Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
6
इस्त्राएलाशी परमेश्वराचा वाद
1 आता परमेश्वर जे म्हणतो, ते ऐक.
मीखा त्यास म्हणाला,
ऊठ व पर्वतांसमोर तुझी बाजू मांड
आणि डोंगर तुझा शब्द ऐकोत.
2 पर्वतांनो व पृथ्वीच्या टिकाऊ पायांनो,
परमेश्वराचा वाद ऐका,
कारण परमेश्वरास आपल्या लोकांशी वाद करायचा आहे,
आणि तो इस्राएलाशी वाद करणार आहे.
3 “माझ्या लोकांनो, मी काय केले?
मी तुम्हास कशाने कंटाळविले ते सांगा?
माझ्या विरुद्ध साक्ष दे.
4 कारण मी मिसर देशातून तुम्हास बाहेर काढले
आणि दास्यत्वाच्या घरातून तुला सोडवीले,
मी मोशे, अहरोन व मिर्यामला तुझ्याकडे पाठवले.
5 माझ्या लोकांनो, मवाबचा राजा बालाक याने काय योजिले होते ते आठवा
आणि बौराचा मुलगा बलाम, काय म्हणाला त्याची आठवण करा,
त्याने शिट्टीमपासून गिलगालपर्यंत[a] येऊन त्यास कसे उत्तर दिले,
त्याचे स्मरण करा, हे अशासाठी की परमेश्वराचे न्यायीपण तुमच्या लक्षात यावे.”
परमेश्वरास काय हवे?
6 मी परमेश्वरास काय देऊ?
आणि काय घेऊन परात्पर देवासमोर नमन करू?
मी होमार्पणे व एक वर्षाचे वासरू घेऊन त्याच्या पुढे यावे का?
7 हजार मेंढ्यांनी किंवा दहा हजार तेलाच्या नद्यांनी परमेश्वर प्रसन्न होईल का?
माझ्या पापांची किंमत म्हणून मी माझे पहिले अपत्य द्यावे का?
माझ्या देहाच्या पापाबद्दल माझ्या देहाचे फळ देऊ काय?
8 हे मनुष्या,
चांगले ते त्याने तुला सांगितले आहे.
आणि न्यायीपणाने वागने, दया व निष्ठा ह्यावर प्रेम करणे
आणि आपल्या परमेश्वरासोबत नम्रपणे चालने.
यांखेरीज परमेश्वर तुझ्याजवळ काय मागतो?
9 परमेश्वराची वाणी नगरात घोषणा करते.
जो सुज्ञ आहे तो तुझे नाव ओळखतो,
म्हणून काठीकडे आणि ज्याने ती नेमली आहे त्याच्याकडे लक्ष द्या.
10 अजूनपण वाईटाचा पैसा
आणि उणे धिक्कारलेले माप ही दुष्टांच्या घरांत आहेत.
11 मी असा एक मनुष्य निर्दोष असल्याचा विचार करावा का, जो दुष्टतेची तागडी आणि कपटाच्या वजनांची पिशवी बळगतो?
12 त्या नगरीतील श्रीमंत जुलमाने भरलेले आहेत,
त्यामध्ये राहणारे खोटे बोलले आहेत.
त्यांची जीभ त्यांच्या मुखात कपटी बोलते.
13 म्हणून मी तुम्हास गंभीर अशा जखमांनी मारले आहे,
तुझ्या पापांमुळे मी तुझी अधोगती केली आहे.
14 तू खाशील पण तृप्त होणार नाही,
तुझे रितेपण तुझ्यामध्ये राहील,
तू चांगले ते साठवून ठेवशील पण ते रक्षण होणार नाही,
आणि ज्याचे तू रक्षण करशील ते मी तलवारीला देईन.
15 तू पेरशील, पण कापणी करणार नाही;
तू जैतूनांपासून तेल काढण्यासाठी ते तुडवशील,
पण त्याचे तेल स्वत:ला लावणार नाही;
तू द्राक्ष तुडवशील, पण त्याचा रस पिणार नाही.
16 कारण अम्रीचे नियम पाळले जातात
आणि अहाबाच्या घराण्याची सर्व कार्ये करण्यात येतात.
तुम्ही त्यांच्या मसलती प्रमाणे चालता,
म्हणून मी तुझा व तुझ्या शहराचा नाश करीन व
त्याच्या रहिवाशांचा उपहास होईल
आणि माझ्या लोकांची अप्रतिष्ठा तुम्हास सोसावी लागेल.

<- मीखा 5मीखा 7 ->