Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
19
देवाची कृत्ये आणि त्याचे नियम
मुख्य गायकासाठी. दाविदाचे स्तोत्र.
1 आकाश देवाचा गौरव जाहीर करते,
आणि अंतराळ त्याच्या हातचे कृत्य दाखविते.
2 दिवस दिवसाशी बोलतो,
रात्र रात्रीला ज्ञान प्रकट करते.
3 संभाषण नाही, बोललेले शब्दही नाही,
त्यांचा आवाजही ऐकू येत नाही.
4 तरी त्यांचे शब्द सर्व पृथ्वीभर जातात.
आणि त्यांचे बोलणे जगाच्या शेवटापर्यंत जाते.
त्याने सुर्यासाठी आकाशामध्ये मंडप उभारला आहे.
5 सूर्य नवऱ्या मुलासारखा आपल्या मांडवातून बाहेर येतो.
आणि सामर्थ्यवान पुरुषाप्रमाणे तो आपली धाव धावण्यात आनंद करतो.
6 सूर्य एक क्षितीजापासून उदय होतो,
आणि दुसऱ्या क्षितिजापर्यंत आकाशात पार जातो.
त्याच्या उष्णतेपासून कोणाचीही सुटका होत नाही.
7 परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे, ते जीवाला पुर्नजीवित करणारे आहे.
परमेश्वराचे नियम विश्वसनीय आहेत, ज्यांना अनुभव नाही त्यांना शहाणपण देणारे आहे.
8 परमेश्वराच्या सूचना खऱ्या आहेत. जे हृदयाला हर्षीत करतात.
परमेश्वराच्या कराराचे नियम शुद्ध आहेत, ते डोळे प्रकाशवनारे आहेत.
9 परमेश्वराची भीती शुद्ध आहे, ती सर्वकाळ टिकणारे आहे,
परमेश्वराचे नियम खरे आहेत, आणि सर्व न्यायी आहेत.
10 ते सोन्यापेक्षा ही मौल्यवान आहेत. अती उत्तम सोन्यापेक्षाही ते शुद्ध आहेत.
ते मधाच्या पोळ्यातून गळणाऱ्या, मधापेक्षाही गोड आहेत.
11 होय, त्याकडून तुझ्या सेवकाला चेतावनी मिळते.
ते पाळण्याने उत्तम प्रतिफळ मिळते.
12 आपल्या स्वत:च्या चुका कोण ओळखू शकतो? माझ्या गुप्त दोषांची मला क्षमा कर.
13 तुझ्या सेवकाला जाणूनबुजून केलेल्या पापापासून राख;
ती माझ्यावर राज्य न गाजवोत.
तेव्हा मी परिपूर्ण होईल,
आणि माझ्या पुष्कळ अपराधांपासून निर्दोष राहीन.
14 माझ्या तोंडचे शब्द आणि माझ्या हृदयाचे विचार तुझ्यासमोर मान्य असोत.
परमेश्वरा, तू माझा खडक आहेस, मला तारणारा तूच आहेस.

<- स्तोत्रसंहिता 18स्तोत्रसंहिता 20 ->