Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
32
क्षमेची थोरवी
दाविदाचे स्तोत्र; मासकील (शिक्षण)
1 ज्याच्या अपराधांना क्षमा केली गेली आहे, ज्याचे अपराध झाकले गेले आहेत
ते आशीर्वादित आहेस.
2 परमेश्वर ज्याच्या ठायी काही अपराध गणत नाही, आणि ज्याच्या आत्म्यात कपट नाही तो सुखी आहे.
3 मी गप्प राहिलो, तेव्हा पूर्ण दिवस माझ्या,
ओरडण्याने माझी हाडे जर्जर झाली.
4 कारण रात्रंदिवस तुझा हात माझ्यावर भारी होता.
उन्हाळ्यात उष्णतेमुळे माझी शक्ती सुकून गेली आहे.
5 तेव्हा मी परमेश्वरासमोर माझे अपराध कबूल केले,
आणि मी माझा अपराध लपवला नाही,
मी म्हणालो, परमेश्वरासमोर मी आपले पाप कबूल करीन,
आणि तू मला माझ्या सर्व अपराधांबद्दल क्षमा केलीस.
6 याच कारणास्तव प्रत्येक देवभक्त तू पावशील तेव्हा तुझी प्रार्थना करो.
संकटे जेव्हा महापुरासारखी येतात तेव्हा ती तुझ्या भक्तांपर्यंत नक्कीच जाणार नाहीत.
7 तू माझे लपण्याचे ठिकाण आहेस. तू मला संकटांपासून वाचवशील,
विजयाच्या गीताने तू मला वेढशील. (सेला)
8 परमेश्वर म्हणतो, “मी तुला बोध करीन आणि ज्या मार्गात, तू चालावे तो मी तुला शिकवीन.
तुझ्यावर माझी नजर ठेवून मी तुला बोध करीन.
9 म्हणून घोड्यासारखा व गाढवासारखा मूर्ख होऊ नकोस, ज्यांना काही समजत नाही.
त्यांना आवरण्यासाठी लगाम व बागदोर असलाच पाहिजे. नाहीतर ते तुमच्या जवळ येणार नाहीत.”
10 वाईट लोकांस खूप दु:ख भोगावे लागेल,
परंतु जे परमेश्वरावर विश्वास ठेवतात त्यांच्या भोवती देवाच्या खऱ्या प्रेमाचे कडे आहे.
11 अहो न्यायी जनहो, परमेश्वराच्या ठायी आनंद व हर्ष करा.
अहो सरळ जनहो हर्षाने तुम्ही जल्लोष करा.

<- स्तोत्रसंहिता 31स्तोत्रसंहिता 33 ->