Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
2
ज्ञानार्जनाचे फायदे
1 माझ्या मुला, जर तू माझी वचने स्वीकारशील
आणि माझ्या आज्ञा तुझ्याजवळ संग्रह करून ठेवशील,
2 ज्ञानाचे ऐकशील.
आणि ज्ञानाकडे तुझे मन लावशील.
3 जर तू विवेकासाठी आरोळी करशील,
आणि तुझा आवाज त्यासाठी मोठ्याने उच्चारशील;
4 जर तू रुप्याप्रमाणे त्याचा शोध घेशील,
आणि जसे तू गुप्तधन मिळविण्याचा प्रयत्न करतो तसेच ज्ञानाचा शोध घेशील;
5 तर तुला परमेश्वराच्या भयाची जाणीव होईल,
आणि देवाविषयीचे ज्ञान तुला सापडेल.
6 कारण परमेश्वर ज्ञान देतो,
त्याच्या मुखातून सुज्ञता आणि ज्ञान येतात.
7 जे त्यास संतोषवितात त्यांना तो पूर्ण ज्ञान देतो,
जे प्रामाणिकपणे चालतात त्यांना तो ढाल आहे,
8 तो न्यायाच्या मार्गाचे रक्षण करतो,
आणि जे त्याच्याबरोबर विश्वसनीय आहेत त्याच्या मार्गात टिकून राहतील.
9 मग धर्म, निती व सात्विकता तुला समजेल,
आणि प्रत्येक चांगला मार्ग कळेल.
10 ज्ञान तुझ्या हृदयात प्रवेश करील,
आणि तुझ्या आत्म्याला ज्ञान आनंदित करील.
11 दूरदर्शीपणा तुझ्यावर पहारा करील,
आणि समंजसपणा तुला सांभाळेल.
12 ते तुला वाईट मार्गापासून सोडविल,
कपटी गोष्टी बोलणाऱ्यापासून, सोडवायला तो तुला संभाळील,
13 ते चांगले मार्ग सोडून,
अंधकाराच्या मार्गांनी चालत आहेत.
14 जेव्हा ते दुष्कर्म करतात ते आनंदित होतात,
आणि दुष्कर्माच्या विकृतीवरून ते उल्लासतात.
15 ते वाकडे मार्ग अनुसरतात,
आणि ते फसवणूक करून त्यांच्या वाटा लपवतात.
16 ज्ञान आणि दूरदर्शीपणा तुला अनितीमान स्त्रीपासून वाचवील,
जी स्त्री धाडस करायला बघते आणि खुशामतीच्या शब्दांनी स्तुती करते.
17 तिने आपला तरुणपणाचा सोबती सोडला आहे,
आणि आपल्या देवाचा करार विसरली आहे.
18 कारण तिचे घर मरणाकडे खाली वाकले आहे.
आणि तिच्या वाटा तुला त्या कबरेत असलेल्याकडे घेऊन जातात.
19 जे सर्व कोणी तिच्याकडे जातात ते पुन्हा माघारी येत नाहीत.
आणि त्यांना जीवनाचा मार्ग सापडत नाही.
20 म्हणून तू चांगल्या लोकांच्या मार्गाने चालावे,
व जे योग्य मार्गाने जातात त्याच्यामागे जावे.
21 कारण योग्य करतात तेच देशात घर करतील,
आणि जे प्रामाणिक आहेत तेच त्यामध्ये राहतील.
22 परंतु दुष्टांना त्यांच्या वतनातून छेदून टाकले जाईल,
आणि जे विश्वासहीन त्यांना त्यांच्या वतनापासून दूर नेले जाईल.

<- नीतिसूत्रे 1नीतिसूत्रे 3 ->