Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
103
देवाच्या उपकारांबद्दल धन्यवाद
दाविदाचे स्तोत्र.
1 हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर,
हे माझ्या सर्व अंतर्यामा, त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर.
2 हे माझ्या जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर,
आणि त्याचे सर्व उपकार विसरू नकोस.
3 तो तुझ्या सर्व पापांची क्षमा करतो;
तो तुझे सर्व आजार बरे करतो.
4 तो तुझे आयुष्य नाशापासून खंडून घेतो;
तो तुला आपल्या विश्वासाच्या कराराने आणि करुणेच्या कृतीने मुकुट घालतो.
5 तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करतो,
म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे पुन्हा नवे होते.
6 जे सर्व अन्यायाने पीडलेले आहेत;
त्यांच्यासाठी परमेश्वर नितीचे आणि न्यायाची कृत्ये करतो.
7 त्याने मोशेला आपले मार्ग,
इस्राएल वंशजांना आपल्या कृत्यांची ओळख करून दिली.
8 परमेश्वर दयाळू आणि कृपाळू आहे;
तो सहनशील आहे; त्याच्यामध्ये महान कराराची विश्वासयोग्यता आहे.
9 तो नेहमीच शिक्षा करणार नाही;
तो नेहमीच रागावणार नाही.
10 तो आम्हाशी आमच्या पापास अनुरूप असे वागला नाही
किंवा आमच्या पापाला साजेसे प्रतिफळ दिले नाही.
11 कारण जसे पृथ्वीच्या वरती आकाश आहे,
तसे त्याचे जे भय धरतात त्यांच्यावर त्याची दया आहे.
12 जसे पूर्वेपासून पश्चिम जितकी दूर आहे,
तसे त्याने आमच्या पापाचे दोष आम्हापासून काढून टाकले आहेत.
13 जसा पिता आपल्या मुलांवर करुणा करतो,
तसा परमेश्वर आपला सन्मान करतात त्यावर करुणा करतो.
14 कारण आम्ही कसे अस्तित्वात आलो हे तो जाणतो,
आम्ही धुळ आहोत हे त्यास माहित आहे.
15 मनुष्याच्या आयुष्याचे दिवस गवताप्रमाणे आहेत;
शेतातील फुलासारखा तो फुलतो.
16 वारा त्यावरून वाहून जातो आणि ते नाहीसे होते,
आणि कोणीही सांगू शकत नाही की, ते एकदा कोठे वाढत होते.
17 परंतु परमेश्वराची करार विश्वसनियता त्याचा आदर करणाऱ्यावर अनादिकालापासून अनंतकाळापर्यंत असते.
त्याचा न्यायीपणाचा विस्तार त्यांच्या वंशजापर्यंत होतो.
18 जे त्याचा करार पाळतात
आणि त्यांच्या विधींचे स्मरण ठेवून त्याप्रमाणे चालतात त्यांना तो घडतो.
19 परमेश्वराने आपले सिंहासन स्वर्गात स्थापले आहे,
आणि त्याचे राज्य प्रत्येकावर सत्ता गाजवते.
20 अहो जे तुम्ही त्याचे दूत आहात,
ज्या तुम्हास महान सामर्थ्य आहे आणि जे त्याचे शब्द ऐकून,
त्याच्या आज्ञांचे आज्ञाधारकपणे पालन करता, ते तुम्ही परमेश्वराचा धन्यवाद करा.
21 अहो परमेश्वराच्या, सर्व सैन्यांनो जे तुम्ही त्याचे सेवक आहात;
ते तुम्ही त्याची इच्छा सिद्धीस नेता ते तुम्ही धन्यवादित आहात.
22 परमेश्वराच्या राज्यातील सर्व ठिकाणातील,
त्याच्या सर्व प्राण्यांनो त्याचा धन्यवाद करा;
हे माझ्या जिवा परमेश्वराचा धन्यवाद कर.

<- स्तोत्रसंहिता 102स्तोत्रसंहिता 104 ->