Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
143
सुटका आणि मार्गदर्शन ह्यांसाठी प्रार्थना
दाविदाचे स्तोत्र
1 हे परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक; माझ्या विनवणीकडे कान दे.
तू आपल्या विश्वासाने आणि न्यायीपणाने मला उत्तर दे.
2 तू आपल्या सेवकाबरोबर न्यायनिवाड्यात प्रवेश करू नकोस.
कारण तुझ्या दृष्टीने कोणीही नितीमान नाही.
3 शत्रू माझ्या जिवाचा पाठलाग करीत आहेत;
त्यांनी माझे जीवन धुळीस मिळवले आहे;
पुरातन काळच्या मेलेल्यासारखे त्याने मला अंधकाराच्या स्थळी राहण्यास लाविले आहे.
4 माझ्याठायी माझा आत्मा व्याकुळ झाला आहे;
माझे हृदय घाबरे झाले आहे.
5 मी पूर्वीचे दिवस आठवतो;
मी तुझ्या सर्व कृत्यांवर मनन करतो;
तुझ्या हाताने सिद्धीस नेलेल्या कामावर विचार करतो.
6 मी प्रार्थनेत आपले हात तुझ्यापुढे पसरतो;
शुष्क भूमीप्रमाणे माझा जीव तुझ्यासाठी तहानेला झाला आहे.
7 हे परमेश्वरा, त्वरा करून मला उत्तर दे कारण माझा आत्मा क्षीण झाला आहे.
माझ्यापासून तू आपले मुख लपवू नकोस,
किंवा लपवशील तर मी गर्तेत उतरणाऱ्यांसारखा होईन.
8 सकाळी मला तुझ्या वात्सल्याचे शब्द ऐकू दे,
कारण मी तुझ्यावर भरवसा ठेवला आहे.
ज्या मार्गाने मी चालावे तो मला दाखव,
कारण मी आपला जीव तुझ्याकडे उंचावतो.
9 हे परमेश्वरा, माझ्या शत्रूपासून माझे रक्षण कर.
मी लपण्यासाठी तुझ्याकडे धाव घेतो.
10 मला तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यास शिकव,
कारण तू माझा देव आहेस.
तुझा चांगला आत्मा
मला सरळपणाच्या देशात नेवो.
11 हे परमेश्वरा, तुझ्या नावाकरता मला सजीव कर.
तुझ्या न्यायीपणाने माझा जीव संकटातून वर काढ.
12 तू आपल्या दयेने माझ्या शत्रूंचा नायनाट कर;
आणि माझ्या जीवनातील सर्व शत्रूंचा नाश कर,
कारण मी तुझा दास आहे.

<- स्तोत्रसंहिता 142स्तोत्रसंहिता 144 ->