Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
107
देव विपत्तीतून सोडवतो
1 परमेश्वरास धन्यावाद द्या. कारण तो चांगला आहे.
आणि त्याची कराराची विश्वसनियता सर्वकाळ टिकणारी आहे.
2 परमेश्वराने उद्धारलेले, ज्यांना खंडणी भरून
त्याने शत्रूच्या अधिकारातून सोडवले आहे,
3 त्याने त्यांना परक्या देशातून
पूर्व व पश्चिम, उत्तर व दक्षिण
या दिशातून एकवट केले आहे.
4 ते रानात वैराण प्रदेशातील रस्त्याने भटकले;
आणि त्यांना राहण्यास नगर सापडले नाही.
5 ते खूप भुकेले आणि तान्हेले होते;
आणि ते थकव्याने मूर्च्छित झाले.
6 नंतर त्यांनी आपल्या संकटात परमेश्वरास हाक मारली,
आणि त्याने त्यांना त्यांच्या विपत्तीतून सोडवले.
7 त्याने त्यांना सरळ मार्गाने नेले
यासाठी की, त्या नगरात त्यांना वस्त्ती करावी
8 अहा, परमेश्वराच्या कराराची विश्वसनियता
आणि आश्चर्यकारक गोष्टी त्याने मनुष्यजातीसाठी केल्या त्याबद्दल लोक त्याचा धन्यवाद करोत.
9 कारण त्याने तान्हेल्या जिवास तृप्त केले,
आणि भुकेल्या जिवाला उत्तम पदार्थांनी भरले.
10 काही कैदी क्लेशाने आणि साखळ्यांनी जखडलेले असता;
काळोखात आणि मरणाच्या छायेत बसले आहेत.
11 त्यांनी देवाच्या वचनाविरुध्द बंड केले,
आणि त्यांनी परात्पराचे शिक्षण नापसंत केले.
12 त्यांने त्यांचे हृदय कष्टाद्वारे नम्र केले;
ते अडखळून पडले आणि त्यांना मदत करायला तेथे कोणीही नव्हता.
13 तेव्हा त्यांनी आपल्या संकटात परमेश्वरास हाक मारली
आणि त्याने त्यांना त्यांच्या क्लेशातून बाहेर आणले.
14 देवाने त्यांना अंधारातून आणि मरणाच्या छायेतून बाहेर आणले,
आणि त्यांची बंधणे तोडली.
15 परमेश्वराच्या कराराची विश्वसनियता
आणि त्याने मनुष्यजातीसाठी केलेल्या आश्चर्यकारक गोष्टीबद्दल लोक त्याचे उपकारस्मरण करोत.
16 कारण त्याने पितळेची दारे तोडली,
आणि लोखंडाचे गज तोडून टाकले.
17 आपल्या बंडखोरीच्या मार्गात ते मूर्ख होते,
आणि आपल्या पापामुळे ते पीडिले होते.
18 सर्व उत्तम अन्न खाण्याची इच्छा त्यांना होईना
आणि ते मरणाच्या दाराजवळ ओढले गेले.
19 तेव्हा त्यांनी आपल्या संकटात परमेश्वरास हाक मारली,
आणि त्याने त्यांना क्लेशातून बाहेर आणले.
20 त्याने आपले वचन पाठवून त्यांना बरे केले,
आणि त्याने त्यांच्या नाशापासून त्यांना सोडवले.
21 परमेश्वराच्या कराराची विश्वसनियता
व त्याने मनुष्यजातीसाठी केलेल्या आश्चर्यकारक गोष्टींबद्दल लोक त्याचे उपकारस्मरण करोत.
22 ते त्यास आभाररुपी यज्ञ अर्पण करोत,
आणि गाण्यात त्याची कृत्ये जाहीर करोत.
23 काही जहाजातून समुद्र प्रवास करतात,
आणि महासागरापार व्यवसाय करतात.
24 ते परमेश्वराची कृत्ये पाहतात,
आणि त्याची अद्भुत कृत्ये समुद्रावर पाहतात.
25 कारण तो आज्ञा करतो आणि वादळ उठवितो;
तेव्हा समुद्र खवळतो.
26 लाटा आकाशापर्यंत वर पोहचतात, मग त्या खाली खोल तळाकडे जातात.
मनुष्याचे धैर्य धोक्यामुळे गळून जाते.
27 ते मद्याप्यासारखे डुलतात आणि झोकांड्या खातात,
आणि त्यांची बुद्धी गुंग होते.
28 तेव्हा ते आपल्या संकटात परमेश्वरास हाक मारतात,
आणि तो त्यांना त्यांच्या क्लेशातून बाहेर आणून वाचवतो.
29 तो वादळ शांत करतो,
आणि लाटांना स्तब्ध करतो.
30 समुद्र शांत झाल्यामुळे ते आनंद करतात,
तो त्यांना त्यांच्या इच्छित बंदरास आणतो.
31 परमेश्वरास त्याच्या कराराची विश्वसनियता
आणि त्याने मनुष्यजातीसाठी केलेल्या आश्चर्यकारक गोष्टींबद्दल लोक त्याचे उपकारस्मरण करोत.
32 लोकांच्या मंडळीत तो उंचविला जावो
आणि वडिलांच्या सभेत त्याची स्तुती होवो.
33 तो नद्यांना रान करतो,
पाण्याच्या झऱ्यांची कोरडी भूमी करतो,
34 आणि फलदायी जमिनीची नापीक जमिन करतो.
कारण तेथील राहणाऱ्या वाईट लोकांमुळे.
35 तो वाळवंटाचे पाण्याचे तळे करतो,
आणि कोरडी भूमीतून पाण्याचे झरे करतो.
36 तेथे भुकेल्यास वसवतो,
आणि त्यामध्ये राहण्यासाठी नगर बांधतो.
37 ते नगरे बांधतात त्यामध्ये शेते पेरतात, द्राक्षमळे लावतात,
आणि विपुल पिके काढतात.
38 तो त्यास आशीर्वाद देतो आणि त्यांची खूप वाढ होते,
तो त्यांच्या गुरांना कमी होऊ देत नाही.
39 नंतर यातनामयी अरिष्ट आणि दुःख यांमुळे
ते कमी होतात आणि नष्ट होतात.
40 तो शत्रूंच्या अधिपतीवर अपमान ओततो,
आणि त्यांना रस्ते नसलेल्या रानातून भटकायला लावतो.
41 पण तो गरजवंताना क्लेशापासून सुरक्षित ठेवतो,
आणि त्यांच्या कुटुंबांची कळपासारखी काळजी घेतो.
42 सरळ मनाचे हे पाहतात आणि आनंदी होतात,
आणि सर्व दुष्ट आपले तोंड बंद करतात.
43 जो कोणी ज्ञानी आहे त्याने ह्या गोष्टींकडे लक्ष द्यावे
आणि परमेश्वराच्या कराराच्या विश्वसनीयतेच्या कृतीवर मनन करावे.

<- स्तोत्रसंहिता 106स्तोत्रसंहिता 108 ->