Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
24
दिव्याची काळजी
निर्ग. 27:20-21

1 परमेश्वर मोशेला म्हणाला, 2 “इस्राएल लोकांस आज्ञा कर की, दीप सतत तेवत राहून प्रकाश मिळावा म्हणून जैतूनाचे हातकुटीचे शुद्ध तेल त्यांनी तुझ्याकडे घेऊन यावे.

3 अहरोनाने दर्शनमंडपामध्ये साक्षपटासमोरील अंतरपटाबाहेर परमेश्वरासमोर संध्याकाळपासून सकाळपर्यंत दीप सतत तेवत ठेवावा; हा तुमचा पिढ्यानपिढ्या कायमचा नियम होय. 4 त्याने परमेश्वरासमोर शुद्ध सोन्याच्या दीपवृक्षावरील दिवे सतत तेवत ठेवावे.

संमक्षतेची भाकर
5 तू मैदा घेऊन त्याच्या बारा पोळ्या भाज; एक पोळी दोन दशमांश एफाभर सपिठाची करावी. 6 त्यांच्या दोन रांगा करून एका रांगेत सहा सहा पोव्व्या शुद्ध सोन्याच्या मेजावर परमेश्वरासमोर ठेवाव्यात.

7 प्रत्येक रांगेवर धूप ठेव ह्यामुळे परमेश्वरास अग्नींतून केलेल्या अर्पणाचे ते प्रतीक असेल. 8 प्रत्येक शब्बाथ दिवशी अहरोनाने त्या, परमेश्वरासमोर मांडाव्या; इस्राएल लोकांच्या वतीने हा सर्वकाळचा करार होय. 9 ती भाकर अहरोन व त्याचे पुत्र ह्यांचा कायमचा वाटा होय; त्यांनी ती पवित्र ठिकाणी खावी; कारण कायमच्या नियमाप्रमाणे परमेश्वरास अर्पिलेल्या अर्पणांपैकी ती त्यास परमपवित्र होय.”

दुर्भाषण आणि नुकसानभरपाई
10 त्याकाळी कोणा एका इस्राएली स्त्रीला मिसरी पुरुषापासून झालेला एक मुलगा होता; तो इस्राएली होता व इस्राएल लोकांप्रमाणे वागत होता. तो छावणीत एका इस्राएल मनुष्याशी भांडू लागला. 11 तो इस्राएली स्त्रीचा मुलगा परमेश्वराच्या नांवाची निंदा करून शिव्याशाप देऊ लागला म्हणून लोकांनी त्यास मोशेकडे आणले. त्याच्या आईचे नाव शलोमीथ होते; ती दान वंशातील दिब्री ह्याची मुलगी होती; 12 त्याच्या संबंधी परमेश्वराची आज्ञा स्पष्टपणे कळावी म्हणून त्यांनी त्यास अटकेत ठेवले.

13 मग परमेश्वर देव मोशेला म्हणाला, 14 “तुम्ही त्या शिव्याशाप देणाऱ्या मनुष्यास छावणीबाहेर न्या; मग जितक्यांनी ती निंदा ऐकली तितक्यांना एकत्र बोलावा; त्यांनी आपले हात त्या मनुष्याच्या डोक्यावर ठेवावे; आणि मग सर्व लोकांनी त्यास दगडमार करून मारुन टाकावे.

15 तू इस्राएल लोकांस अवश्य सांग की, जो कोणी आपल्या देवाला शिव्याशाप देईल त्याने आपल्या पापाची शिक्षा भोगावी. 16 जो कोणी परमेश्वराच्या नावाची निंदा करील त्यास अवश्य जिवे मारावे; सर्व मंडळीने त्यास दगडमार करावी; तो परदेशीय असो किंवा स्वदेशीय असो, त्याने परमेश्वराच्या नावाची निंदा केली तर त्यास अवश्य जिवे मारावे.

17 जर एखादा मनुष्य दुसऱ्या मनुष्यास ठार मारील तर त्यास अवश्य जिवे मारावे. 18 जर कोणी दुसऱ्याच्या पशूस ठार मारील तर त्याने त्याच्या बदली दुसरा पशू देऊन भरपाई करावी.

19 जो कोणी एखाद्याला दुखापत करील त्यास उलट त्याच प्रकारची दुखापत करावी. 20 हाड मोडल्याबद्दल हाड मोडणे, डोळ्याबद्दल डोळा, दाताबद्दल दात; ह्याप्रमाणे एखाद्याने कोणा मनुष्यास जी इजा केली असेल त्याच प्रकारची इजा त्यास केली जावी. 21 पशूला ठार मारणाऱ्याने त्याची भरपाई करावी, पण मनुष्य हत्या करणाऱ्याला अवश्य जिवे मारावे.

22 परदेशीयांना व स्वदेशीयांना एकच नियम लागू असावा; कारण मी परमेश्वर तुमचा देव आहे!” 23 मोशेने इस्राएल लोकांस ह्याप्रमाणे सांगितल्यावर त्यांनी त्या शिव्याशाप देणाऱ्या मनुष्यास छावणीबाहेर नेऊन दगडमार केला; अशाप्रकारे परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे इस्राएल लोकांनी केले.

<- लेवीय 23लेवीय 25 ->