Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
40
सुटकेबद्दल उरकारस्तुती
स्तोत्र. 70:1-5
मुख्य गायकासाठी; दाविदाचे स्तोत्र.
1 मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली,
त्याने माझे रडणे ऐकले आणि माझ्याकडे आपला कान लावला.
2 त्याने मला भयानक खाचेतून दलदलीच्या चिखलातून बाहेर काढले,
आणि त्याने माझे पाय खडकावर ठेवले आणि माझी पावले स्थीर केली.
3 आमच्या देवाची स्तुती, हे नवीन गाणे त्याने माझ्या मुखात घातले,
पुष्कळ लोक त्यास पाहतील आणि त्याचा आदर करतील.
आणि ते परमेश्वरावर विश्वास ठेवतील.
4 जो पुरुष परमेश्वरास आपला विश्वास करतो,
आणि गर्विष्ठांना किंवा जे खोट्यासाठी त्याच्याकडून फिरले आहेत त्यांना मानत नाही, ते आशीर्वादित आहेत.
5 परमेश्वरा, माझ्या देवा, तू केलेली आश्चर्याची कृत्ये पुष्कळ आहेत.
आणि आमच्यासाठी तुझे विचार मोजले जाणार नाहीत इतके आहेत.
जर मी त्यांच्याबद्दल बोलायचे म्हटले तर,
ते मोजण्यापलीकडचे आहेत.
6 यज्ञ आणि अन्नार्पण यांमध्ये तुला आनंद नाही.
परंतु तू माझे कान उघडले आहेत.
होमार्पणे किंवा पापार्पणे तू मागत नाहीस.
7 म्हणून मी म्हणालो बघ, मी आलो आहे.
माझ्याविषयी पुस्तकात हे लिहिले आहे.
8 माझ्या देवा, तुझी इच्छा पूर्ण करण्यात मला आनंद आहे.
9 मोठ्या सभेत मी न्यायीपणाचे शुभवर्तमान घोषित केले.
परमेश्वरा, तुला माहित आहे.
10 तुझे न्यायीपण मी आपल्या हृदयात लपवून ठेवले नाही.
तुझा विश्वासूपणा आणि तुझे तारण मी घोषित केले.
तुझी प्रेमदया किंवा सत्य मी मोठ्या सभेत लपवून ठेवले नाही.
11 यास्तव हे परमेश्वरा, तू तुझी दयाळूपणाची कृत्ये माझ्यापासून आवरून धरू नको.
तुझी प्रेमदया आणि तुझी सत्यता मला नेहमीच राखो.
12 कारण असंख्य वाईटाने मला वेढले आहे.
मी वर पाहण्यास सक्षम नाही, कारण माझ्या अपराधांनी मला गाठले आहे.
माझ्या डोक्यावर असलेल्या केसांपेक्षा ते जास्त आहेत.
म्हणून माझे हृदय खचले आहे.
13 परमेश्वरा, मला वाचवायला हर्षित हो.
परमेश्वरा, मला मदत करण्यास त्वरा कर.
14 जे माझ्या जीवाचा नाश करण्यास माझ्या पाठीस लागले आहेत,
ते लज्जित केले जावोत आणि गोंधळून जावोत.
15 हा! हा! हा! असे जे मला म्हणतात, ते आपल्या लज्जेमुळे चकित होवोत.
16 परंतु जे सर्व तुला शोधतात, ते तुझ्यामध्ये हर्ष व आनंद करोत.
ज्या सर्वांना तुझे तारण प्रिय आहे ते सर्व
परमेश्वराचा महिमा वाढो, असे नेहमी म्हणोत.
17 मी गरीब आणि दीन आहे,
तरी प्रभू माझा विचार करतो.
तू माझे साहाय्य आणि मला वाचवणारा आहेस.
माझ्या देवा, उशीर करू नकोस.

<- स्तोत्रसंहिता 39स्तोत्रसंहिता 41 ->