Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
132
पवित्रस्थानाला आशीर्वाद देण्यासाठी प्रार्थना
1 हे परमेश्वरा, दावीदाकरता
त्याच्या सर्व दुःखांची आठवण कर.
2 त्याने परमेश्वराकडे कशी शपथ वाहिली,
त्याने याकोबाच्या समर्थ प्रभूला कसा नवस केला, याची आठवण कर.
3 तो म्हणाला “मी आपल्या घरात
किंवा मी आपल्या अंथरुणात जाणार नाही.
4 मी आपल्या डोळ्यांवर झोप
किंवा आपल्या पापण्यास विसावा देणार नाही.
5 परमेश्वरासाठी स्थान,
याकोबाच्या सर्वसमर्थ देवासाठी निवासमंडप सापडेपर्यंत मी असेच करीन.”
6 पाहा, आम्ही याबद्दल एफ्राथात ऐकले;
आम्हास तो जारच्या रानात सापडला.
7 आम्ही देवाच्या निवासमंडपात जाऊ;
आम्ही त्याच्या पदासनापाशी आराधना करू आणि म्हणू.
8 हे परमेश्वरा, ऊठ;
तू आपल्या सामर्थ्याच्या कोशासह आपल्या विश्रांतीस्थानी ये,
9 तुझे याजक नितीमत्तेचे वस्रे पांघरोत;
तुझे विश्वासू आनंदाने जयघोष करोत.
10 तुझा सेवक दावीदाकरिता,
तू आपल्या अभिषिक्त राजापासून निघून जाऊ नकोस.
11 परमेश्वराने विश्वसनीय दावीदाजवळ शपथ वाहिली आहे;
तो त्याच्या शपथेपासून माघार घेणार नाही,
मी तुझ्या वंशातून तुझ्या राजासनावर एकाला बसवीन.
12 जर तुझ्या मुलांनी माझा करार पाळला,
आणि मी त्यांना शिकवलेले नियम पाळले,
तर त्यांची मुलेसुद्धा तुझ्या राजासनावर सर्वकाळ बसतील.
13 खचित परमेश्वराने सियोन निवडून घेतली आहे;
त्याच्या वस्तीसाठी त्याने इच्छा धरली आहे.
14 “ही जागा सर्वकाळ माझ्या विसाव्याची आहे;
मी येथे राहीन, कारण माझी इच्छा आहे.
15 मी तिला विपुलतेने अन्नसामग्रीचा आशीर्वाद देईन;
मी तिच्या गरीबांना भाकरीने तृप्त करीन.
16 मी तिच्या याजकांना तारणाचे वस्त्र नेसवीन;
तिचे भक्त आनंदाने मोठ्याने जयघोष करतील.
17 तेथे दावीदाच्या शिंगाला अंकुर फुटेल असे मी करीन;
तेथे मी आपल्या अभिषिक्तासाठी दिवा ठेविला आहे.
18 मी त्याच्या शत्रूंला लाजेचे वस्रे नेसवीन,
परंतु त्याचा मुकुट चमकेल.”

<- स्तोत्रसंहिता 131स्तोत्रसंहिता 133 ->