Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
9
बारा प्रेषितांना कामगिरीवर पाठवणे
मत्त. 10:5-15

1 मग त्याने त्या बारा शिष्यांस एकत्र बोलावून त्यांना सर्व भूतांवर आणि रोग बरे करायला, सामर्थ्य व अधिकार दिला, 2 आणि त्याने त्यांना देवाच्या राज्याविषयीचा संदेश जाहीर करायला व रोग्यांना बरे करायला पाठवले. 3 तो त्यांना म्हणाला, “वाटेसाठी काही घेऊ नका; काठी किंवा झोळी किंवा भाकर किंवा पैसा घेऊ नका आणि दोन दोन अंगरखेही घेवू नका. 4 आणि ज्या कोणत्याही घरात तुम्ही जाल, तेथेच राहा व तेथूनच निघून जा. 5 जितके तुम्हास अंगीकारीत नाहीत तितक्यांच्याविरुद्ध साक्ष व्हावी म्हणून तुम्ही त्या नगरातून निघते वेळी आपल्या पायांची धूळ झाडून टाका.” 6 तेव्हा ते निघाले आणि सर्व ठिकाणी सुवार्ता सांगत व रोग बरे करीत गांवोगांवी फिरत गेले.

हेरोद घोट्याळात पडतो
7 घडत असलेल्या सर्व गोष्टी ऐकून हेरोद राजा फार घोटाळ्यात पडला, कारण “योहान मरण पावलेल्यांमधून उठला आहे.” असे कित्येक म्हणत होते; 8 आणि कित्येक म्हणत होते की “एलीया प्रकट झाला आहे” आणि दुसरे म्हणत होते की “पुरातन संदेष्ट्यातील कोणीएक उठला आहे.” 9 तेव्हा हेरोद म्हणाला, “योहानाचे शीर मी तोडले, पण ज्याच्याविषयी अशा गोष्टी मी ऐकतो तो हा कोण आहे?” आणि तो त्यास भेटायला पाहत होता.
पाच हजारांना भोजन
मत्त. 14:13-21; मार्क 6:30-44; योहा. 6:1-15

10 मग प्रेषितांनी परत येऊन आपण जे काही केले होते ते त्यास सविस्तर सांगितले. मग तो त्यांना बरोबर घेऊन बेथसैदा नावाच्या नगराकडे एकीकडे गेला. 11 परंतु याविषयी लोकांनी ऐकल्यावर ते त्याच्यामागे गेले. तेव्हा तो त्यांचे स्वागत करून त्यांच्याशी देवाच्या राज्याविषयी बोलू लागला आणि ज्यांना बरे होण्याची गरज होती त्यांना त्याने बरे केले. 12 दिवस संपत आला, तेव्हा बारा जण जवळ येऊन त्यास म्हणाले, “समुदायाला निरोप दे, म्हणजे ते आसपासच्या गावांत व खेड्यांत जाऊन उतरतील व खाण्याची सोय करतील; कारण आपण येथे रानातल्या ठिकाणी आहो.” 13 पण तो त्यांना म्हणाला, “तुम्हीच त्यांना खायला द्या.” ते म्हणाले, “आम्ही जाऊन या लोकांसाठी अन्न विकत आणले नाही, तर पाच भाकरी व दोन मासे एवढ्याशिवाय आम्हाजवळ काही नाही.” 14 कारण ते सुमारे पाच हजार पुरूष होते. तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना सांगितले, “पन्नास पन्नास जणांच्या पंक्ती करून त्यास बसवा,” 15 मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे करून सर्वांस बसवले. 16 त्याने त्या पांच भाकरी व ते दोन मासे घेतले आणि वर स्वर्गाकडे पाहून त्यास आशीर्वाद दिला आणि त्यांचे तुकडे करून ते लोकसमुदायाला वाढण्याकरता शिष्यांजवळ दिले. 17 तेव्हा ते सर्व जेवून तृप्त झाले; आणि त्यांनी मोडलेल्या तुकड्यांतले उरले ते बारा टोपल्या भरून त्यांनी उचलून घेतले.

येशू हा ख्रिस्त असल्याची पेत्राने दिलेली कबुली
मत्त. 16:13-20; मार्क 8:27-30

18 आणि असे झाले की तो एकांतात प्रार्थना करत असता शिष्य त्याच्याबरोबर होते, तेव्हा त्याने त्यांना विचारून म्हटले, “लोकसमुदाय मला कोण म्हणून म्हणतात?” 19 मग त्यांनी उत्तर देऊन म्हटले, “बाप्तिस्मा करणारा योहान, पण कित्येक म्हणतात ‘एलीया,’ व कित्येक म्हणतात की, पुरातन संदेष्ट्यातील कोणीएक पुन्हा उठला आहे.”

स्वतःचे मरण व पुनरुत्थान याविषयीचे येशूचे भविष्य
20 त्याने त्यांना म्हटले, “पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता?” तेव्हा पेत्राने उत्तर देऊन म्हटले, “देवाचा ख्रिस्त.” 21 पण हे कोणाला सांगू नये अशी त्याने त्यांना निक्षून आज्ञा केली. 22 आणि म्हटले, “मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःखे सोसावी आणि वडील व मुख्य याजक लोक व नियमशास्त्र शिक्षक यांच्याकडून नाकारले जावे व जीवे मारले जावे व तिसऱ्या दिवशी पुन्हा उठवले जावे, याचे अगत्य आहे.”
आत्मत्याग करण्यासाठी आमंत्रण
मत्त. 16:24-28; मार्क 8:34-9:1

23 आणि तो सर्वांना म्हणाला, “जर कोणी माझ्यामागे येऊ इच्छितो तर त्याने स्वतःला नाकारावे व दररोज आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व माझ्यामागे चालावे. 24 कारण जो कोणी आपला जीव वाचवू इच्छितो तो त्यास गमावील, परंतु जो कोणी माझ्याकरिता आपला जीव गमावील तो त्यास वाचवील. 25 कारण मनुष्याने सगळे जग मिळवून स्वतःला गमावले किंवा स्वतःचा नाश करून घेतला तर त्यास काय लाभ होईल? 26 जो कोणी माझ्याविषयीची व माझ्या वचनाविषयी लाज धरील त्यांच्याविषयीची लाज मनुष्याचा पुत्र जेव्हा आपल्या स्वतःच्या, पित्याच्या व पवित्र दूतांच्या गौरवाने येईल तेव्हा धरील. 27 आणि मी तुम्हास खरे सांगतो की, येथे उभे राहणाऱ्यांतले काही असे आहेत की, ते देवाचे राज्य पाहतील तोपर्यंत त्यांना मरणाचा अनुभव येणारच नाही.”

येशूचे रुपांतर
28 आणि या गोष्टी सांगितल्यानंतर सुमारे आठ दिवसानी असे झाले की, पेत्र व योहान व याकोब यांना बरोबर घेऊन तो प्रार्थना करायला डोंगरावर गेला. 29 तेव्हा तो प्रार्थना करीत असता त्याच्या मुखाचे रूप पालटले व त्याचे वस्त्र पांढरे शुभ्र लखलखीत झाले. 30 आणि पाहा, दोन पुरूष त्याच्याशी संभाषण करीत होते; हे मोशे व एलीया होते, 31 ते तेजस्वी दिसत होते आणि जे त्याचे प्रयाण तो यरूशलेम शहरात पूर्ण करणार होता, त्याविषयी ते बोलत होते. 32 तेव्हा पेत्र व त्याच्याबरोबर जे होते ते झोपेने भारावले होते, परंतु ते पूर्णपणे जागे झाले तेव्हा त्यांचे तेज आणि जे दोन पुरूष त्याच्याजवळ उभे राहिले होते त्यांनाही पहिले. 33 मग असे झाले की ते त्याच्यापासून दूर होत असता पेत्राने येशूला म्हटले, “हे गुरु, येथे असणे आम्हास बरे आहे; तर आम्ही तीन मंडप करू, तुझ्यासाठी एक व मोशेसाठी एक व एलीयासाठी एक.” आपण काय बोलत आहोत याचे त्यास भान नव्हते. 34 तो या गोष्टी बोलत असता एक ढग येऊन त्यांच्यावर सावली करू लागला आणि ते ढगांत शिरले तेव्हा ते भ्याले. 35 आणि ढगांतून वाणी आली, ती म्हणाली, “हा माझा निवडलेला पुत्र आहे, याचे तुम्ही ऐका.” 36 ही वाणी झाल्यावर येशू एकटाच दिसला आणि ते उगेच राहिले व ज्या गोष्टी त्यांनी पहिल्या होत्या त्यांतले काहीच त्यांनी त्या दिवसांमध्ये कोणाला सांगितले नाही.
भूतग्रस्त मुलगा
मत्त. 17:14-21; मार्क 9:14-29

37 आणि असे झाले की दुसऱ्या दिवशी ते डोंगरावरून खाली आल्यावर मोठा लोकसमुदाय त्यास भेटला. 38 तेव्हा पाहा, समुदायातील एक मनुष्य मोठ्याने ओरडून म्हणाला, हे गुरु, मी तुला विनंती करतो, माझ्या मुलाकडे पाहा, कारण तो माझे एकुलते मूल आहे. 39 आणि पाहा, कोणी आत्मा त्यास धरतो आणि हा एकाएकी ओरडतो, मग तो याला असा पिळतो की त्याच्या तोंडाला फेस येतो, तो याला पुष्कळ त्रास देतो व याला मोठ्या प्रयासाने सोडून जातो. 40 आणि तो काढावा म्हणून मी तुझ्या शिष्यांना विनंती केली, परंतु त्यांच्याने तो निघेना. 41 तेव्हा येशूने उत्तर देऊन म्हटले, “हे अविश्वासी व विपरीत पिढी, मी कोठेपर्यंत तुमच्याबरोबर राहू व तुमचे सोसू? तू आपल्या मुलाला इकडे आण.” 42 मग तो जवळ येत आहे इतक्यात भूताने त्यास खाली आपटले व भारी पिळून टाकले, पण येशूने त्या अशुद्ध आत्म्याला धमकावले व मुलाला बरे करून त्याच्या पित्याजवळ परत दिले.

येशूचे स्वतःच्या मरणाविषयीचे दुसरे भविष्य
मत्त. 17:22, 23; मार्क 9:30-32

43 मग देवाचे हे महान सामर्थ्य पाहून सर्व लोक थक्क झाले आणि तो जी कामे करीत होता त्या सर्वांवरून सर्वजण आश्चर्य करीत असता तो आपल्या शिष्यांना म्हणाला, 44 “या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा कारण मनुष्याचा पुत्र मनुष्यांच्या हाती दिला जाणार आहे.” 45 परंतु हे बोलणे त्यांना समजले नाही व त्यांना ते समजू नये म्हणून ते त्यांच्यापासून गुप्त राखलेले होते; आणि ते या बोलण्याविषयी त्यास विचारायला भीत होते.

नम्रता व परसहिष्णुता
मत्त. 18:1-5; मार्क 9:33-37

46 त्यानंतर आपणांमध्ये कोण मोठा आहे याविषयी त्यांच्यामध्ये वादविवाद उठला. 47 तेव्हा येशूने त्यांच्या अंतःकरणाचे विचार जाणून एका बालकाला जवळ घेऊन त्यास आपल्यापाशी उभे केले, 48 आणि त्यांना म्हटले, “जो कोणी माझ्या नावाने या बालकाला स्वीकारतो तो मला स्वीकारतो आणि जो कोणी माझा स्वीकार करतो तो ज्याने मला पाठवले त्याचा स्वीकार करतो; कारण तुम्हा सर्वांमध्ये जो सर्वांहून लहान आहे तोच मोठा आहे.”

49 तेव्हा योहानाने उत्तर देऊन म्हटले, “हे गुरु, आम्ही कोण एकाला तुझ्या नावाने भूते काढतांना पाहिले आणि आम्ही त्यास मना केले, कारण तो आमच्याबरोबर तुझ्यामागे चालत नाही.” 50 तेव्हा येशूने त्यास म्हटले, “मना करू नका, कारण जो तुम्हास प्रतिकूल नाही तो तुम्हास अनुकूल आहे.”

येशू यरूशलेम शहरास जाण्यास निघतो; आतिथ्य न करणारे शोमरोनी
51 आणि असे झाले की त्यास वर घेतले जाण्याचा समय जवळ आला तेव्हा यरूशलेम शहरास जाण्याच्या दृढनिश्चयाने त्याने आपले तोंड वळवले. 52 मग त्याने आपल्यापुढे निरोपे पाठवले, तेव्हा ते निघून त्याच्यासाठी तयारी करण्यास शोमरोन्यांच्या एका गावात गेले, 53 पण त्यांनी त्यास अंगीकारले नाही, कारण यरूशलेम शहराकडे जाण्याचा त्याचा रोख होता. 54 तेव्हा त्याचे शिष्य याकोब व योहान हे पाहून म्हणाले, “हे प्रभू, एलीयाने केले होते तसेच आकाशांतून अग्नीने पडून त्याचा नाश करावा म्हणून आम्ही आज्ञा करावी, अशी तुझी इच्छा आहे काय?” 55 परंतु त्याने वळून त्यांना धमकावले आणि म्हटले, “तुम्ही कोणत्या आत्म्याचे आहात हे तुम्हास ठाऊक नाही; 56 कारण मनुष्याचा पुत्र मनुष्यांच्या जीवाचा नाश करायला नाही, तर त्यांना तारायला आला आहे.” मग ते दुसऱ्या गावाला गेले.
शिष्य होऊ इच्छिणाऱ्यांची कसोटी
मत्त. 8:18-22

57 आणि ते वाटेने चालत असता कोणीएक त्यास म्हणाला, “जेथे कोठे तू जाशील तेथे मी तुझ्यामागे येईन.” 58 तेव्हा येशू त्यास म्हणाला, “खोकडांस बिळे व आकाशांतल्या पाखरांस घरटी आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला आपले डोके टेकायला ठिकाण नाही.” 59 मग त्याने दुसऱ्या एकाला म्हटले, “माझ्यामागे ये,” परंतु तो म्हणाला, “हे प्रभू, पहिल्याने मला जाऊ दे आणि माझ्या पित्याला पुरू दे,” 60 तेव्हा येशूने त्यास म्हटले, “मरण पावलेल्यांना आपल्या मरण पावलेल्यांस पुरू दे, परंतु तू जाऊन देवाच्या राज्याची घोषणा कर.” 61 तेव्हा आणखी एकजण म्हणाला, हे प्रभू, मी तुझ्यामागे येईन, परंतु पहिल्याने मला माझ्या घरात जे आहे त्यांचा निरोप घेऊ दे. 62 पण येशूने त्यास म्हटले, “जो कोणी नांगराला आपला हात घातल्यावर मागील गोष्टींकडे पाहत राहतो असा कोणीही देवाच्या राज्याला उपयोगी नाही.”

<- लूक 8लूक 10 ->