Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
4
लेव्यांच्या जबाबदाऱ्या
1 परमेश्वर मोशे व अहरोन यांच्याशी बोलला, तो म्हणाला, 2 लेवी लोकांपैकी कहाथी कुळांच्या पुरुषांची त्यांच्या वाडवडिलांच्या घराण्याप्रमाणे गणती कर. (हे लोक लेवीच्या कुळापैकीच होते) 3 तीस ते पन्नास वर्षांच्या पुरुषांची गणती कर. हे पुरुष दर्शनमंडपातली सेवा करण्यासाठी सैन्यात जातात त्यांची गणती कर. 4 कहाथ वंशजांनी दर्शनमंडपामधील परमपवित्र वस्तू ज्या माझ्यासाठी राखून ठेवल्या आहेत त्यांची त्यांनी काळजी घ्यावी.

5 जेव्हा छावणी आपला तळ पुढे हलविण्याची तयारी करील, तेव्हा अहरोन व त्याच्या मुलांनी तंबूत जाऊन परमपवित्र स्थानातील पडदा जो पवित्रस्थानापासून वेगळा करतो तो खाली काढावा व त्याने कराराचा कोश झाकावा. 6 मग त्यांनी कोशावर तहशाच्या [a]कातड्याचे आच्छादन घालावे व त्यावर संपूर्ण निळ्या रंगाचे कापड पसरावे व त्यांनी तो वाहून नेण्यासाठी दांडे लावावे.

7 त्यांनी समक्षतेच्या भाकरीच्या मेजावर निळ्या रंगाचे कापड पसरावे व त्यावर तबके, धूपपात्रे, वाट्या व पेयार्पणे ओतण्याचे पेले ठेवावे; त्याचप्रमाणे नेहमीची भाकरही त्यावर ठेवावी. 8 त्या सर्वांवर किरमिजी रंगाचे कापड पसरावे व नंतर ते सर्व तहशाच्या कातड्याने झाकून टाकावे; तो वाहून नेण्यासाठी मेजाला दांडे बसवावे.

9 त्यांनी दीपस्तंभ आणि त्यावरील दिवे, तसेच दिवे सतत तेवत ठेवण्याकरिता लागणारी सर्व उपकरणे चिमटे, ताटल्या आणि दिव्यासाठी लागणाऱ्या तेलाची सर्व पात्रे ही सर्व निळ्या कापडाने झाकावी. 10 या सर्व वस्तू त्यांनी तहशाच्या कातड्याने लपेटून घ्याव्यात आणि हे सर्व वाहून न्यावयाच्या चौकटीवर त्यांनी ठेवावे. 11 त्यांनी सोन्याच्या वेदीवर निळे कापड पसरावे. ते तहशाच्या कातड्याने झाकावे व मग वेदीला वाहून नेण्याचे दांडे बसवावे.

12 मग पवित्रस्थानातील उपासनेसाठी लागणारी सर्व उपकरणे त्यांनी गोळा करावीत व ती निळ्या कापडात गुंडाळावीत; त्यावर तहशाच्या कातड्याचे आच्छादन टाकावे आणि मग हे सर्व त्यांनी वाहून नेणाऱ्या चौकटीवर ठेवावे. 13 मग त्यांनी वेदीवरील सर्व राख काढून ती स्वच्छ करावी व वेदीवर जांभळ्या रंगाचे कापड पसरावे. 14 नंतर त्यांनी वेदीच्या सेवेची सर्व उपकरणे म्हणजे अग्नीपात्रे, काटे, फावडी व कटोरे या वेदीच्या सर्व वस्तू गोळा करून त्या वेदीवर ठेवाव्यात; मग तिच्यावर तहशाच्या कातड्याचे आच्छादन घालावे व मग तिला वाहून नेण्याचे दांडे बसवावेत.

15 अहरोन व त्याचे पुत्र ह्यानी पवित्रस्थानातील सर्व पवित्र वस्तूवर आच्छादन टाकण्याचे पूर्ण करावे; मग कहाथी लोकांनी आत जावे आणि त्या वस्तू वाहून नेण्याचे काम सुरु करावे; अशा प्रकारे ते पवित्र वस्तूंना स्पर्श करणार नाहीत आणि मरणार नाहीत. दर्शनमंडपामधील जी ओझी कहाथवंशजांनी वाहावयाची ती हीच. 16 पवित्र निवासमंडप व त्यातील सर्व वस्तू व उपकरणे म्हणजे पवित्रस्थान व त्यातील दिव्यांना लागणारे तेल, सुगंधी धूप, रोजची अन्नार्पणे व अभिषेकाचे तेल या सर्वांची जबाबदारी अहरोन याजकाचा मुलगा एलाजार ह्याने घ्यावी.

17 परमेश्वर मोशे व अहरोनाशी बोलला. तो म्हणाला, 18 तुम्ही कहाथी वंशातल्या कुळाचा वंश लेव्यातून काढून टाकण्याची परवानगी देऊ नका; 19 जेव्हा ते परमपवित्रस्थानातील वस्तूजवळ जातील तेव्हा त्यांनी मरू नये पण जगावे म्हणून अहरोन व त्याचे पुत्र ह्यांनी आत जाऊन त्यांच्यातील एकएकाला त्यांचे काम व ओझे नेमून द्यावे. 20 पवित्र स्थानातील वस्तू पाहण्यास त्यांनी क्षणभरही आत जाऊ नये किंवा गेले तर ते मरतील. अहरोनाने व त्याच्या मुलांनी आत जाऊन कहाथीतल्या एकएकाला त्याचे काम व त्याचे विशेष काम नेमून द्यावे.

21 परमेश्वर मोशेशी पुन्हा बोलला. तो म्हणाला, 22 गेर्षोन वंशातील पुरुषांची गणना कर आणि त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याच्याप्रमाणे त्यांची यादी कर; 23 म्हणजे तीस ते पन्नास वर्षे वयाचे जे दर्शनमंडपातले काम करायला पात्र असतील अशा लोकांची गणती कर.

24 गेर्षोनी कुळांनी करावयाची सेवा व वाहावयाची ओझी ही अशीः 25 त्यांनी निवासमंडपाचे पडदे, दर्शनमंडप व त्याचे आच्छादन आणि त्यावर असलेले तहशाच्या कातड्याचे आच्छादन तसेच दर्शनमंडपाच्या प्रवेशद्वाराचा पडदा, 26 निवासमंडप व वेदी ह्यांच्या भोंवतीच्या अंगणाच्या कनातीचे पडदे, तसेच अंगणाच्या प्रवेश दाराचा पडदा, सर्व तणावे व त्यांच्याबरोबर लागणारी उपकरणे, या सर्व वस्तू गेर्षोनी कुळांनी वहाव्यात; आणि या सामानासंबंधी जे काही काम पडेल ते त्यांनी करावे.

27 गेर्षोनी लोकांनी त्यांना नेमून दिलेली कामे वाहने आणि जी सर्व सेवा, अहरोनाच्या व त्याच्या मुलांच्या आज्ञेवरून करावी. त्यांचा भार त्यांच्याकडे सोपवावा. 28 गेर्षोनी कुळातील लोकांची दर्शनमंडपातली ही सेवा आहे. अहरोन याजकाचा मुलगा इथामार ह्यांच्या हाताखाली त्यांनी कामाची जबाबदारी पार पाडावी.

29 मरारी वंशजांचीही, त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी या प्रमाणे गणती कर. 30 म्हणजे तीस ते पन्नास वर्षेच्या वयाच्या दर्शनमंडपामधील सेवा करण्यास पात्र असलेल्या पुरुषांची गणती कर.

31 दर्शनमंडपाच्या ज्या वस्तू वाहून नेण्याची जबाबदारी त्यांना करावी लागेल ती हीः निवासमंडपाच्या फळ्या, अडसर, खांब, उथळ्या, वाहून नेण्याचे काम त्यांनी करावे. 32 तसेच सभोंवतीच्या अंगणाचे खांब, उथळ्या, तंबूच्या मेखा, तणावे आणि अंगणाच्या खांबासाठी लागणारी इतर उपकरणे, इत्यादी सर्वसामान वाहून नेण्याचे व निगा राखण्याचे काम मरारी लोकांचे आहे. त्या मनुष्यांच्या नावांची यादी करा व प्रत्येकाने नक्की काय वाहून न्यायचे ते त्यास सांगा.

33 दर्शनमंडपाची कामे करिताना मरारी कुळातील पुरुषांनी ही सेवा करावी त्यांच्या कामासाठी अहरोन याजकाचा मुलगा इथामार हा जबाबदार राहील.

34 मोशे, अहरोन व इस्राएलाच्या मंडळीचे पुढारी ह्यानी कहाथी लोकांची, त्यांची कुळे व वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे गणती केली. 35 त्यांनी, दर्शनमंडपाच्या सेवेसाठी पात्र असलेल्या तीस ते पन्नास वर्षे वयाच्या पुरुषांची गणती केली. 36 ज्या पुरुषांची त्यांच्या वंशाप्रमाणे गणती झाली ते दोन हजार सातशे पन्नास लोक होते.

37 कहाथी वंशापैकी जे दर्शनमंडपामध्ये पवित्र सेवा करीत त्यांची गणती करण्यात आली. मोशे व अहरोन ह्यानी, परमेश्वराने मोशेला सांगितल्याप्रमाणे हे केले. 38 तसेच गेर्षोनी वंशजांचीही, त्यांची कुळे व वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे गणती करण्यात आली; 39 म्हणजे दर्शनमंडपाच्या सेवेसाठी पात्र असलेले तीस ते पन्नास वर्षे वयाच्या सर्व पुरुषांची गणती करण्यात आली. 40 ज्या पुरुषांची, त्यांचे वंश व वाडवडिलांची घराणी ह्यास अनुसरून गणती झाली ती दोन हजार सहाशे तीस होती.

41 गेर्षोनी कुळांपैकी नोंद घेतलेले जे सर्व दर्शनमंडपामध्ये सेवा करीत असत, ज्यांची नोंद मोशे व अहरोन ह्यानी, परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केली.

42 त्याचप्रमाणे मरारी वंशजांचीही, त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे गणती करण्यात आली, 43 म्हणजे तीस ते पन्नास वर्षे वयाचे जे दर्शनमंडपातले काम करायला पात्र होते ते सर्व, 44 ज्या पुरुषांची त्यांच्या कुळास अनुसरून गणती झाली ते तीन हजार दोनशे भरले.

45 मरारी वंशापैकी ज्या पुरुषांची गणती मोशे व अहरोन ह्यानी, परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे केली, ते इतके भरले.

46 तेव्हा मोशे, अहरोन व इस्राएलाचे पुढारी ह्यानी सर्व लेवी लोकांची गणती, त्यांची कुळे व वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे केली. 47 तीस ते पन्नास वर्षे वय असलेल्या व दर्शनमंडपामधील सेवा करण्यास व ओझे वाहण्यास पात्र असलेल्या पुरुषांची गणती करण्यात आली; 48 त्यांची एकूण संख्या आठ हजार पांचशे ऐंशी होती.

49 तेव्हा परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे प्रत्येक मनुष्याची गणती करण्यात आली; प्रत्येक मनुष्यास त्याने स्वत: करावयाचे काम नेमून देण्यात आले व त्याने काय वाहून न्यावयाचे ते सांगण्यात आले. हे सर्व परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे करण्यात आले.

<- गणना 3गणना 5 ->