Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
34
1 परमेश्वर मोशेशी बोलला व म्हणाला, 2 इस्राएल लोकांस ही आज्ञा दे आणि त्यांना सांग, तुम्ही कनान देशात येत आहात. तुम्ही त्या देशाचा पराभव करा. तुम्ही सर्व कनान देश घ्या. 3 दक्षिणेकडे अदोमाजवळच्या त्सीन रानाचा काही भाग तुम्हास मिळेल. तुमची दक्षिणेकडची सीमा मृत समुद्राच्या दक्षिण टोकापासून सुरु होईल.

4 तेथून अक्रब्बीम चढावाचे दक्षिण टोक पार करून ती त्सीन रानातून कादेश-बर्ण्याला जाईल. आणि नंतर हसर-अद्दारपर्यंत जाऊन असमोनाला पोहोचेल. 5 असमोनाहून ती मिसर देशाच्या नदीपर्यंत जाईल आणि समुद्रात तिची समाप्ती होईल.

6 तुमची पश्चिमेकडची सीमा म्हणजे महासमुद्र व त्याचा किनारा राहिल तीच तुमची पश्चिम सीमा आहे.

7 तुमची उत्तरेकडची सीमा महासमुद्रात सुरु होईल व होर पर्वताकडे एक रेषा आंखावी. 8 होर पर्वतावरुन ती लेबो हमाथाला जाईल व तेथून सदादला. 9 नंतर ती सीमा जिप्रोनला जाईल व हसर-एनानला ती संपेल. तेव्हा ती तुमची उत्तर सीमा.

10 तुमची पूर्व सीमा हसर-एनानजवळ सुरु होईल व ती शफामपर्यंत जाईल. 11 शफामपासून ती अईनाच्या पूर्वेकडे रिब्लाला जाईल. ती सीमा उतरत किन्नेरेथ समुद्राच्या पूर्वेकडील किनाऱ्याच्या पर्वतांच्या रांगापर्यंत जाईल. 12 आणि नंतर ती यार्देन नदीच्या काठाने जाऊन मृतसमुद्रात तिची समाप्ती होईल. तुझ्या देशाच्या या सीमा आहेत.

13 तेव्हा मोशेने इस्राएल लोकांस आज्ञा केली व म्हणाला की, चिठ्ठ्या टाकून ज्या देशाचे वतन तुम्हास मिळणार आहे. म्हणजे साडे नऊ वंशाना जो देश देण्याचे परमेश्वराने देण्याचे ठरविले आहे तो हाच. 14 रऊबेन आणि गादची वंश आणि मनश्शेच्या अर्ध्या वंशानी आधीच त्यांचे वतन घेतले आहे. 15 त्या अडीच वंशानी यरीहोजवळ यार्देन नदीच्या पूर्वेकडचे वतन मिळाले आहे.

16 नंतर परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला, 17 जो पुरुष हा देश तुम्हास वतन म्हणून वाटून देणार आहे तो याजक एलाजार आणि नूनाचा मुलगा यहोशवा. 18 प्रत्येक वंशाचा एक प्रमुख वतन म्हणून देशाची विभागणी करण्यास घ्यावा.

19 त्या मनुष्यांची नावे ही आहेत

यहूदाच्या वंशातला, यफुन्नेचा मुलगा कालेब.
20 शिमोनाच्या वंशातील, अम्मीहुदाचा मुलगा शमुवेल.
21 बन्यामिनाच्या वंशातील, किसलोनाचा मुलगा अलीदाद.
22 दानी वंशातील, सरदार यागलीचा मुलगा बुक्की.
23 योसेफाच्या वंशातील, सरदार मनश्शेच्या वंशातील, एफोदाचा मुलगा हन्नीएल.
24 एफ्राईम वंशातील, सरदार शिफटानाचा मुलगा कमुवेल.
25 जबुलून वंशातील सरदार पनीकाचा मुलगा अलीसाफान.
26 इस्साखार वंशातील सरदार अज्जानाचा मुलगा पलटीयेल.
27 आशेरी वंशातील सरदार शलोमीचा मुलगा अहीहूद.
28 आणि नफताली वंशातील सरदार अम्मीहुदाचा मुलगा पदाहेल.
29 परमेश्वराने कनानाच्या भूमीची इस्राएल लोकांमध्ये वाटणी करण्यासाठी या मनुष्यांची निवड केली.

<- गणना 33गणना 35 ->