Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
50
देव न्यायाधीश आहे
आसाफाचे स्तोत्र.
1 थोर परमेश्वर देव, बोलला आहे.
आणि पृथ्वीला तिच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत हाक मारली.
2 सौंदर्य परिपूर्णता सियोनेमधून
देव प्रकाशला आहे.
3 आमचा देव येईल आणि तो शांत राहणार नाही,
त्याच्यासमोर आग नाश करत चालली आहे,
आणि त्याच्याभोवती वादळ घोंगावत आहे.
4 त्याने वर आकाशाला आणि पृथ्वीला हाक मारली,
म्हणजे तो त्याच्या लोकांचा न्यायनिवाडा करील.
5 देव म्हणतो, “माझ्या भक्तांनो माझ्याभोवती गोळा व्हा.
ज्यांनी यज्ञाच्या व्दारे माझ्याशी करार केला आहे.”
6 आकाश त्याच्या चांगुलपणाविषयी सांगत असते.
कारण देव स्वतः न्यायधीश आहे.
7 हे माझ्या लोकांनो, ऐका, आणि मी बोलेन,
मी देव आहे, तुमचा देव आहे.
8 मी तुमच्या होमार्पणाबद्दल तक्रार करीत नाही.
तुमची होमार्पणे निरंतर माझ्यापुढे आहेत,
9 मी तुमच्या गोठ्यातून बैल घेणार नाही.
किंवा मी तुमच्या मेंढवाड्यातून बोकड घेणार नाही.
10 कारण जंगलातील प्रत्येक पशू माझा आहे,
हजारो पर्वतावरील सर्व प्राणी माझ्याच मालकीचे आहेत.
11 उंच पर्वतावरील प्रत्येक पक्षी मला माहित आहे
आणि भूमीवरील वन्य पशू माझे आहेत.
12 मी भुकेला असलो तरी तुला बोलणार नाही,
कारण जग माझेच आहे, आणि त्यातील सर्वकाही माझेच आहे.
13 मी बैलाचे मांस खाणार का?
मी बकऱ्यांचे रक्त पिणार का?
14 देवाला उपकार स्तुतीचा यज्ञ अर्पण कर,
आणि परत्पराकडे आपले नवस फेड.
15 तू संकटात असता मला हाक मार,
आणि मी तुला वाचवेन, आणि तू मला गौरव देशील.
16 देव दुष्ट लोकांस म्हणतो, तुम्ही लोक माझ्या कायद्यांबद्दल बोलण्याचे काय काम आहे?
आणि तू माझा करार तुझ्या तोंडाने उच्चरणारा आहेस?
17 कारण तू शिक्षेचा तिरस्कार करतोस,
आणि माझी वचने झुगारून देतोस?
18 तुम्ही चोराला बघता आणि त्याच्याबरोबर सहमत होता.
तुम्ही व्यभिचार करणाऱ्या लोकांबरोबर सहभागी होता.
19 तू वाईटाला आपले मुख देतोस,
आणि तुझी जीभ कपट व्यक्त करते.
20 तुम्ही बसता आणि आपल्या भावाविरूद्ध बोलता.
तू आपल्या सख्या भावाची निंदा करतोस.
21 तुम्ही वाईट गोष्टी करता आणि तरीही मी गप्प राहिलो.
मी तुझ्यासारखा आहे असे तुला वाटले,
परंतू मी तुझा निषेध करणार आणि तुझ्या डोळ्यापुढे ओळीने सर्वकाही मांडणार.
22 तुम्ही लोक देवाला विसरला आहात.
मी तुम्हास फाडून टाकण्यापूर्वीच तुम्ही हे सारे लक्षात घ्या जर तसे घडले तर तुम्हास कोणीही वाचवू शकणार नाही.
23 जो कोणी उपकारस्तुतीचा यज्ञ अर्पितो,
आणि जो कोणी आपला मार्ग सरळ योजितो,
त्यास मी देवाचे तारण दाखवेन.

<- स्तोत्रसंहिता 49स्तोत्रसंहिता 51 ->