Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
2
गरिबांना छळणाऱ्यांचा धिक्कार
1 जे पाप करण्याचे योजीतात व आपल्या पलंगावर दुष्ट बेत करतात,
त्यांना हायहाय.
आणि सकाळ होताच ते आपले योजलेले वाईट काम करतात,
कारण त्यांच्याजवळ सामर्थ्य आहे.
2 आणि ते शेतांची इच्छा धरतात व ती हरण करून मिळवतात;
आणि घरांची इच्छा धरतात व ती मिळवतात.
ते पुरुषावर व त्याच्या घराण्यावर,
मनुष्यावर व त्याच्या वतनावर जुलूम करतात.
3 ह्यास्तव परमेश्वर असे म्हणतो,
“पाहा! या कुळाविरुद्ध विपत्ती आणण्याचे योजीत आहे,
ज्यामधून तुम्ही तुमची मान काढू शकणार नाही,
आणि तुम्ही गर्वाने चालणार नाही.
कारण ही वाईट वेळ आहे.
4 त्या दिवशी लोक तुमच्यावर गाणी रचतील,
आणि भारी विलाप करून म्हणतील:
‘आम्हा इस्राएलवासीयांचा विनाश झाला आहे;
परमेश्वराने माझ्या लोकांचा प्रांत पालटून टाकला आहे.
त्याने तो माझ्यापासून कसा दूर केला?
त्याने आमची शेते घेऊन आमच्या शत्रूंमध्ये त्यांची वाटणी केली.
5 अहो श्रीमंत लोकांनो, म्हणून, आता चिठ्ठ्या टाकून प्रदेशात मोजमाप करेल,
असा कोणी तुझ्यासाठी परमेश्वराच्या सभेत राहणार नाही.”
6 “तुम्ही भविष्य सांगू नका,
असे ते म्हणतात, या गोष्टीविषयी भविष्य सांगू नये;
अप्रतिष्ठा सरून जाणार नाही.”
7 पण याकोबाचे घराणे हो,
परमेश्वराचा आत्मा रागिष्ट आहे काय?
त्याची ही कृत्ये आहेत की नाही?
जो सरळ चालतो त्यास माझी वचने बरे करीत नाहीत काय?
8 तरीसुद्धा माझे लोक शत्रूसारखे उभे राहिले आहेत.
ज्यांना युद्ध आवडत नाही,
असे सहज जवळून जात असता तुम्ही अंगरख्यावरून घातलेला त्यांचा झगा काढून घेता.
9 तुम्ही माझ्या लोकांच्या स्त्रियांना त्यांच्या मनोरम घरांतून काढून टाकता;
त्यांच्या लहान मुलांपासून माझे आशीर्वाद काढून घेता.
10 ऊठा आणि चालते व्हा! कारण अशुद्धता ही मोठ्या विनाशाने नष्ट करते,
ह्याकरणाने ही तुमची विसाव्याची जागा नाही.
11 जर एखादा असत्याच्या आत्म्याने चालतांना खोटे सांगून म्हणेल की,
“मी द्राक्षरस आणि मद्य यांविषयी भविष्य सांगेन,”
तर तो देखील या लोकांचा भविष्यावादी होईल.
12 हे याकोबा, खचित मी तुझ्या सर्वांना एकत्र करीन.
खरोखर मी इस्राएलाच्या उरलेल्यांना एकत्र करीन.
कुरणातील कळपाप्रमाणे वा मेंढवाड्यातील मेंढराप्रमाणे, तसे त्यांना मी एकत्र ठेवीन.
मग पुष्कळ लोक असल्यामुळे ती मोठा गोंगाट करतील.
13 फोडणारा त्यांच्यापुढे जाईल व लोकांच्या पुढे चालेल.
ते सुटून वेशीजवळ जाऊन तिच्यातून निघाले आहेत;
आणि त्यांचा राजा त्यांच्यापुढे चालून गेला आहे.
परमेश्वर त्यांचा पुढारी आहे.

<- मीखा 1मीखा 3 ->