाणीकडे लक्ष दिले आहे.
20 देवाचा धन्यवाद होवो, त्याने माझ्या प्रार्थनांपासून आपले मुख फिरविले नाही,
किंवा त्याच्या कराराच्या विश्वासूपणापासून आपली दृष्टी वळविली नाही.

<- स्तोत्रसंहिता 65स्तोत्रसंहिता 67 ->