Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
16
जीवन आणि वर्तणूक ह्यांसंबधीची सूत्रे
1 मनात योजना करणे मनुष्याच्या हातचे आहे,
पण त्याच्या जिव्हेचे उत्तर देणे परमेश्वराकडचे आहे.
2 मनुष्याच्या दृष्टीने त्याचे सर्व मार्ग शुद्ध असतात,
पण परमेश्वर आत्मे तोलून पाहतो.
3 आपली कामे परमेश्वराच्या स्वाधीन करा,
आणि म्हणजे तुमच्या योजना यशस्वी होतील.
4 परमेश्वराने सर्वकाही त्याच्या उद्देशासाठी बनवलेले आहे,
दुर्जनदेखील अरिष्टाच्या दिवसासाठी केलेला आहे.
5 प्रत्येक गर्विष्ठ मनाच्या मनुष्याचा परमेश्वरास वीट आहे,
जरी ते हातात हात घालून उभे राहिले, तरी त्यांना शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही.
6 कराराचा प्रामाणिकपणा व विश्वसनीयता ह्यांच्या योगाने पापांचे प्रायश्चित होते,
आणि परमेश्वराचे भय धरल्याने, लोक वाईटापासून वळून दूर राहतील.
7 मनुष्याचे मार्ग परमेश्वरास आवडले म्हणजे,
त्या मनुष्याच्या शत्रूलाही त्याच्याशी समेट करण्यास भाग पाडतो.
8 अन्यायाने मिळवलेल्या मोठ्या मिळकतीपेक्षा,
न्यायाने कमावलेले थोडेसे चांगले आहे.
9 मनुष्याचे मन त्याच्या मार्गाची योजना करते,
पण परमेश्वर त्याच्या पावलांना वाट दाखवतो.
10 दैवी निर्णय राजाच्या ओठात असतात,
न्याय करताना त्याच्या मुखाने कपटाने बोलू नये.
11 परमेश्वराकडून प्रामाणिक मोजमाप येते;
पिशवीतील सर्व वजने त्याचे कार्य आहे.
12 जेव्हा राजा वाईट गोष्टी करतो, त्या गोष्टी त्यास तिरस्कारणीय आहेत,
कारण राजासन नीतिमत्तेनेच स्थापित होते.
13 नीतिमत्तेने बोलणाऱ्या ओठाने राजाला आनंद होतो,
आणि जे कोणी सरळ बोलतात ते त्यास प्रिय आहेत.
14 राजाचा क्रोध मृत्यू दूतांसारखा आहे.
पण सुज्ञ मनुष्य त्याचा राग शांत करण्याचा प्रयत्न करतो.
15 राजाच्या मुखतेजात जीवन आहे,
आणि त्याचा अनुग्रह शेवटल्या पावसाच्या मेघासारखा आहे.
16 सोन्यापेक्षा ज्ञान प्राप्त करून घेणे किती तरी उत्तम आहे.
रुप्यापेक्षा समजुतदारपणा निवडून घ्यावा.
17 दुष्कर्मापासून वळणे हा सरळांचा राजमार्ग आहे,
जो आपल्या मार्गाकडे लक्ष ठेवतो तो आपला जीव राखतो.
18 नाशापूर्वी गर्व येतो,
आणि मनाचा ताठा अधःपाताचे मूळ आहे.
19 गर्विष्ठांबरोबर राहून लूट वाटून घेण्यापेक्षा
दीनांबरोबर विनम्र असणे चांगले.
20 जो कोणी जे काही चांगले आहे ते शोधतो,
त्यास शिकवीले त्याचे निरीक्षण करतो,
आणि जो परमेश्वरावर विश्वास ठेवतो तो आनंदीत होतो.
21 जो मनाचा सुज्ञ त्यास समंजस म्हणतात,
आणि मधुर वाणीने शिकवण्यची क्षमता वाढते.
22 ज्यांच्याकडे सुज्ञान आहे त्यास ती जीवनाचा झरा आहे,
पण मूर्खाचे मूर्खपण त्याची शिक्षा आहे.
23 सुज्ञ मनुष्याच्या हृदयापासून त्याच्या मुखास शिक्षण मिळते;
आणि त्याच्या वाणीत विद्येची भर घालते.
24 आनंदी शब्द मधाचे पोळ अशी आहेत,
ती जिवाला गोड व हाडांस आरोग्य आहेत.
25 मनुष्यास एक मार्ग सरळ दिसतो,
पण त्याचा शेवट मृत्यूमार्गाकडे आहे.
26 कामगाराची भूक त्याच्यासाठी काम करते;
त्याची भूक त्यास ते करायला लावते.
27 नालायक मनुष्य खोड्या उकरून काढतो,
आणि त्याची वाणी होरपळणाऱ्या अग्नीसारखी आहे.
28 कुटिल मनुष्य संघर्ष निर्माण करतो,
आणि निंदा करणाऱ्या जवळच्या मित्रांना वेगळे करतो.
29 जुलमी मनुष्य आपल्या शेजाऱ्याशी लबाड बोलतो,
आणि जो मार्ग चांगला नाही अशात त्यास नेतो.
30 जो कोणी मनुष्य कुटिल गोष्टीच्या योजणेला डोळे मिचकावतो;
जो आपले ओठ आवळून धरतो तो दुष्कर्म घडून आणतो.
31 पिकलेले केस वैभवाचा मुकुट आहे;
नीतिमत्तेच्या मार्गाने चालण्याने तो प्राप्त होतो.
32 ज्याला लवकर राग येत नाही तो योद्धापेक्षा,
आणि जो आत्म्यावर अधिकार चालवतो तो नगर जिंकऱ्यापेक्षा उत्तम आहे.
33 पदरात चिठ्ठ्या टाकतात,
पण त्यांचा निर्णय सर्वस्वी परमेश्वराकडून आहे.

<- नीतिसूत्रे 15नीतिसूत्रे 17 ->