Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
16
उत्तम वारसा
दाविदाचे मिक्ताम (सुवर्णगीत)
1 हे देवा, माझे रक्षण कर, कारण मी तुझ्यात आश्रय घेतला आहे.
2 मी परमेश्वरास म्हणालो, “हे परमेश्वरा, तू माझा प्रभू आहेस, माझ्यामध्ये असलेला चांगुलपणा तुझ्याशिवाय काहीच नाही.”
3 पृथ्वीवर जे पवित्र (संत) आहेत, ते थोर जन आहेत. त्यांच्यामध्ये माझा सर्व आनंद आहे.
4 जे दुसऱ्या देवाला शोधतात, त्यांची दु:खे वाढवली जातील.
त्यांच्या देवाला मी रक्ताची पेयार्पणे ओतणार नाही.
किंवा त्यांचे नावसुद्धा आपल्या ओठाने घेणार नाही.
5 परमेश्वरा, तू माझा निवडलेला भाग आणि माझा प्याला आहे. माझा वाटा तुच धरून ठेवतोस.
6 माझ्या करिता सिमारेषा सुखद ठिकाणी पडल्या आहेत. खचित माझे वतन सुंदर आहे.
7 मी परमेश्वराची स्तुती करतो, ज्याने मला मार्गदर्शन केले आहे, रात्रीच्या वेळी माझे मन मला शिकविते.
8 मी परमेश्वरास नेहमी माझ्यासमोर ठेवतो म्हणून मी त्याच्या उजव्या हातातून कधीही ढळणार नाही.
9 त्यामुळे माझे हृदय आनंदी आहे; माझे मन त्यास उंच करते. खचित माझा देह सुद्धा सुरक्षित राहतो.
10 कारण तू माझ्या जीवाला मृतलोकांत राहू देणार नाही, ज्याच्याजवळ तुझी प्रेमदया आहे, त्यास तू अधोलोक पाहू देणार नाहीस.
11 तू मला जीवनाचा मार्ग शिकवला, तुझ्या उपस्थितीत विपुल हर्ष आहे, तुझ्या उजव्या हातात सुख सर्वकाळ आहेत.

<- स्तोत्रसंहिता 15स्तोत्रसंहिता 17 ->