Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
6
आळस व खोटेपणा ह्यांविषयी उपदेश
1 माझ्या मुला, शेजाऱ्याच्या कर्जाला जामीनासाठी जर तू आपला पैसा बाजूला ठेवलास,
ज्याला तू ओळखत नाही अशा कोणाला तू कर्जासाठी वचन दिले,
2 तर मग तू आपल्या वचनाने पाशात अडकला आहेस,
आणि तू आपल्या तोंडच्या शब्दांनीच पकडला गेला आहेस.
3 ह्याकरिता, माझ्या मुला, तू हे कर आणि आपला बचाव कर,
कारण तू शेजाऱ्याच्या तावडीत सापडला आहेस.
जा आणि आपल्याला नम्र कर आणि आपल्या शेजाऱ्याला तुला मुक्त करण्यास आग्रह कर.
4 तुझ्या डोळ्यास झोप लागू देऊ नकोस,
आणि तुझ्या पापण्यास गुंगी येऊ देऊ नको.
5 शिकाऱ्याच्या हातातून हरीणीला;
जसे फासे पारध्याच्या हातातून पक्ष्याला, तसे तू आपणाला वाचव.
6 अरे आळशी मनुष्या, मुंगीकडे पाहा,
तिचे मार्ग पाहून शहाणा हो.
7 तिला कोणी सेनापती
अधिकारी, किंवा राजा नाही.
8 तरी ती उन्हाळ्यात आपले अन्न तयार करते,
आणि जे काय खाण्यास लागणारे कापणीच्या समयी ते जमा करून ठेवते.
9 अरे आळशी मनुष्या, तू किती वेळ झोपून राहशील?
तू आपल्या झोपेतून केव्हा उठशील?
10 “आणखी थोडीशी झोप घेतो, आणखी थोडीशी डुलकी खातो.
आणखी विसावा घ्यायला हात घडी करतो.”
11 असे म्हणशील तर दारिद्र्य दरोडेखोराप्रमाणे
आणि तुझी गरिबी हत्यारबंद मनुष्यासारखी येईल.
12 दुर्जन व वाईट मनुष्य
त्याच्या कपटी बोलण्याने जगतो,
13 त्याचे डोळे मिचकावतो, आपल्या पायांनी इशारा करतो,
आणि आपल्या बोटांनी खुणा करतो.
14 त्याच्या हृदयात कपट असून त्याबरोबर तो दुष्ट योजना आखतो;
तो नेहमी वैमनस्य पसरतो.
15 यामुळे त्याची विपत्ती तत्क्षणी त्यास गाठेल;
कोणत्याही उपचाराशिवाय एका क्षणात तो तुटेल.
16 परमेश्वर अशा या सहा गोष्टींचा द्वेष करतो,
त्यास अशा सात गोष्टींचा वीट आहेः
17 गर्विष्टांचे डोळे, लबाड बोलणारी जीभ,
निरपराध्यांचे रक्त पाडणारे हात,
18 मन जे वाईट गोष्टी करण्याच्या योजना आखते,
पाय जे वाईट गोष्टी करायला त्वरेने धाव घेतात,
19 लबाड बोलणारा खोटा साक्षी,
आणि जो कोणी भावाभावामध्ये वैमनस्य पेरणारा मनुष्य, ह्या त्या आहेत.
व्याभिचाराविषयी ताकीद
20 माझ्या मुला, तुझ्या वडिलांची आज्ञा पाळ,
आणि तुझ्या आईची शिकवण विसरु नकोस.
21 ती नेहमी आपल्या हृदयाशी कवटाळून धर;
ती आपल्या गळ्यात बांधून ठेव.
22 जेव्हा तू चालशील, ते तुला मार्गदर्शन करील;
जेव्हा तू झोपशील, तेव्हा ते तुझे रक्षण करील;
आणि जेव्हा तू उठशील तेव्हा ते तुझ्याशी बोलेल.
23 कारण ती आज्ञा दिवा आहेत आणि शिक्षण प्रकाश आहे;
शिस्तीचा दोषारोप जीवनाचा मार्ग आहे.
24 ते तुला अनितीमान स्त्रीकडे जाण्यापासून परावृत्त करते,
व्यभिचारी स्त्रीच्या गोडबोल्या जिभेपासून तुझे रक्षण करते.
25 तू आपल्या हृदयात तिच्या सुंदरतेची लालसा धरू नकोस,
आणि ती आपल्या पापण्यांनी तुला वश न करो.
26 वेश्येबरोबर झोपल्याने भाकरीच्या तुकड्याची किंमत चुकवावी लागते,
पण दुसऱ्याच्या पत्नीची किंमत म्हणून तुला तुझ्या स्वतःचे जीवन द्यावे लागेल.
27 मनुष्याने आपल्या छातीशी विस्तव धरून ठेवला तर,
त्याचे कपडे जळल्याशिवाय राहतील काय?
28 जर एखादा मनुष्य निखाऱ्यांवर चालला,
तर त्याचे पाय भाजल्याशिवाय राहतील काय?
29 जो कोणी आपल्या शेजाऱ्याच्या पत्नीबरोबर जातो तो असाच आहे;
जो कोणी तिच्याबरोबर संबंध ठेवतो त्यास शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही.
30 जर चोर चोरी करताना पकडला तर लोक त्यास तुच्छ मानत नाही;
तो भुकेला असताना त्याची भूक शमविण्यासाठी त्याने चोरी केली.
31 पण तो पकडला गेला, तर त्याने चोरी केली त्याच्या सातपट परत देईल,
तो आपल्या घरचे सर्वच द्रव्य देईल.
32 जो व्यभिचार करतो तो बुद्धिहीन आहे;
जो आपल्या जिवाचा नाश करू इच्छितो तो असे करतो.
33 जखमा व अप्रतिष्ठा त्यास प्राप्त होतील,
आणि त्याची लज्जा कधीही धुतली जाणार नाही.
34 कारण ईर्ष्या मनुष्यास संतप्त करते;
सूड उगविण्याच्या दिवशी तो गय करणार नाही.
35 तो काही खंडणी स्वीकारणार नाही,
आणि त्यास खूप दाने दिली तरी तो शांत राहणार नाही.

<- नीतिसूत्रे 5नीतिसूत्रे 7 ->