Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
59
शत्रूंच्या हातातून सुटका व्हावी म्हणून प्रार्थना
दाविदाचे स्तोत्र
1 हे देवा, मला माझ्या शत्रूंपासून सोडीव;
जे माझ्याविरूद्ध उठतात त्यांच्यापासून मला दूर उंचावर ठेव.
2 दुष्कर्म करणाऱ्यांपासून मला सुरक्षित ठेव,
आणि रक्तपाती मनुष्यापासून मला वाचव.
3 कारण, पाहा, ते माझ्या जीवासाठी दबा धरून बसले आहेत.
हे परमेश्वरा, माझा अपराध किंवा पातक नसता,
सामर्थी लोक माझ्याविरूद्ध एकत्र गोळा झाले आहेत.
4 जरी मी निर्दोष असलो तरी ते माझ्याकडे धावण्याची तयारी करत आहेत;
मला मदत करावी म्हणून जागा हो व पाहा.
5 हे परमेश्वरा, सेनाधीश देवा, इस्राएलाच्या देवा,
ऊठ आणि सर्व राष्ट्रांना शिक्षा कर;
कोणत्याही दुष्ट पापी मनुष्यास दया दाखवू नकोस.
6 संध्याकाळी ते परत येतात, कुत्र्यांसारखे गुरगुरतात
आणि नगराभोवती फिरतात.
7 पाहा, ते आपल्या मुखावाटे ढेकर देतात;
त्यांच्या तोंडचे शब्द तलवार आहेत.
कारण ते म्हणतात, आमचे कोण ऐकतो?
8 परंतु हे परमेश्वरा, तू त्यांना हसशील;
तू सर्व राष्ट्रांना उपहासात धरशील.
9 हे माझ्या सामर्थ्या, मी तुझ्याकडे लक्ष देईन;
कारण देवच माझा उंच बुरूज आहे.
10 माझा देव मला त्याच्या कराराच्या विश्वसनीयतेने भेटेल;
माझ्या शत्रूवर माझी इच्छा पूर्ण झालेली देव मला पाहू देईल.
11 त्यांना जिवे मारू नको नाहीतर माझे लोक विसरून जातील;
हे प्रभू तू आमची ढाल आहेस, आपल्या बलाने त्यांची दाणादाण कर, त्यांस खाली पाड.
12 कारण त्यांच्या तोंडचे पाप आणि त्यांच्या ओठांचे शब्द,
आणि त्यांनी अभिव्यक्त केलेले शाप
आणि खोटेपणा यामुळे ते आपल्या अंहकारात पकडले जातात.
13 क्रोधात त्यांना नष्ट कर, ते यापुढे नाहीसे व्हावेत असे त्यांना नष्ट कर.
देव याकोबात आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत
राज्य करतो हे त्यांना माहित होवो.
14 संध्याकाळी ते परत येतात; कुत्र्यांसारखे गुरगुरतात.
आणि रात्री नगराभोवती फिरतात.
15 ते अन्नासाठी वर आणि खाली भटकतात,
आणि जर त्यांची तृप्ति झाली नाही तर रात्रभर वाट पाहतात.
16 परंतु मी तुझ्या सामर्थ्याविषयी गीत गाईन; कारण तू माझा उंच बुरूज आहे
आणि माझ्या संकटाच्या समयी आश्रयस्थान आहेस.
17 हे माझ्या सामर्थ्या, मी तुझी स्तवने गाईन;
कारण देव माझा उंच बुरूज आहे,
माझा देव ज्यावर मी विश्वास ठेऊ शकतो.

<- स्तोत्रसंहिता 58स्तोत्रसंहिता 60 ->