Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
38
पश्चातापी अंतःकरणाची प्रार्थना
आठवण देण्यासाठी, दाविदाचे स्तोत्र.
1 परमेश्वरा, तुझ्या क्रोधात मला ताडना करू नकोस,
आणि तुझ्या कोपात मला शिक्षा करू नकोस.
2 कारण तुझे बाण मला छेदतात,
आणि तुझा हात मला खाली दाबतो आहे.
3 माझे सर्व शरीर तुझ्या क्रोधाने आजारी झाले आहे.
आणि माझ्या अपराधांमुळे माझ्या हाडांत स्वस्थता नाही.
4 कारण माझ्या वाईट गोष्टींनी मला दडपून टाकले आहे.
ते माझ्याकरिता फार जड असे ओझे झाले आहे.
5 माझ्या पापाच्या मूर्खपणामुळे,
माझ्या जखमा संसर्गजन्य आणि दुर्गंधित झाल्या आहेत.
6 मी वाकलो आहे आणि प्रत्येक दिवशी मानहानी होते;
दिवसभर मी शोक करतो.
7 कारण लज्जेने मला गाठले आहे,
आणि माझे सर्व शरीर आजारी आहे.
8 मी बधिर आणि पूर्णपणे ठेचला गेलो आहे.
आपल्या हृदयाच्या तळमळीने मी कण्हतो.
9 हे प्रभू, तू माझ्या हृदयाची खोल उत्कंठ इच्छा समजतोस,
आणि माझे कण्हणे तुझ्यापासून लपले नाही.
10 माझे हृदय धडधडत आहे, माझी शक्ती क्षीण झाली आहे
आणि माझी दृष्टीही अंधुक झाली आहे.
11 माझ्या परिस्थितीमुळे माझे मित्र आणि माझे सोबती मला टाळतात,
माझे शेजारी माझ्यापासून लांब उभे राहतात.
12 जे माझा जीव घेऊ पाहतात ते माझ्यासाठी पाश मांडतात.
जे माझी हानी करू पाहतात ते दिवसभर विध्वंसक
आणि कपटाचे शब्द बोलतात.
13 मी तर बहिर्‍यासारखा होऊन ऐकत नाही;
मुक्यासारखा मी आपले तोंड उघडत नाही.
14 ऐकू न येणाऱ्या माणसासारखा मी आहे,
ज्याच्याकडे काही उत्तर नाही.
15 परमेश्वरा, खचित मी तुझी वाट पाहीन.
प्रभू माझ्या देवा, तू मला उत्तर देशील.
16 कारण मी जर म्हणालो तू उत्तर दिले नाही, तर माझे शत्रू माझ्यावर आनंद करतील.
जर माझा पाय घसरला, तर ते भयानक गोष्टी करतील.
17 कारण मी अडखळून पडण्याच्या बेतास आलो आहे,
आणि मी सतत यातनेत आहे.
18 मी माझा अपराध कबूल करतो;
मी माझ्या पापासंबंधी चिंताकुल आहे.
19 परंतु माझे शत्रू असंख्य आहेत;
जे माझा वाईटाने द्वेष करतात ते पुष्कळ आहेत.
20 माझ्या चांगल्याची परतफेड ते वाईटाने करतात.
जरी मी चांगले अनुसरलो. तरी माझ्यावर ते दोषारोपण करतात.
21 हे परमेश्वरा, मला सोडू नकोस;
माझ्या देवा, माझ्यापासून दूर राहू नकोस.
22 हे प्रभू, माझ्या तारणाऱ्या,
माझे साहाय्य करण्यास त्वरा कर.

<- स्तोत्रसंहिता 37स्तोत्रसंहिता 39 ->